M’Cheyne Bible Reading Plan
वल्हांडण सण
9 मिसरमधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. परमेश्वर म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग. 3 ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्या अगोदर-संधी प्रकाशात-त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन करावे. त्यांनी ते ठरलेल्यावेळी आणि वल्हांडण सण पाळण्याच्या नियमाप्रमाणे करावे.”
4 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले. 5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या वाळवंटात संधीप्रकाशात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी हा सण पाळला; परमेश्वराने मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
6 परंतु काही लोकांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना कारण प्रेताला शिवल्यामुळे ते अशुद्ध झाले होते. म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे गेले. 7 ते लोक मोशेला म्हणले, “एका माणसाच्या प्रेताला आमचा स्पर्श झाला व आम्ही अशुद्ध झालो. त्यामुळे ठरलेल्या वेळी परमेश्वराला अर्पणे करण्यास याजकांनी आम्हाला बंदी केली. तेव्हा इतर इस्राएल लोकाबरोबर आम्हाला अर्पणे करिता येत नाहीत!”
8 मोशे त्यांना म्हणाला, “ह्या संबंधी परमेश्वराचे काय म्हणणे आहे, हे मी त्याला विचारितो.”
9 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 10 “तू इस्राएल लोकांना हे सर्व सांग की हा नियम तुम्हा करिता व तुमच्या वंशजाकरिता आहे; प्रेताला स्पर्श झाल्यामुळे एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस अशुद्ध झाला असेल किंवा एखादा माणूस त्यावेळी दूरच्या प्रवासात असेल व म्हणून त्याला ठरलेल्यावेळी वल्हांडण सण पाळता येत नसेल तरी; 11 त्याला वल्हांडण सण पाळता येईल; त्याने तो दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी संधी प्रकाशात साजरा करावा. त्यावेळी त्याने अर्पण केलेले कोंकरु, बेखमीर भाकर व कडू भाजीपाला हे खावे; 12 त्याने भोजनातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; तसेच त्याने कोंकऱ्याचे कोणतेही हाड मोडू नये. त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळावेत. 13 परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही व तो सण पाळू शकतो तर अशा माणसाने वल्हांडण सण ठरलेल्या वेळी पाळला नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे. तो अपराधी आहे म्हणून त्याला अवश्य शिक्षा व्हावी! कारण त्याने योग्य वेळी परमेश्वराला दान दिले नाही.
14 “तुमच्यामध्ये राहाणाऱ्या एखाद्या विदेशी माणसाला तुमच्याबरोबर वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराला अर्पण देण्याची इच्छा असेल तर त्याला तसे करण्यास परवानगी आहे. परंतु तो त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळून साजरा करावा. प्रत्येकसाठी स्वदेशी किंवा परदेशी सणाचे नियम सारखेच आहेत.”
ढग व अग्नि
15 ज्या दिवशी पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा कोश असलेला तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी परमेश्वराच्या ढगाने त्याच्यावर छाया केली; रात्री तो पवित्र निवास मंडपावरील ढग अग्नि सारखा दिसला. 16 तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे. 17 जेव्हा तो ढग पवित्र निवास मंडपावरील जागेवरुन हलत असे तेव्हा इस्राएल लोकही तळ हलवून त्याच्याप्रमाणे जात असत आणि जेव्हा तो थांबत असे तेव्हा त्याच ठिकाणी ते आपला तळ ठोकीत असत. अशा प्रकारे ते तळ ठोकीत असत. 18 अशा प्रकारे तळ कधी हलवावा व कधी थांबून तळ कोठे ठोकावा हे परमेश्वर इस्राएल लोकांना दाखवीत असे. जोपर्यंत ढग पवित्र निवास मंडपावर राही तोपर्यंत इस्राएल लोक आपला मुक्काम तेथेच ठेवीत. 19 कधी कधी ढग पवित्र निवास मंडपावर बरेच दिवस राही तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून मुक्काम हलवीत नसत. 20 कधी कधी ढग थोडेच दिवस पवित्र निवास मंडपावर राही, तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत. ढग हालला की ते ढगामागे जात असत. 21 कधी कधी ढग फकत रात्रीचाच पवित्र निवास मंडपावर राही व सकाळी तो हाले. तेव्हा इस्राएल लोक आपले सामान घेऊन त्याच्यामागे जात असत. 22 ढग जर पवित्र निवास मंडपावर दोन दिवस, किंवा महिनाभर किंवा वर्षभर राहिला तर लोक परमेश्वराची आज्ञा मानून तेथेच राहात असत आणि ढग हाले पर्यंत तेथून हालत नसत, मग ढग जेव्हा आपल्या जागेवरुन हाले तेव्हा लोकही तळ हलवीत. 23 तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा मानीत, परमेश्वर दाखवी तेथेच ते तळ देत आणि परमेश्वर जेव्हा हालण्यास आज्ञा देई तेव्हा लोक तळ हलवून ढगाच्या मागे जात. लोक लक्ष देऊन परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळीत.
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया सुरांवर बसवलेले मास्कील प्रीतीचे स्तोत्र
45 मी राजासाठी या गोष्टी लिहितो
तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते.
एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत
त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
2 तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस.
तू चांगला वक्ता आहेस,
म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
3 तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान,
तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.
4 तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये.
तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
6 देवा [a] तुझे सिंहासन नेहमी साठी आहे.
चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
7 तुला चांगुलपणा आवडतो
आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा,
तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा [b] राजा निवडले.
8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
9 राजांच्या मुली करवल्या आहेत.
तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या म्हणजे एक किमती
आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
लोक सदैव तुझी स्तुती करतील.
तो तिच्या सौंदर्याची स्तुती करतो
7 राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात.
कलाकाराने केलेल्या दागिन्यासारखा तुझ्या मांड्यांचा बांक आहे.
2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,
ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो.
तुझे पोट सभोवती कमलपुष्ये
ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3 तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या
जुळ्या पाडसांसारखी आहेत.
4 तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे.
तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ
असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत.
तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या
लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे.
5 तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे
आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत.
तुझे लांब मोकळे केस
राजालासुध्दा बांधून ठेवतात.
6 तू किती सुंदर आहेस! किती आल्हाददायक आहेस!
सुंदर, आनंद देणारी तरुण स्त्री!
7 तू उंच आहेस, नारळाच्या
झाडासारखी उंच आहेस.
आणि तुझे वक्ष त्या झाडावर
लागलेल्या फळांच्या घोसासारखे आहेत.
8 मला त्या झाडावर चढून
त्याच्या फांद्यांना धरायला आवडेल.
तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी
आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
9 तुझे तोंड सर्वात उंची
द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या,
झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे.
ती त्याच्याशी बोलते
10 मी माझ्या प्रियकराची आहे
आणि मी त्याला हवी आहे.
11 प्रियकरा,
ये आपण शेतावर जाऊ.
आपण खेड्यात रात्र घालवू.
12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ.
द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू.
आणि जर डाळींब बहरत असतील तर प्रियकरा,
तेथे मी तुला
माझे प्रेम अर्पण करीन.
13 पुत्रदात्रीचा वास घे
आणि आपल्या दाराजवळ असलेल्या इतर सुंदर फुलांचाही वास घे.
होय, प्रियकरा, मी तुझ्यासाठी अनेक चांगल्या आनंददायी नव्या आणि जुन्या,
गोष्टी राखून ठेवल्या आहेत.
मुख्य याजक मलकीसदेक
7 हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला. 2 व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला.
मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. 3 मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राच्या प्रतिमेशी तो हुबेहूब मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
4 यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला. 5 आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा. 6 मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्याला (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला. 7 यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
8 एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. 9 एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देत. 10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. 12 कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते. 13-14 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.
येशू हा मलकीसदेक याजकासारखा आहे
15 आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते. 16 मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने येशूला याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले. 17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस” [a]
18 जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता. 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हांला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
20 हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले. 21 पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,
“प्रभूने शपथ वाहिली आहे,
आणि तो आपले मत बदलणार नाही:
‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’” (A)
22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे.
23 तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे पुढे ते याजकपद चालवू शकले नाही. 24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो. 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
26 म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे. 27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. 28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन देण्यात आल्यामुळे पुत्र हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.
2006 by World Bible Translation Center