M’Cheyne Bible Reading Plan
कनानच्या लोकांबरोबर युद्ध
21 अरादचा कनानी राजा नेगेबमध्ये राहात होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांना कैद केले. 2 नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरला खास वचन दिले: “परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हाला मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.”
3 परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
पितळेचा साप
4 इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. 5 त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
6 तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मेले. 7 लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक.” तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, “एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो माणूस मरणार नाही.” 9 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या माणसाने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
मवाबाचा प्रवास
10 इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले. 11 नंतर ओबोथ सोडून त्यांनी इये-आबारीमला मवाबाच्या पूर्वेकडे वाळवंटात तळ दिला. 12 तो सोडून ते जरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला. 13 ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती. 14 म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात त पुढील शब्द लिहिले आहेतः
“…आणि सुफातला वाहेब व आर्णोनची खोरी. 15 आणि आर व रस्त्यांपर्यंतचे दऱ्यांजवळचे डोंगर हे प्रदेश मवाबच्या सरहद्दीवर आहेत.”
16 इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला व ते बएर [a] येथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. व मी त्यांना इथे पाणी देईन.” 17 नंतर इस्राएलचे लोक हे गाणे गाऊ लागले:
“विहिरींनो पाण्याने भरून जा.
त्या संबंधी गाणे गा.
18 महान लोकांनी ही विहीर खणली.
त्यांनी ही विहीर त्यांच्या राजदंडानी व काठ्यांनी खणली,
ही वाळवंटातील भेट [b] आहे.”
म्हणून लोकांनी त्या विहिर असलेल्या प्रदेशाला “मत्ताम” म्हटले.
19 लोक मत्तानहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथला गेले. 20 लोक बामोथहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. (पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते)
सिहोन आणि ओग
21 इस्राएल लोकांनी काही माणसे आमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
22 “आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कुठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कुठल्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”
23 पण सिहोन राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो वाळवंटाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
24 पण इस्राएल लोकांनी राजाला मारले. नंतर त्यांनी अर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण आम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते. 25 इस्राएल लोकांनी सगळी अम्मोनी शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजुबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला. 26 हेशबोनमध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन रहात होता. पूर्वी सीहोनने मवाबच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता. 27 त्यावरुन गायक हे गाणे गातातः
“जा व हेशबोन पुन्हा बांधा
सीहोनचे शहर भक्कम करा.
28 हेशबोनमधून आग निघाली आहे.
आग सीहोनच्या शहरातून निघाली आहे.
त्या आगीत मवाबमधले आर शहर बेचिराख झाले.
अर्णोन नदीच्या वरचे डोंगर आगीत जळाले.
29 मवाब, तुझ्या दृष्टीने हे वाईट आहे.
कमोशचे लोक नष्ट झाले.
त्याची मुले पळून गेली.
त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करुन पकडून नेले.
30 पण आम्ही अमोरी लोकांचा पराभव केला.
आम्ही त्यांची शहरे उध्वस्त केली.
हेशबोन पासून दीबोनपर्यंत नाशीम पासून मेदबाजवळच्या नोफापर्यंत.”
31 तेव्हा इस्राएल लोकांनी अमोरी लोकांच्या प्रदेशात तळ ठोकला.
32 मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांना पाठवले. मोशेने हे केल्यानंतर इस्राएल लोकांनी ते शहर जिंकले. त्यांनी त्या शहरालगतची छोटी शहरेही घेतली. जे अमोरी लोक तिथे रहात होते त्यांना इस्राएल लोकांनी तिथून जायला भाग पाडले.
33 नंतर इस्राएल लोक बाशानच्या रस्त्याला लागले. बाशानचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.
34 पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या राजाची भीती बाळगू नकोस. मी तुला त्याचा पराभव करायची परवानगी देईन. तू त्याचे सगळे सैन्य व त्याचा सगळा प्रदेश घेशील. तू हेशबोनमध्ये राहाणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”
35 म्हणून इस्राएल लोकांनी ओगचा व त्याच्या सैन्याचा पराभव केला. त्यांनी त्याला व त्याच्या मुलांना आणि त्याच्या सैन्याला मारून टाकले. इस्राएल लोकांनी त्याचा सर्व प्रदेश घेतला.
प्रमुख गायकासाठी “कराराची लिली” या चालीवर बसवलेले शिकवण्यासाठी लिहीलेले दावीदाचे मिक्ताम, अराम नहराईम आणि अराम सोबा याच्याशी तो लढला आणि क्षाराच्या खोऱ्यात परत गेल्यावर 12,000 अदोमातील सैनिकांचा त्याने पराभव केला तेव्हाचे स्तोत्र
60 देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास
आणि आमचा नाश केलास.
कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
2 तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस,
सारे जग कोलमडून पडले.
आता ते पुन्हा एकत्र आण.
3 तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास.
आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत.
4 जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास,
त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील.
5 तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव.
माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव.
6 देव त्याच्या मंदिरात म्हणाला
“मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
7 गिलाद आणि मनश्शे माझे असेल,
एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल
आणि यहुदा माझा राजदंड असेल.
8 मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल,
अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल.
मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.”
9-10 मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल?
अदोमाशी लढायला मला कोण नेईल?
देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
11 देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर.
कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
12 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो
देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे एक स्तोत्र
61 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 मी कुठेही असलो कितीही अशक्त
असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन.
तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
माझ्या शत्रूंपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे,
जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस
परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
6 राजाला भरपूर आयुष्य दे
त्याला कायमचे राहू दे.
7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे.
तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन.
ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
5 देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन. 6 पापे करणाऱ्या लोकांविरूध्द लढण्यासाठी मी अश्शूरला पाठवीन. मला त्या लोकांचा अतिशय राग आला आहे म्हणून मी अश्शूरला त्यांच्यावर चाल करून जाण्याची आज्ञा करीन. अश्शूर त्यांचा पराभव करील व त्यांची सर्व संपत्ती लुटून नेईल. रस्त्यातील कचऱ्याप्रमाणे इस्राएल अश्शूरच्या पायाखाली तुडविला जाईल.
7 “पण मी अश्शूरचा उपयोग करून घेणार आहे हे त्याला कळत नाही. मी त्याचा साधन म्हणून उपयोग करीन असे त्याच्या लक्षात येत नाही. अश्शूरला फक्त इतर लोकांचा नाश करायचा आहे, खूप राष्ट्रांचा घात करण्याचा त्याचा बेत आहे. 8 कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वतःशीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का? [a] 9 कालनो शहर कर्कमीश शहरासारखे, हमाथ अर्पादसारखे व शोमरोन दमास्कससारखे आहे. 10 मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत. 11 मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.’”
12 सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.
13 अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रांना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे. 14 पक्ष्याच्या घरट्यातून एखाद्याने सहज अंडी काढून घ्यावीत त्याप्रमाणे माझ्या ह्या दोन हातांनी ह्या सर्वांची संपत्ती घेतली आहे. पक्षी नेहमी घरटी व अंडी सोडून जातो. आणि घरट्याचे रक्षण करण्यास कोणीच नसते. तेथे एकही पक्षी चिवचिवाट करायला अथवा पंख व चोच ह्याने टोचा मारायला नसतो. त्यामुळे लोक सहज अंडी काढून घेऊ शकतात. अगदी असेच मी सर्व जगातील माणसांना लुटले. मला थांबविणारा कोणीही नव्हता.”
15 कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ नसते पण अश्शूरला मात्र वाटते की तो देवापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी व त्याबद्दल काठीने स्वतःला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे.
16 अश्शूर स्वतःला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल. 17 इस्राएलचा प्रकाश (देव) अग्नीप्रमाणे होईल. पवित्र देव ज्वालेप्रमाणे होईल. तण व काटेकुटे प्रथम जाळणाऱ्या अग्नीप्रमाणे तो असेल. 18 नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. व सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल. 19 हाताच्या बोटावर मोजण्याइतके वृक्ष जंगलात उभे असतील. लहान मूलही ते मोजू शकेल.
20 त्यावेळी याकोबचे जे वंशज इस्राएलमध्ये राहत असतील ते त्यांना मारणाऱ्या माणसावर अवलंबून राहणे सोडतील आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर मनापासून श्रध्दा् ठेवायला शिकतील. 21 याकोबाचे हे राहिलेले वंशज पुन्हा सामर्थ्यशाली देवाला अनुसरतील.
22 समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल. 23 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, निश्चित ह्या संपूर्ण प्रदेशाचा नाश घडवून आणील.
24 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोनवासीयांनो, अश्शूरला घाबरू नका. मिसरने पूर्वी तुम्हाला जसे हरविले होते तसेच अश्शूर तुम्हाला हरवील. जणू काही अश्शूर तुम्हाला काठीने मारील. 25 पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”
26 पूर्वी सर्वशक्तिमान परमेश्वराने मिद्यानला ओरेबाच्या खडकाजवळ हरविले होते, त्याप्रमाणेच परमेश्वर अश्शूरवर हल्ला करून त्याला चाबकाने फोडून काढील. पूर्वी परमेश्वराने मिसरला शिक्षा करताना, आपल्या हातातील दंडाने समुद्र दुभंगून आपल्या लोकांना समुद्रपार केले व मिसरच्या लोकांना बुडविले. अशाच तऱ्हेने परमेश्वर अश्शूरपासून आपल्या लोकांना वाचवील.
27 अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरविले जाईल. तुझे सामर्थ्य (देव) ते जोखंड मोडून टाकील.
अश्शूरच्या सैन्याचा इस्राएलवर हल्ला
28 अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील. 29 ते “उताराच्या” (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
30 बाथ गल्लीम, मोठ्याने ओरड, लईशा, ऐक, अनाथोथ, मला उत्तर दे. 31 मदमेनाचे रहिवासी पळत आहेत. गेबीमचे रहिवासी लपून बसत आहेत. 32 ह्या दिवशी सैन्य नोब येथे मुक्काम करील आणि यरूशलेममधील टेकडी सीयोन हिच्याविरूध्द लढण्याची तयारी करील.
33 लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील. 34 परमेश्वर त्याच्या कुऱ्हाडीने जंगल तोडील आणि लबानोनमधील प्रचंड वृक्ष (प्रतिष्ठित लोक) कोसळतील.
स्वतःला देवाला द्या
4 तुमच्यामध्ये भांडणे व झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय? 2 तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही. 3 आणि जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वापरता.
4 अप्रामाणिक लोकांनो, तुम्हाला हे माहीत नाही का की, जगाशी मैत्री हे देवाबरोबरचे वैर आहे. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो. 5 पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो. [a] 6 पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.” [b]
7 म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. 8 देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंतःकरणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात. 9 दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो. 10 तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
तुम्ही न्यायाधीश नाही
11 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि तो नियमशास्त्राचा न्याय करतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही व तुम्ही न्यायाधीश आहात. 12 नियमशास्त्र देणारा न्यायाधीश फक्त एकच आहे. फक्त देवच तारण करण्यास व नाश करण्यास समर्थ आहे. तू जो तुझ्या शेजाऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वतःला कोण समजतोस?
देवाला तुमच्या जीवनाची योजना करू द्या
13 ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.” 14 तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल. अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात. 15 त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.” 16 पण तुम्ही तर घमेंड बाळगता आणि बढाई मारता आणि अशी बढाई मारणे वाईट आहे. 17 म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.
2006 by World Bible Translation Center