M’Cheyne Bible Reading Plan
खास वचने
30 मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले:
2 “जर एखाद्याला देवाला काही खास वचन द्यायचे असेल किंवा त्याने देवाला खास वस्तू द्यायचे वचन दिले असेल तर त्याला ती गोष्ट करु द्या. पण त्या माणसाने जे वचन दिले असेल तेच नेमके केले पाहिजे.
3 “एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल. 4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. तिने जे वचन दिले ते तिला पूर्ण करावे लागणार नाही.
6 “तिला तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील. 7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या रत्रीने पचनाची पूर्तता केली पाहिजे. 8 पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाही तर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले-तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही-म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
9 “विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 10 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल. 11 तिच्या नवऱ्याने त्यावचनाबद्दल ऐकले आणि त्याची पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिने त्याप्रमाणे केले पाहिजे. 12 पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाही तर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील. 13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे [a] वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल. 14 नवरा यापैकी कुठल्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कुठल्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो. 15 पण जर नवऱ्याने वचनांबद्दल ऐकले आणि त्यांच्यावर त्याने बंदी आणली तर तिने दिलेले वचन मोडण्याला तो जबाबदार असेल.” [b]
16 परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. या एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.
आसाफाचे मास्कील
74 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का?
देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?
2 तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव.
तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत.
ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
3 देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल.
शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.
4 शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या.
ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
5 फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे
शत्रुचे सैनिक दिसत होते.
6 देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन
तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
7 त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले.
तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी
ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
8 शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले.
त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थान जाळून टाकले.
9 आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही.
आता कोणी संदेष्टे राहिले नाही.
कुणालाही काय करावे ते कळत नाही.
10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत?
तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस?
तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस
या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी
तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस
आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस
आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस.
सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.
तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव.
शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे.
ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस.
तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
20 आपला करार आठव या देशातील
प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली.
त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा.
गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
22 देवा, ऊठ! आणि युध्द कर!
त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस
त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.
देवाचा यरूशलेमला संदेश
22 दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.
लोकहो, तुमचे काय बिघडले आहे?
तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
2 पूर्वी हे शहर फार गजबजलेले होते.
येथे गलबलाट होता आणि शहर सुखी होते.
पण आता परिस्थिती बदलली आहे.
तुझे लोक मारले गेले
पण तलवारीच्या वाराने नव्हे.
तुझे लोक मेले हे खरे,
पण लढताना नव्हे.
3 तुझे नेते एकत्र होऊन खूप लांब जरी पळून गेले,
तरी ते पकडले गेले.
ते पकडले गेले ते धनुष्याचा उपयोग न करता.
ते सर्व नेते एकत्रितपणे पळून गेले पण पकडले गेलेच.
4 म्हणून मी म्हणतो, “माझ्याकडे बघू नका,
मला रडू द्या.
माझ्या लोकांच्या नाशाबद्दल
माझे सांत्वन करू नका.”
5 परमेश्वराने एक विशेष दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी तेथे दंगली व गोंधळ होईल. दृष्टांन्ताच्या दरीत लोकांची तुडवातुडवी होईल. शहराची तटबंदी पाडली जाईल. दरीतील लोक डोंगर माथ्यावर असलेल्या शहरातील लोकांकडे बघून आरडाओरडा करतील. 6 एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल. 7 तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल. 8 तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील. शत्रू यहुदाचे तट पाडतील.
9-11 दावीदाच्या शहरांच्या भितींना भगदाडे पडायला सुरवात होईल. आणि तुम्हाला ती स्पष्टपणे दिसतील. मग तुम्ही घरांची मोजदाद कराल आणि तुम्ही घरांचे दगड तटाची भगदाडे बुजवायला वापराल. पाणी साठविण्यासाठी दोन भिंतीत जागा करून तुम्ही जुन्या झऱ्याचे पाणी सोडाल.
तुमच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व कराल पण ज्याने हे सर्व केले त्या देवावर तुम्ही श्रध्दा ठेवणार नाही. ज्याने फार पूर्वीच या गोष्टी करून ठेवल्या त्या देवाकडे तुमचे लक्षच जाणार नाही. 12 म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील. 13 पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत,
“गुरे, मेंढ्या मारा.
आपण उत्सव साजरा करू.
आपण जेवण करू,
मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.”
14 सर्वशक्तिमान परमेश्वराने सांगितलेल्या ह्या गोष्टी मी स्वतः माझ्या कानाने ऐकल्या. “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही अपराधी आहात. या अपराधांबद्दल क्षमा करण्यापूर्वीच तुम्ही मराल याची मला खात्री आहे.” माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले.
देवाचा शेबनाला संदेश
15 माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो. 16 राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, “येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?” यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वतःचे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वतःचे थडगे खणत आहे.”
17-18 “हे माणसा, परमेश्वर तुला चिरडून टाकील. परमेश्वर तुझा लहानसा चेंडू करून तुला दुसऱ्या मोठ्या देशात भिरकावून देईल. तेथेच तू मरशील.”
परमेश्वर म्हणाला, “तुला तुझ्या रथांचा फार गर्व आहे पण त्या दूरदेशातील तुझ्या नवीन राजाचे रथ तुझ्यापेक्षा चांगले असतील. त्याच्या राजवाड्यात तुझे रथ शोभणार नाहीत. 19 येथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन. तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करील. 20 त्या वेळी मी माझा सेवक आणि हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम ह्याला बोलावीन. 21 मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एल्याकीमला देईन. तुझे महत्वाचे पद त्याला देईन. तो सेवक यरूशलेमच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबीयांना पित्याप्रमाणे असेल.
22 “दावीदाच्या घराची किल्ली मी एल्याकीमच्या ताब्यात देईन. त्याने उघडलेले दार उघडेच राहील. कोणीही ते बंद करू शकणार नाही. त्याने बंद केलेले दार बंदच राहील. ते कोणीही उघडू शकणार नाही. त्याच्या वडिलांच्या घरात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. 23 अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन. 24 त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या व पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध् त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या व मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
25 “आता, कठीण पृष्ठभागावर ठोकून बसविलेला खिळा (शेबना) त्या वेळी कमकुवत होऊन तुटून पडेल. तो खिळा जमिनीवर तुटून पडल्याने त्याला अडकविलेल्या वस्तूंचा नाश होईल. नंतर मी दृष्टांन्तात सांगितल्याप्रमाणे सर्व होईल.” (परमेश्वराने सांगितले असल्यामुळे ह्या गोष्टी घडतील)
येशू परत येईल
3 प्रिय मित्रांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे. दोन्ही पत्रांमध्ये या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 देवाच्या पवित्र संदेष्ट्यांनी वापरलेले शब्द आणि तुमच्या प्रेषितांकडून आपल्या प्रभु व तारणाऱ्याने दिलेल्या आज्ञांची तुम्ही आठवण करावी अशी माझी इच्छा आहे.
3 पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, ते म्हणजे, शेवटच्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील. 4 आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.”
5 पण जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा ते मुद्दामच विसरतात की, फार पूर्विपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्या शब्दाने पाण्यामधून आकारास आली. 6 जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाश झाला. 7 परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्निद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे, जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल.
8 परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. [a] 9 देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही. जसे काही लोकांना वाटते, परंतु तो आमच्याशी धीराने वागतो. कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. वास्तविक सर्व लोकांनी पश्चात्ताप करावा असे त्याला वाटते.
10 परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्यादिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीशा होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील. [b] 11 जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावे.
12 तुम्ही प्रभुच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा. त्या गर्जनेने (आवाजाने) आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील. 13 पण देवाच्या वचनाप्रमाणे, जथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू.
14 म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही या गोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा. 15 आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पौल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हांला लिहिले. 16 त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यास करुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वतःचा नाश करुन घेतात.
17 यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वतःचे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा. 18 परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो.
2006 by World Bible Translation Center