Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 27

सलाफहादची मुलगी

27 सलाफहाद हेफरचा मुलगा होता. हेफर गिलादचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. मनश्शे योसेफचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. या पाच स्त्रिया दर्शन मंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलचे लोक यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या.

त्या पाच मुली म्हणाल्या, “आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता. याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.”

तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले. परमेश्वर त्याला म्हणाला, “सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.”

“इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे. जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी. 10 जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या. 11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.’” इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.

यहोशवा नवीन पुढारी झाला

12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या वाळवंटातील डोंगरावर जा. मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती तुला तेथे दिसेल. 13 तू ही जागा बघितल्यानंतर तू तुझ्या भावाप्रमाणे. अहरोनाप्रमाणे मरशील. 14 जेव्हा लोक त्सीनच्या वाळवंटात पाण्यासाठी रागावले होते तेव्हा तुम्ही दोघांनी. तू आणि अहरोनाने माझ्या आज्ञा पाळायला नकार दिला. तुम्ही मला मान दिला नाही आणि लोकांना मी पवित्र आहे असे दाखवले नाही.” (हे त्सीनच्या वाळवंटात कादेश जवळ मरिबाच्या पाण्याजवळ घडले.)

15 मोशे परमेश्वराला म्हणाला, 16 “लोक काय विचार करतात ते परमेश्वर देवाला कळते. 17 परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू या लोकांसाठी [a] नेता निवडशील.” 18 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा. तो खूप शहाणा [b] आहे. त्याला नवीन नेता कर. 19 त्याला याजक एलाजार आणि इतर लोकांसमोर उभे रहायला सांग आणि नंतर त्याला नेता कर.

20 “लोकांना असे दाखव की तू त्याला नेता करीत आहेस. नंतर सर्व लोक त्याच्या आज्ञा पाळतील. 21 जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”

22 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने यहोशवाला एलाजारच्या आणि लोकांच्या पुढे उभे राहाण्यास सांगितले. 23 नंतर मोशेने तो नवीन नेता आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. परमेश्वराने त्याला जसे सांगितले होते तसेच त्याने केले.

स्तोत्रसंहिता 70-71

प्रमुख गायकासाठी लोकांना आठवण देण्यासाठी लिहिलेले दावीदाचे एक स्तोत्र.

70 देवा, माझा उध्दा्र कर.
    देवा लवकर ये आणि मला मदत कर.
लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत,
    त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर.
लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत
    ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.
लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी
    आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
जे लोक तुझी उपासना करतात,
    ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते.
ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे
    त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.

मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे.
    देवा, लवकर ये आणि मला वाचव.
देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस.
    उशीर करु नकोस.

71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
    त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
    तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
    तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
    मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
    तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
    मी माझ्या आईच्या शरीरात होतो
    तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून,
    मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.
तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस,
    माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
10 माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत.
    ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
11 माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे
    आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”
12 देवा, मला सोडून जाऊ नकोस.
    देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
13 माझ्या शत्रूंचा पराभव कर.
    ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
    त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.
14 नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन
    आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
15 तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन,
    तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन.
    ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होते.
16 मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा,
    माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन.
17 देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस
    आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.
18 आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत.
    पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे.
मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल
    आणि महानतेबद्दल सांगेन.
19 देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे.
    देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही.
    तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
20 तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास
    परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस आणि मला जिवंत ठेवलेस.
    मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटांतून वर खेचलेस.
21 पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर.
    माझे सांत्वन करणे चालूच ठेव.
22     आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन.
    देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन.
    माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन.
23 तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास.
    माझा आत्मा आनंदी होईल.
    मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
24 माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि
    ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.

यशया 17-18

देवाचा सिरीयाला संदेश

17 दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.

“आता दमास्कस एक शहर आहे, पण त्याचा नाश होईल.
    फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.
लोक अरोएराची शहरे सोडून जातील.
    त्या ओसाड शहरांतून शेळ्यामेंढ्यांचे कळप मुक्तपणे हिंडतील.
    त्यांना हाकलायला तेथे कोणी माणूस नसेल.
एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील.
    दमास्कसचे सरकार पडेल.
इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल.
    सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.”
    सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.

“त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल.
    आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.

“एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात.

“तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल.” सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.

त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल. लोक, स्वतःच्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत. त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होती [a] त्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल. 10 असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.

दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत. 11 एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.

12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक.
    ते मोठ्याने रडत आहेत.
    लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.
13 लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल.
    देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील.
लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल.
    वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
14 त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील.
    उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल.
त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही
    ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.

देवाचा इथिओपियाला संदेश

18 इथिओपियामधील नद्यांकाठच्या प्रदेशाकडे पाहा. तेथे इतके कीटक आहेत की त्यांचे गुणगुणणे तुम्ही ऐकू शकाल. तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.

शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा.
    (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात.
    त्याचे राष्ट्र बलशाली आहे.
त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे.
    त्यांचा देश नद्यांनी
    विभागलेला आहे.)
त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे.
    त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील.
डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल.
    ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.

परमेश्वर मला म्हणाला, “माझ्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी मी असेन. [b] मी शांतपणे ह्या गोष्टी घडताना पाहीन. उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल. त्या वेली डोंगरावरील पक्ष्यांच्या आणि जंगली जनावरांच्या उपयोगी पडतील. उन्हाळ्यात पक्षी त्यात राहतील आणि थंडीत जंगली जनावरे त्या खाऊन टाकतील.”

त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्पण करण्यासाठी खास वस्तू आणल्या जातील. ह्या वस्तू, उंच आणि धडधाकट लोक, देवाच्या स्थळी सीयोनच्या डोंगरावर आणतील. (ह्या उंच व धडधाकट लोकांना सर्व लोक घाबरतात. त्यांचे राष्ट्र बलाढ्य आहे. ते इतर राष्ट्रांना हरवते. हे राष्ट्र नद्यांनी विभागले गेले आहे.)

1 पेत्र 5

देवाचा कळप

आता मी तुमच्यातील वडीलजनांना आवाहन करतो (मी स्वतः एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदारसुद्धा आहे.) तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा. आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा. आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगुट देईल. त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण,

“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो,
    पण दीनांवर कृपा करतो.” (A)

देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा. तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,

सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात.

10 परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल. 11 त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.

शेवटचा सलाम

12 तुम्हाला देवाच्या खऱ्या कृपेची साक्ष द्यावी व तुम्हाला उत्तेजन द्यावे म्हणून मी हे पत्र सिल्वानच्या हातून थोडक्यात लिहीत आहे कारण सिल्वान हा आपला विश्वासू भाऊ आहे. असे मी समजतो. देवाच्या खऱ्या कृपेत दृढ राहा.

13 तुमच्याबरोबरच देवाने निवडलेली बाबेल येथील मंडळी तुम्हांला सलाम सांगते, तसेच ख्रिस्तातील माझा पुत्र मार्क तुम्हांला सलाम सांगतो. 14 तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा.

तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center