M’Cheyne Bible Reading Plan
रोजची अर्पणे
28 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी न विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो. 3 अग्नीबरोबरची अर्पणे त्यांनी परमेश्वराला दिलीच पाहिजेत. त्यांनी रोज एक वर्षाची दोन कोकरे दिली पाहिजेत. ती दोषरहित असली पाहिजेत. 4 एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे. 5 शिवाय आठ कप पीठ पाव कप हीन तेलात मिसळून केलेले धान्यार्पणही द्यावे.” 6 (ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.) 7 “लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे. 8 दुसरी मेंढी संधिप्रकाशाच्या वेळी अर्पणे करावी. ही शिजवलेली असावी हे अर्पण सकाळच्या अर्पणाप्रमाणेच द्यावे. तसेच त्याबरोबरची पेयार्पणेही करावीत. हे होमार्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंद देतो.”
शब्बाथची अर्पणे
9 “शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे. 10 विश्रांतीच्या दिवसाचे हे खास अर्पण आहे. रोज देण्यात येणारे अर्पण आणि पेयार्पणा व्यतीरिक्त हे अर्पण आहे.”
महिन्याच्या सभा
11 “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात. 12 प्रत्येक बैलाबरोबर तुम्ही 24 कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. आणि मेंढ्याबरोबर 16 कप पीठ हीन तेलात मिसळून द्या. 13 प्रत्येक मेंढीबरोबर आठ कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. ही अग्नीबरोबर द्यायची अर्पणे असतील. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो. 14 तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत. 15 प्रत्येक दिवशी करण्यात येणाऱ्या अर्पणा व्यतिरिक्त तुम्ही 1 बकरा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तो पापार्पण म्हणून द्यावा.
वल्हांडण
16 “परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल. 17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता. 18 या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही. 19 तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत. 20-21 या बरोबरच 24 कप पीठ तेलात मिसळून केलेले धान्यार्पण प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर द्या. 22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल. 23 ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.
24 “त्याचबरोबर सात दिवस दररोज ही होमार्पणे आणि पेयार्पणे तुम्ही परमेश्वराला दिली पाहिजेत. त्यांच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होईल. ही अर्पणे म्हणजे लोकांचे अन्न असेल. ही अर्पणे नेहमीच्या होमार्पणाव्यतिरिक्त असतील.
25 “नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.
सप्ताहांचा सण
26 “पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही. 27 तुम्ही होमार्पणे द्यावे. अग्नीबरोबर दिलेली ही अर्पणे असतील. तुम्ही दोन बैल, एक मेंढा व 1 वर्षाची साकोकरे अर्पण करा. हि सर्व दोषरहित असावीत. 28 तुम्ही प्रत्येक बैलाबरोबर 24 कप पीठ तेलात मिसळून द्यावे. 16 कप पीठ मेंढ्याबरोबर 29 व आठ कप पीठ प्रत्येक कोकऱ्या बरोबर द्यावे. 30 स्वतःला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या. 31 रोजच्या होमार्पणाशिवाय व धान्यर्पणाशिवाय तुम्ही ही अर्पणे द्या. प्राणी आणि पेय दोषरहित आहेत याची खात्री करा.
शलमोनासाठी स्तोत्र
72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
3 पृथ्वीवर सगळीकडे शांती,
आणि न्याय नांदू दे.
4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
8 त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे. [a]
9 वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे.
त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.
10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे.
शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
11 सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे
सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो.
आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.
13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात.
राजा त्यांना जिवंत ठेवतो.
14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो.
राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.
15 राजा चिरायु होवो!
आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे.
राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा,
त्याला रोज आशीर्वाद द्या.
16 शेतात खूप धान्य पिकू द्या,
डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या.
शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या
आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
17 राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या.
जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या.
त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या
आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.
18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.
20 (इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.)
देवाचा मिसरला संदेश
19 मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
2 देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील. 3 मिसरच्या लोकांचे बेत मी उधळून टाकीन. मिसरवासी गोंधळून जातील. ते काय करावे याबाबत त्यांचे खोटे देव, चाणाक्ष लोक, जादूगार, मांत्रिक यांचा सल्ला घेतील. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.” 4 प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी मिसरला कठोर शासकाच्या हातात देईन. एक सामर्थ्यवान राजा मिसरवर राज्य करील.”
5 नाईल नदी कोरडी पडेल. समुद्र आटतील. 6 सर्व नद्यांच्या पाण्याला दुर्गंध येईल. सर्व कालवे सुकतील आणि मिसरमधील पाणी नाहीसे होईल. पाणवनस्पती कुजून जातील. 7 नदीकाठची झाडे सुकतील, मरतील व वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.
8 नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल. 9 विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही. 10 पाण्यावर बांध बांधणाऱ्यांना काम न राहिल्याने ते सुध्दा कष्टी होतील.
11 सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे “शहाणे सल्लागार” चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वतःला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वतःला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत. 12 मिसर देशा, तुझे ते सुज्ञ लोक कोठे आहेत? त्यांना सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरबद्दल काय योजले आहे ते समजले पाहिजे. त्यांनी तुला काय घडणार आहे ते सांगितले पाहिजे.
13 सोअनाच्या नेत्यांना मूर्ख बनविले गेले आहे. नोफाचे नेते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणून ते सर्व मिसरला चुकीच्या मार्गाने नेतात. 14 परमेश्वराने नेत्यांना गोंधळात टाकले आहे. ते स्वतःभरकटतात आणि मिसरला चुकीच्या वाटेने नेतात. ते जे काय करतात ते चूकच असते. ते मद्यप्यांसारखे मळमळून येऊन गडबडा लोळत आहेत. 15 नेत्यांना करण्यासारखे आता काही नाही. (हे नेते म्हणजे “डोके व शेपूट,” “शेंडे व बुडखे” आहेत.)
16 त्या वेळी मिसरवासी घाबरलेल्या बायकांसारखे दिसतील. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला भितील. देव शिक्षा करण्यासाठी हात उगारील व त्यांची घाबरगुंडी उडेल. 17 यहुद्यांच्या भूमीला मिसरमधील सर्व लोक घाबरतील. मिसरमधील प्रत्येकजण यहुदाचे नाव ऐकताच भयभीत होईल. असे होण्याचे कारण हेच की सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरमध्ये भयानक गोष्टी घडून आणण्याची योजना आखली आहे. 18 ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल. ह्या शहरांत राहणारे लोक सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरण्याची शपथ वाहतील.
19 तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. व परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल. 20 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सामर्थ्यशाली कृत्यांची मिसरमधील ही निशाणी आणि पुरावा असेल. केव्हाही लोकांनी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला की परमेश्वर मदत पाठवील. लोकांचे रक्षण व बचाव करण्यास देव एका माणसाला पाठवील हा माणूस अत्याचार करणाऱ्यापासून लोकांना सोडवील.
21 त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील. 22 परमेश्वर मिसरमधील लोकांना शिक्षा करील. नंतर परमेश्वर त्यांना क्षमा करील. ते परमेश्वराला शरण जातील. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला पावेल व त्यांना क्षमा करील.
23 त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल. 24 त्या वेळी इस्राएल, अश्शूर व मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”
अश्शूर मिसर व कूश पराभव करील
20 सर्गोन अश्शूरचा राजा होता. त्याने तर्तानला अश्दोदवर स्वारी करायला पाठविले. तर्तानने चढाई करून ते शहर जिंकून घेतले. 2 त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे व जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा व अनवाणी चालला.
3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी फिरला. हा मिसर व कूशयाला संकेत आहे. 4 अश्शूरचा राजा त्यांना कैद करील व त्यांच्या देशापासून त्यांना दूर घेऊन जाईल. आबालवृध्दांना वस्त्रे व जोडे काढून नेले जाईल व त्यांना संपूर्ण नग्न केले जाईल. मिसरचें लोक लज्जित होतील. 5 जे कुशकडे मदतीची अपेक्षा करीत होते. त्यांचा अपेक्षाभंग होईल. मिसरच्या वैभवाने लोक आश्चर्यचकीत झाले होते परंतु ते लज्जित होतील.”
6 समुद्रकाठी राहणारे लोक म्हणतील, “त्या देशांवर आम्ही मदतीसाठी विश्वास टाकला, अश्शूरच्या राजापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली पण त्यांचाच पराभव झाला, मग आता आमचा निभाव कसा लागणार?”
1 ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,
देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यवान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना, 2 देव आणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो.
प्रत्येक गोष्ट जी आम्हांला पाहिजे ती देवाने दिलेली आहे
3 जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो. 4 या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यावान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की, त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करुन घ्यावी.
5 म्हणून या कारणासाठी आपल्या कडून होता होईल ते प्रयत्न करुन देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, 6 ज्ञानात आत्मसंयमनाची, आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला. 7 आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या. 8 जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढत असतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करुन आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील. 9 पण ज्याच्या अंगी हे गुण नसतील तो पायापुरते पाहणारा व आंधळा ठरेल. आणि त्याच्या गतकाळतील पापापासून त्याला शुद्ध केल्याचा विसर त्याला पडला आहे.
10 म्हणून बंधूंनो, तुम्हाला देवाने खरोखरच पाचारण केले आहे आणि निवडले आहे, हे दाखविण्यासाठी अधिक उत्सुक असा. कारण जर तुम्ही या गोष्टी करता तर तुम्ही कधीही अडखळणार नाही आणि पडणार नाही. 11 आणि अशा प्रकारे आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंतकाळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागत करण्यात येईल.
12 या कारणासाठी, या गोष्टींची मी तुम्हांला सतत आठवण करुन देत राहीन. जरी तुम्हांला त्या माहीत असल्या आणि तुमच्याप्रत आलेल्या सत्यात तुम्ही चांगले स्थिरावलेले असला, 13 तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की, जोपर्यंत या शरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण करुन देऊन जागे ठेवणे योग्य आहे. 14 कारण मला माहीत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला हे स्पष्ट केले आहे की, लवकरच मला हे शरीर सोडावे लागणार आहे. [a] 15 म्हणून या जीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.
आम्ही ख्रिस्ताचे वैभव पाहिले
16 कारण आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हांला सांगितले, तेव्हा अक्क लहुशारीने बनवलेल्या भाखडकथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही. उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली. 17 कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झालीत, तेव्हा उदात्त गौरवाने अशी वाणी त्याच्याकडे आली: “हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे.” 18 आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना [b] ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वतः ऐकली.
19 आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अती विश्वासनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंतःकरणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल. 20 प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की, पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही. 21 कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते, त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे.
2006 by World Bible Translation Center