M’Cheyne Bible Reading Plan
बलामचा पहिला संदेशS
23 बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.” 2 बलामने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.
3 नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.
4 देव त्या जागी बलामकडे आला आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बळी दिला आहे.”
5 नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्याला जाऊन सांग.”
6 तेव्हा बलाम बालाकाकडे परत गेला. बालाक अजूनही वेदीजवळ उभा होता. आणि मवाबचे सर्व पुढारी तेथे त्याच्याजवळ उभे होते. 7 नंतर बलामने हे सांगितले:
“पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन मवाबचा
राजा बालाक याने मला येथे आणले.
बालाक मला म्हणाला,
‘ये, माझ्यासाठी याकोब विरुद्ध बोल.
ये इस्राएल लोकांविरुद्ध बोल.’
8 पण देव त्या लोकांच्या विरुद्ध नाही.
म्हणून मी देखील त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही.
परमेश्वराने त्यांचे काही वाईट व्हावे असे म्हटले नाही
म्हणून मी सुद्धा तसे करु शकत नाही.
9 मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो.
मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो.
ते लोक एकटे राहतात.
ते दुसऱ्या देशाचा भाग नाहीत.
10 याकोबची माणसे कोण मोजू शकेल?
ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत.
त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही.
मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे.
त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.”
11 बालाक बलामला म्हणाला, “तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी मी तुला येथे आणले. पण तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.”
12 पण बलाम म्हणाला, “परमेश्वर जे सांगले तेच मी बोलायला पाहिजे.”
13 नंतर बालाक त्याला म्हणाला, “म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगव्व्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांच्याविरुद्ध माझ्यासाठी काही बोलू शकशील.” 14 तेव्हा बालाक बलामला पिसगाच्या माथ्यावरील सोकिमाच्या माव्व्यावर [a] घेऊन गेला. तेथे बालाकने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बळी दिला.
15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.”
16 परमेश्वर बलामकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्याला सांगितले. नंतर परमेश्वराने बलामला बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. 17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबचे पुढारी त्याच्या जवळ होते. बालाकने बलामला येताना पाहिले. आणि तो म्हणाला, “परमेश्वराने काय सांगितले?”
बलामचा दुसरा संदेश
18 नंतर बलाम या गोष्टी म्हणाला,
“बालाका उभा रहा आणि मी काय सांगतो ते ऐक.
सिप्पोरेच्या मुला, बालाका, मी सांगतो ते ऐकः
19 देव माणूस नाही.
तो खोटे बोलणार नाही.
देव म्हणजे काही माणूस नाही.
त्याचे निर्णय बदलणार नाहीत.
जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील.
तर तो ती करीलच.
जर परमेश्वराने वचन दिले तर
तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
20 परमेश्वराने मला त्या लोकांना आशीर्वाद द्यायला सांगितले,
परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला.
म्हणून मी ते बदलू शकत नाही.
21 देवाला याकोबाच्या माणसात काही चूक दिसली नाही.
इस्राएल लोकांमध्ये देवाला पाप दिसले नाही.
परमेश्वर त्यांचा देव आहे
आणि तो त्यांच्या बरोबर आहे.
थोर राजा त्यांच्या बरोबर आहे.
22 देवाने त्या लोकांना मिसर देशातून आणले.
ते रानबैला इतके शक्तिमान आहेत.
23 याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही.
इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही.
लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील:
‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
24 ते लोक सिंहासारखे शक्तिमान आहेत.
ते सिंहासारखे उठत आहेत.
तो सिंह शत्रूला खाऊन टाकल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.
तो सिंह त्याच्याविरुद्ध असलेल्या लोकांचे रक्त प्यायल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.”
25 नंतर बालाक बलामला म्हणाला, “त्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे तू म्हटले नाहीस. पण त्यांच्या बाबतीत वाईट घडावे असेही तू म्हटले नाहीस.”
26 बलाम उत्तरला, “मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगले तेच मला बोलता येईल.”
27 नंतर बालाक बलामला म्हणाला, “तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुल्या त्या लोकांना शाप द्यायची परवानगी देईल.” 28 म्हणून बालाक बलामला घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
29 बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बळी देण्यासाठी तयार कर.” 30 बलामने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बळी दिले.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र
64 देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे.
त्यांच्यापासून मला वाचव.
2 माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर.
त्या दुष्ट लोकांपासून मला लपव.
3 त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे.
त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत.
त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत.
4 ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या
आणि प्रामाणिक माणसावर फेकतात.
5 वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात.
“आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.
6 लोक अतिशय कुटिल असू शकतात.
लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे.
7 परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो
आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात.
8 वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो
आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो.
आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो.
9 देवाने काय केले ते लोक पाहातील.
ते इतरांना देवाबद्दल सांगतील,
त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल
आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.
10 परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्यक्तिला आनंद वाटतो.
तो देवावर विसंबून राहातो.
चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
65 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो.
मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
2 तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो.
आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस.
तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
3 जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात
तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
4 देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस.
आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या
सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
5 देवा, आम्हाला वाचव.
चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस.
तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस.
सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
6 देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले.
आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
7 देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले.
देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
देवाचा बाबेलोनला संदेश
13 आमोजचा मुलगा यशया ह्याला देवाने बाबेलोनबद्दल दुख:दायक हा संदेश दिला. 2 देव म्हणाला,
“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा.
लोकांना हाका मारा.
हातांनी खुणा करा.
त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”
3 देव पुढे म्हणाला, “मी त्या लोकांना इतरांपासून वेगळे केले आहे.
मी स्वतः त्याच्यावर सत्ता गाजवीन.
मी रागावलो आहे.
मी माझ्या योध्द्यांना त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, गोळा केले आहे.
मला ह्या सुखी लोकांचा अभिमान वाटतो.
4 “डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका.
खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे
कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत.
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
5 दूरच्या प्रदेशातून परमेश्वर व हे सैन्य येत आहे.
क्षितिजापलीकडून ते येत आहेत.
ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे.
हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
6 परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्तिमान देव हे घडवून आणील. 7 लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल. 8 प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्नीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
देवाचा बाबेलोनविरूध्द् न्याय
9 पाहा परमेश्वराचा खास दिवस येत आहे. तो फारच भयानक दिवस असेल. देव फारच संतप्त होईल. आणि तो देशाचा नाश करील. ह्या देशातील पापी लोकांना देश सोडण्यास तो भाग पाडील. 10 आकाश अंधकारमय होईल. सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणार नाहीत.
11 देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील. 12 दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द् सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल. 13 माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”
हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल. 14 त्या वेळी बाबेलोनमधील प्रजा घायाळ हरणाप्रमाणे पळ काढेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सैरावैरा धावतील. प्रत्येकजण आपल्या देशात व आपल्या लोकात पळून जाईल. 15 पण शत्रू त्यांचा पाठलाग करील. आणि शत्रूच्या हाती सापडणाऱ्याला शत्रू तलवारीने ठार मारील. 16 त्यांची घरे लुटली जातील. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील, त्यांच्या डोळ्यादेखत लहान मुलांना मरेपर्यंत मारले जाईल.
17 देव म्हणतो, “पाहा! बाबेलोनवर हल्ला करण्यासाठी मी मेदीचे सैन्य वापरीन. मेदीच्या सैन्याला चांदी, सोने दिले तरी ते हल्ला करीतच राहील. 18 ते बाबेलोनमधील तरूणावर हल्ला करून त्यांना मारतील मुलांना ते दया दाखविणार नाहीत. लहानग्यांची ते कीव करणार नाहीत. सदोम व गमोरा यांच्याप्रमाणे बाबेलोनचा संपूर्ण नाश होईल. देव सर्वनाश घडवून आणील मागे काहीही उरणार नाही.
19 “बाबेलोन सर्व देशांहून सुंदर आहे. बाबेलोनच्या रहिवाशांना आपल्या शहराबद्दल गर्व आहे. 20 पण बाबेलोनचे सौंदर्य टिकणार नाही. भविष्यकाळात लोक तेथे राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत. मेंढपाळ मेंढ्या चारण्यास तेथे येणार नाहीत. 21 वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची व घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील. 22 बाबेलोनच्या भव्य आणि सुंदर इमारतीतून रानकुत्री आणि लांडगे केकाटतील, बाबेलोन नष्ट होईल. त्याचा शेवट जवळ आला आहे. मी त्याचा नाश लांबणीवर टाकू देणार नाही.”
येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याजकडून
1 देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत,
जे पंत, गलतिया, कप्पदुकिया आशिया व बिथुनिया प्रांतात विखुरलेले आहेत त्या यहूदी लोकांना, 2 देवपित्याने फार पूर्वीच केलेल्या योजनेप्रमाणे आत्म्याच्याद्वारे तुम्ही पवित्र व्हावे, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहावे आणि येशूचे रक्त तुमच्यावर शिंपडून तुम्हांला शुद्ध करावे, याकरीता तुम्हाला निवडले आहे.
त्या तुम्हाला देवाची कृपा व शांति भरपूर प्रमाणात लाभो.
जिवंत आशा
3 आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. 4 आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.
5 आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. 6 वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. 7 नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
8 जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. 9 तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
10 तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेष्ट्यांनी भविष्य वर्तविले होते त्यांनी त्या तारणाबाबत फार मनःपूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली. 11 ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.
12 स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हांस आता या गोष्टी विदित केल्या. त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वतःसाठी नाही, तर आमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत.
पवित्र जीवनाकरिता पाचारण
13 म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा. 14 आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, तुम्हांला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा. 15 त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा. 16 कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.” [a]
17 आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा. 18 तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे. 19 तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे. 20 जगाच्या निर्मितिच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. पण तुमच्याकरिता या शेवटच्या दिवसात त्याला प्रकट करण्यात आले. 21 ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.
22 आता तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे. सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा. एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या. 23 जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे, तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे. 24 म्हणून पवित्र शास्त्र सांगते,
“सर्व लोक गवतासारखे आहेत
आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रानफुलासारखे आहे.
गवत सुकते,
फूल गळून पडते,
25 परंतु आमच्या प्रभूचे वचन अनंतकाळ टिकते.” (A)
आणि हाच तारणाचा संदेश आहे, जो तुम्हाला सांगितला गेला.
2006 by World Bible Translation Center