M’Cheyne Bible Reading Plan
लोक पुन्हा तक्रार करतात
14 त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले. 2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते. 3 या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4 नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5 तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. 6 यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते. 7 या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे. 8 तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल. 9 म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
10 सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली. 11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत. 12 मी त्यांना एखाद्या भयानक आजारने मारून टाकीन. मी त्यांचा नाश करीन. मी तुझा उपयोग करुन दुसरे राष्ट्र निर्माण करीन. तुझा देश या लोकांपेक्षा मोठा आणि शक्तिमान असेल.”
13 नंतर मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू असे केलेस तर ते मिसर मधील लोक ऐकतील तुझ्या लोकांना मिसरमधून बाहेर आणण्यासाठी तू तुझ्या महान शक्तीचा उपयोग केलास हे त्यांना माहीत आहे. 14 मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे. 15 म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील. 16 ‘परमेश्वर त्या लोकांना त्याने वचन दिलेल्या प्रदेशात आणू शकत नव्हता म्हणून परमेश्वराने त्यांना वाळवंटात मारून टाकले.’
17 “प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव. 18 तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो [a] पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी [b] बद्दल शिक्षा करतो.’ 19 आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”
20 परमेश्वराने उत्तर दिले, “तू सांगितलेस त्याप्रमाणे मी लोकांना क्षमा करीन. 21 पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो. 22 मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली. 23 मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत. 24 पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल. 25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्ही ही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या वाळवंटात परत जा.”
परमेश्वर लोकांना शिक्षा करतो
26 परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, 27 “हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत. 28 म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील. 29 तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे. 30 म्हणून जो प्रदेश देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्या प्रदेशात तुमच्यापैकी कोणीही प्रवेश करणार नाही आणि कोणीही राहाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा त्या प्रदेशात जातील. 31 त्या प्रदेशातील लोक तुमची मुले नेतील अशी भीती तुम्हाला वाटली आणि त्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली. पण मी तुम्हाला सांगतो की मी ती मुले त्या प्रदेशात आणीन. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करायला नकार दिला त्या गोष्टींचा ते उपभोग घेतील. 32 आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
33 “‘तुमची मुले इथे या वाळवंटात 40 वर्षे भटकणारे मेंढपाळ असतील. त्यांना दु:ख भोगावे लागेल कारण तुम्ही माझ्याशी इमानदार नव्हता. या वाळवंटात जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्यांना दु:ख भोगावे लागेल. 34 तुम्हाला तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दु:ख भोगावे लागेल. (त्या माणसांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष) मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.’
35 “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
36 मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत. 37 इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला. 38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
लोक कनानमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात
39 मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले. 40 दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही. 42 त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल. 43 अमालेकी आणि कनानी लोक तेथे तुमच्याविरुद्ध लढतील. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही. 45 डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
असाफचे स्तोत्र
50 0परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे.
तो पृथ्वीवरील पूर्व व पश्चिमेकडील सर्व लोकांना बोलावतो.
2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही.
त्याच्यासमोर आग लागली आहे.
त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला
त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
6 देव न्यायाधीश आहे
आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
7 देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका!
इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन.
मी देव आहे.
तुमचा देव आहे.
8 मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही.
इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा.
तुम्ही मला ती रोज द्या.
9 मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही.
मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.
10 मला त्या प्राण्यांची गरज नाही.
जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे
डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
12 मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते.
मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
13 मी बैलाचे मांस खात नाही.
मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.”
14 म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली.
तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.
15 देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा.
मी तुम्हाला मदत करीन.
आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो,
“तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता.
तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता?
मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता.
स्वत:च्या भावाविषय़ी सुध्दा!
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे
तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही.
आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते.
पण मी मुळीच गप्प बसणार नाही.
मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन
आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
3 माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील. 2 तो (देव) वीरांचा व मोठ्या योध्द्या्ंना दूर करील. न्यायासनावर बसणारे, भोंदू संदेष्टे, मांत्रिक व तथाकथित वडीलधारी मंडळी इत्यादींना दुसरीकडे नेऊन ठेवील. 3 देव सैनिक शासक व शासनकर्ते यांना दूर करील. निपुण सल्लागार व जादूटोणा करून भविष्यकथन करण्याचा प्रयत्न करणारे चाणाक्ष लोक यांनाही दूर ठेवील.
4 देव म्हणतो, “तरूण मुले नेतेपदी बसतील अशी परिस्थिती मी निर्माण करीन. 5 प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत व सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”
6 त्या वेळी एखादा उठेल व आपल्या घरातील एखाद्या भावाला पकडेल व त्याला म्हणेल “तुझ्याजवळ अंगरखा आहे, तर मग ह्या विध्वंस झालेल्या अवशेषांवर तूच नेता होशील.”
7 पण तो भाऊ उभा राहील व म्हणेल, “माझ्याच घरात पुरेसे अन्न, वस्त्र नाही. मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही? तुम्ही मला तुमचा नेता करू नका.”
8 हे घडेल कारण यरूशलेम अडखळले आहे व त्याने चूक केली आहे. यहुदाने देवाला अनुसरायचे थांबवले आणि त्याचे पतन झाले. यरूशलेम व यहुदा यांची वाणी आणि कृती परमेश्वराच्या विरूध्द् आहे. परमेश्वराच्या तेजस्वी डोळ्यांना हे सर्व स्पष्टपणे दिसत आहे.
9 चुकीची कृत्ये केल्याची अपराधी भावना लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या पापांबद्दल त्यांना गर्व वाटत आहे. ते सदोम शहरातील रहिवाशांसारखे झाले आहेत. आपली पापे कोण पाहत आहे ह्याची त्यांना पर्वा नाही. हे त्यांच्या दृष्टीने फारच वाईट आहे. त्यांनी स्वतःला आपत्तीत लोटले आहे.
10 सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल. 11 पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल. 12 लहान बालके मोठ्यांचा पराभव करतील. अबलांचे राज्य येईल.
माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.
देवाचा स्वतःच्या लोकांबद्दल निर्णय
13 परमेश्वर स्वतःच लोकांचा न्यायनिवाडा करील. 14 वडीलधारी मंडळी व नेते यांनी केलेल्या कृत्यांविरूध्द् परमेश्वर न्याय देईल.
परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोकांनी द्राक्षांची बाग(यहुदा) जाळली आहे. तुम्ही गरिबांच्या वस्तू बळकावल्या व स्वतःच्या घरात भरल्या. 15 माझ्या लोकांना दुखवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरिबांना धुळीत मिळवायचा तुम्हाला काय हक्क आहे?” माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
16 परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
17 माझा प्रभु सीयोनच्या स्त्रियांच्या डोक्यांत व्रण करील. त्यांचे सर्व केस गळून पडतील. 18-23 त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.
24 आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.
25 त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील. 26 वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.
4 त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील, “आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वतः मिळवू. फक्त तू आमच्याशी लग्न कर. तुझे नाव आम्हाला लावू दे. कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर.”
2 ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर व महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल. 3 त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.
4 सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द् करील. 5 ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द् करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल. 6 हे आच्छादन म्हणजे सुरक्षित ठिकाण असेल. ते माणसाचा उन्हापासून बचाव करील तसेच सर्व प्रकारच्या पुरांपासून आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी लपून बसण्याची ती सुरक्षित जागा असेल.
विश्वास
11 आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे. 2 यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते.
3 विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
4 विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो.
5 विश्वासमुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की, त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. 6 आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
7 ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.
8 जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला. 9 विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते. 10 ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतःदेव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.
11 आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली. 12 आणि जवळजवळ मरावयास टेकलेल्या अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली.
13 हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत. 14 जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत. 15 ते जर आपण सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर त्यांना त्या देशात परत जाण्याची संधी मिळाली असती 16 परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
17-18 जेव्हा देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली, तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण केले. होय, ज्याला अभिवचने दिली होती, तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता. आणि देवाने त्याला सांगितले होते की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.” [a] 19 अब्राहामाचा असा विश्वास होता की, देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो आणि अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला.
20 इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले. 21 विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
22 आपल्या आयुष्याच्या शेवटी योसेफ विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि त्याच्या अस्थिसंबंधी काय करायचे याच्या सूचना त्याने दिल्या.
23 जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विश्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची त्यांना भीति वाटली नाही.
24-25 विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले. पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले. 26 इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यवान आहे, असे त्याने मानले. कारण तो पुढे मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता.
27 राजाच्या रागाची भिति न बाळगता, मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. 28 नाश करणाऱ्याने (देवदूताने) इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले.
29 विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
30 लोकांनी विश्वासाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
31 राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
32 मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. 33 लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली. 34 त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली. 35 स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्हा जिवंत असे मिळाले, इतरांना वेदना सोसाव्या लागल्या कारण त्यांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळावे म्हणून सुटका करून घेण्यास नकार दिला. 36 काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले. 37 त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या. 38 त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ते जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
39 या लोकांना त्यांचा विश्वासाविषयी चांगले बोलण्यात आले पण देवाने त्यांना जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही. 40 देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.
2006 by World Bible Translation Center