Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 26

लोकांची मोजणी (गणना) केली

26 मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला: तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”

त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले, “वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.”

मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.

जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.)

ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ,

पल्लूचे पल्लूवी कूळ.

हेस्रोनचे हेस्रोनी कूळ,

कर्मीचे कर्मी कूळ.

रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.

पल्लूचा मुलगा अलियाब. अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला. 10 त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता. 11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.

12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे

नमुवेलाचे नमुवेली कूळ.

यामीनाचे यामीनी कूळ.

याकीनाचे याकीनी कूळ.

13 जेरहाचे जेरही कूळ.

शौलाचे शौली कूळ.

14 ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.

15 गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी:

सफोनाचे सफोनी कूळ.

हग्गीचे हग्गी कूळ.

शूनीचे शूनी कूळ.

16 आजनीचे आजनी कूळ.

एरीचे एरी कूळ.

17 अरोदचे अरोदी कूळ.

अरलीचे अरेली कूळ.

18 गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.

19-20 यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:

शेलाचे शेलानी कूळ,

पेरेसाचे पेरेसी कूळ,

जेरहाचे जेरही कूळ.

(यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)

21 पेरेसच्या कुळातील ही कूळे:

हेस्रोनचे हेस्रोनी कूळ,

हामूलचे हामूली कूळ.

22 ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.

23 इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:

तोलाचे तोलाई कूळ,

पूवाचे पुवाई कूळ.

24 याशूबचे याशूबी कूळ,

शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.

25 इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.

26 जुबुलूनच्या कुळातील कुळे:

सेरेदचे सेरेदी कूळ,

एलोनचे एलोनी कूळ,

याहलेलचे याहलेली कूळ.

27 जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.

28 योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. 29 मनश्शेच्या कुळातील कुळे:

माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.)

गिलादचे गिलादी कूळ.

30 गिलादची कूळे होती:

इयेजेराचे इयेजेरी कूळ,

हेलेकचे हेलेकी कूळ.

31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ.

शेखेमाचे शेखेमी कूळ.

32 शमीदचे शमीदाई कूळ

व हेफेरचे हेफेरी कूळ.

33 हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.

35 एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती:

शूथेलाहाचे शूथेलाही कूळ.

बेकेराचे बेकेरी कूळ

व तहनाचे तहनी कूळ.

36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता.

एरानचे कूळ एरानी.

37 ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.

38 बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:

बेलाचे बेलाई कूळ.

आशबेलाचे आशबेली कूळ.

अहीरामचे अहीरामी कूळ.

39 शफूफामचे शफूफामी कूळ.

हुफामचे हुफामी कूळ.

40 बेलाची कुळे होती:

अर्दचे अर्दी कूळ

नामानचे नामानी कूळ.

41 ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.

42 दानच्या कुळातील कुळे होती:

शूहामचे शूहामी कूळ.

हे कूळे दानच्या कुळातील होते. 43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.

44 आशेरच्या कुळातील कुळे होती:

इम्नाचे इम्नाई कूळ.

इश्वीचे इश्वी कूळ.

बरीयाचे बरीयाई कूळ.

45 बरीयाच्या कुळातील कुळे होती:

हेबेरचे हेबेराई कूळ.

मलकीएलचे मलकीएली कूळ.

46 (आशेरला सेरा नावाची मुलगी होती) 47 ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.

48 नफतालीच्या कुळातील कुळे होती:

यहसेलचे यहसेली कूळ.

गूनीचे गूनी कूळ.

49 येसेरचे येसेरी कूळ

व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.

50 ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.

51 म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.

52 परमेश्वर मोशेला म्हणाला, 53 “जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल. 54 मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल. 55 पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल. 56 प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.”

57 त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:

गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ.

कहाथचे कहाथी कूळ

मरारीचे मरारी कूळ.

58 लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:

लीब्नी कूळ.

हेब्रोनी कूळ.

महली कूळ.

मूशी कूळ.

कोरही कूळ.

अम्राम कोहाथच्या कुळातील होता. 59 अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.

60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते. 61 पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.

62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23,000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.

63 मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते. 64 खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. 65 कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.

स्तोत्रसंहिता 69

प्रमुख गायकासाठी “भूकमल” या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.

69 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव.
    पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही.
    मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे.
मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत.
    मी आता लवकरच बुडणार आहे.
मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे.
    माझा घसा दुखत आहे.
मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत
    तुझ्या मदतीची वाट पाहिली.
मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत.
    ते विनाकारण माझा तिरस्कार करतात.
    माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात.
माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात.
    मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले
    आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे.
    मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस.
    इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.
माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे.
    मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.
माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात.
    माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
    जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.
10 मी रडतो, उपवास करतो
    आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.
11 माझे दु:ख दाखवण्याकरता मी जाडेभरडे कपडे वापरतो
    आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.
12 ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात.
    मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
13 माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा,
    ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे,
तू माझा स्वीकार करावास असे मला वाटते.
    तू मला तारशील असा विश्वास मला वाटतो.
14 मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस.
    माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
    मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.
15 लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल
    खड्‌यांना माझा घास घेऊ देऊ नकोस.
    थडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.
16 परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे.
    मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे.
    तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
17 तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस,
    मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.
18 ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर.
    मला माझ्या शत्रूंपासून सोडव.
19 तुला माझी लाज ठाऊक आहे.
    माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे.
    या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
20 शरमेने मला गाडून टाकले आहे.
    लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे.
मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही.
    कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.
21 त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे.
    त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.
22 त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते.
    हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.
23 ते आंधळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो.
24 त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे.
25 त्यांची घरे रिकामी कर.
    त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस.
26 त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील,
    त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख: आणि जखमा खरोखरच असतील.
27 त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
    तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखवू नकोस.
28 जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक.
    त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.
29 मी खिन्न आणि दु:खी आहे देवा,
    मला वर उचल, मला वाचव.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन.
    मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31 यामुळे देव आनंदित होईल.
    एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात.
    या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो
    परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी,
    समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल.
    परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील.
ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36     त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल.
    ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.

यशया 16

16 तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.

मवाबच्या स्त्रिया अर्णोन नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतील.
    त्या मदतीसाठी सैरभैर धावतील.
    त्यांची स्थिती, घरटे मोडल्यामुळे जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या पाखरांप्रमाणे होईल.
त्या म्हणतात, “आम्हाला मदत करा,
    आम्ही काय करावे ते सांगा.
जशी सावली दुपारच्या उन्हापासून आपले रक्षण करते,
    तसे शत्रूपासून आमचे रक्षण करा.
आम्ही शत्रूला चुकवून पळत आहोत.
    आम्हाला लपवा.
    आम्हाला शत्रूच्या ताब्यात देऊ नका.
मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली.
    म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या.
    शत्रूंपासून त्यांना लपवा.”

लुटालूट थांबेल.
    शत्रूचा पराभव होईल.
    दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
नंतर नवा राजा गादीवर बसेल.
    तो दाविदाच्या वंशातला असेल.
    तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल.
तो खरेपणाने न्याय देईल.
    तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.

आम्ही मवाबवासीयांच्या गर्वाविषयी
    व अहंकाराविषयी ऐकले आहे.
ते दांडगट व बढाईखोर आहेत.
    पण त्यांच्या बढाया निरर्थक आहेत.
त्या गर्वामुळे सर्व देशाला दु:ख भोगावे लागेल.
    सर्व मवाबवासीयांना रडावे लागेल लोक दु:खी होतील.
पूर्वीच्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतील.
    कीर हेरेसेथमध्ये तयार झालेले अंजिराचे केक त्यांना हवे असतील.
हेशबोनमधील मळे व सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या म्हणून लोकांना वाईट वाटेल.
    परकीय राजांनी द्राक्षवेली तोडून टाकल्या.
शत्रूचे सैन्य दूर याजेरपर्यत पसरले आहे.
    ते वाळवंटापासून समुद्रापर्यंत पसरले आहे.
द्राक्षांचा नाश झाला म्हणून मी याजेर
    व सब्मे यांच्याबरोबर शोक करीन.
सुगीचा मोसम येणार नाही म्हणून मी हेशबोन
    व एलाले यांच्याबरोबर रडीन.
उन्हाळी फळे पण नसतील
    आणि हर्षोल्लास पण नसेल.
10 कारमेलमध्ये (द्राक्षमळ्यात) आनंदगान होणार नाही.
    सुगीच्या काळातील आनंद मी कोणालाही होऊ देणार नाही.
द्राक्ष मद्य काढण्यासाठी तयार आहेत
    पण ती नासून जातील.
11 म्हणून मला मवाबबद्दल आणि कीर हेरेसबद्दल फार वाईट वाटते
    या शहरांबद्दल मला खरोखरच अतिशय वाईट वाटते.
12 मवाबवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील,
    पण काय घडले ते त्यांना दिसेल.
ते इतके दुर्बल झालेले असतील
    की प्रार्थना करण्याची शक्ती त्यांच्यात नसेल.

13 मवाबबद्दलच्या ह्या गोष्टी परमेश्वराने बऱ्याच वेळा सांगितल्या. 14 आणि आता परमेश्वर म्हणतो, “तीन वर्षांत सर्व लोक आणि लोक ज्या वस्तूंचा अभिमान बाळगत होते, त्या सर्व वस्तू नाहीशा होतील. तेथे अगदी थोडे लोक उरतील.”

1 पेत्र 4

बदललेली जीवने

ख्रिस्ताने जसा शरीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला, तसेच तुम्हीसुद्धा ख्रिस्ताची जशी चित्तवृति होती तशा प्रकारच्या चित्तवृत्तीने सज्ज व्हा. मी असे म्हणतो कारण ज्याने शारीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला आहे तो पाप करण्याचे सोडून देतो. म्हणून तो या जगात राहत असता आपल्या उरलेल्या पृथ्वीवरील जीवनात मानवी वासनांच्या आहारी जाणार नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल. कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.

आता तुम्ही त्यांच्यासारखे वाहवत जात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून तुम्हांस शिव्याशाप देतात. ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील, कारण जे मेलेले आहेत त्यांनासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की, मनुष्यांप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे.

देवाने दिलेल्या देणग्यांचे चांगले कारभारी व्हा

सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा. 10 तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर करावा. वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा. 11 सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे, यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे; जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे. कारण गौरव व सामर्थ्य अनंतकालासाठी त्याचीच आहेत. आमेन.

ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन करणे

12 प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका. 13 त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. 14 जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर विसावतो. 15 म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये. 16 पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे. 17 कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?

18 आणि “जर चांगल्या माणसाचे तारण होणे अवघड आहे
    तर मग जो अधार्मिक व पापी मनुष्य आहे त्याचे काय होईल?” (A)

19 तर मग ज्यांना देवाच्या इच्छेनुसार दु:ख सोसावे लागते, त्यांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाच्या हाती आपले जीवन सोपवून द्यावे आणि त्यांनी चांगली कामे करीत राहावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center