M’Cheyne Bible Reading Plan
पवित्र निवास मंडपाचे समर्पण
7 मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
2 त्यानंतर जे इस्राएल लोकांचे आपापल्या वंशाचे प्रमुख व कुळांचे पुढारी होते त्यांनी अर्पणे आणिली; हेच लोक शिरगणतीच्या कामात प्रमुख होते. 3 त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन व बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला व दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, 5 “तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
6 मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेवी लोकांना दिले. 7 त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. 8 त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता. 9 मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
10 मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
11 परमेश्वराने मोशेला सांगितले, “प्रत्येक दिवशी एका प्रमुखाने आपले अर्पण वेदीला समर्पण करण्यासाठी आणावे.”
12-83 बारा प्रमुखापैकी प्रत्येकाने ह्याप्रमाणे अर्पणे आणिली;
प्रत्येक प्रमुखाने पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा आणिला. ती दोन्ही धान्यार्पणाकरिता उपयोगी असलेल्या, तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेली होती. तसेच प्रत्येकाने धुपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक मोठे सोन्याचे धूपपात्र आणिले.
प्रत्येक प्रमुखाने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे नर असलेले एक कोकरु ही होमार्पणासाठी, तसेच पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यार्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक एक वर्षाची नर असलेली पाच कोंकरे आणिली.
पहिल्या दिवशी यहुदा वंशाचा प्रमुख अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे आणिली.
दुसऱ्या दिवशी इस्साखर वंशाचा सूवारचा मुलगा नथनेल ह्याने आपली अर्पणे आणिली.
तिसऱ्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे आणिली.
चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे आणिली.
पांचव्या दिवशी शिमोन वंशाचा प्रमुख सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल ह्याने आपली अर्पणे आणिली.
सहाव्या दिवशी गाद वंशाचा प्रमुख दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे आणिली.
सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे आणिली.
आठव्या दिवशी मनश्शे वंशाचा प्रमुख पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.
नवव्या दिवशी बन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे आणिली.
दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे आणिली.
अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.
बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे आणिली.
84 मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे. 85 प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ “दोन हजार चारशे” शेकेल होते. 86 अधिकृत वजनाप्रमाणे, प्रत्येकी चार औंस वजन असलेले, धुपाने भरलेले 12 सोन्याचे चमचे त्या 12 चमच्यांचे एकूण वजन सुमारे 3 पौंड होते.
87 होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते; 88 इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे व एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.
89 मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
माझा बचाव कर.
मला त्या माणसापासून वाचव.
2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
तू मला का दाखवले नाहीस?
3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन
मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5 मी इतका खिन्न का आहे?
मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
तो मला वाचवेल.
तो म्हणतो
5 माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो.
मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली.
मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले.
मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.
स्त्री प्रेमिकांशी बोलते
प्रिय मित्रांनो, खा, प्या.
प्रेमाने धुंद व्हा.
ती म्हणते
2 मी झोपलेली आहे.
पण माझे हृदय जागे आहे.
माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते.
“प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा,
माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा!
माझे डोके दवाने ओले झाले आहे.
माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.”
3 “मी माझा पोषाख काढून टाकला आहे.
मला तो पुन्हा घालायचा नाही.
मी माझे पाय धुतले आहेत.
मला ते पुन्हा घाण करायचे नाहीत.”
4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला [a]
आणि माझे हृदय त्याच्यासाठी हेलावले. [b]
5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
माझ्या हातातून गंधरस गळत होता.
इतर सुवासिक द्रव्ये माझ्या बोटांतून
कुलुपाच्या कडीवर गळत होती.
6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता.
तो गेला तेव्हा
मी जवळ जवळ गतप्राण झाले. [c]
मी त्याला शोधले
पण तो मला सापडू शकला नाही.
मी त्याला हाक मारली
पण त्याने मला ओ दिली नाही.
7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
त्यांनी मला मारले,
इजा केली.
भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी
माझा अंगरखा घेतला.
8 यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते,
जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे. [d]
यरुशलेमच्या स्त्रिया तिला उत्तर देतात
9 सुंदर स्त्रिये!
तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा?
तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का?
म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते
10 माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो.
तो दहा हजार माणसात उठून दिसेल.
11 त्याचे मस्तक शुध्द् सोन्याप्रमाणे आहे.
त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत.
13 त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत,
अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या
कमलपुष्पाप्रमाणे आहेत.
14 त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या
सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या
मऊ हस्तिदंतासारखे आहे.
15 त्याचे पाय सोन्याचा पाया
असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
तो लबानोनमधल्या गंधसरुच्या
झाडासारखा उंच उभा राहतो.
16 होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे.
त्याचे तोंड सर्वांत गोड आहे.
तोच माझा प्रियकर,
तोच माझा सखा आहे.
5 प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाने व अर्पणे देवाला सादर केली जातात, त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो. 2 प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वतः दुबळा असतो. 3 आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,
“तू माझा पुत्र आहेस
आज मी तुला जन्म दिला आहे.” (A)
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,
“मलकीसदेकाप्रमाणे
तू अनंतकाळासाठी याजक आहेस” (B)
7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला 10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.
Warning Against Falling Away
11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात. 12 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमीक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हांला दूधाची गरज आहे, सकस अन्नाची नव्हे! 13 कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते. कारण अजून तो बाळच असतो. 14 परंतु याउलट सकस अन्न हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेट ओळखण्यास तयार झालेली असतात.
2006 by World Bible Translation Center