M’Cheyne Bible Reading Plan
स्वच्छतेसंबंधीचे नियम
5 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांनी आपली छावणी आजारापासून रोगराईपासून स्वच्छ ठेवावी अशी मी आज्ञा देतो: त्यांना सांग की कोणी महारोगी, कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांना त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून दयावे; 3 मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहात आहे.”
4 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांना छावणी बाहेर काढून टाकिले.
अपराधाची भरपाई
5 परमेश्वर मोशेला म्हणाला, 6 “इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरुद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल. 7 तेव्हा त्या माणसाने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याला ती सर्व दयावी. 8 पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी माणसाने ती भरपाई परमेश्वराला अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
9 “जर कोणी इस्राएल परमेश्वराला समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल. 10 कोणी अशा देणग्या द्याव्यात असे नाही परंतु जर त्याने त्या आणिल्या तर त्या याजकाच्या होतील.”
संशयी नवरे
11 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला. 13 म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेविली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वतः तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही; 14 परंतु आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे अशी शंका कदाचित तिच्या नवऱ्याला येऊ लागेल व तो तिचा द्वेष करील; ती शुद्ध नाही व आपल्याशी विश्वासू नाही असे त्याला वाटू लागेल; 15 जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून आठ वाट्या-एक दशांश एफा जवाचे पीठ घेऊन जावे; त्या पिठावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; हे जवाचे पीठ म्हणजे परमेश्वराकरिता अन्नार्पण होय. हे द्वेषामुळे त्या माणसाने परमेश्वराला दिले आहे. आपली बायको आपल्याशी विश्वासू राहिली नाही असा त्याचा विश्वास आहे असे ह्या अन्नार्पणामुळे दिसेल.
16 “याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे. 17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी. 18 याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले सातूचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी त्याने पवित्र पाण्याचे पात्र आपल्या हातात घ्यावे; स्त्रिला पीडा देऊ शकणारे असे ते विशेष प्रकारचे प्राणी आहे.
19 “मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; ‘तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरुद्ध पाप करुन दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग ह्या अतिशय पीडा देणाऱ्या पवित्र पाण्यापासून तुला काही अपाय होणार नाही. 20 परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल-तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस. 21 म्हणून तू हे पाणी पिशील तेव्हा तुला अनेक प्रकारचा त्रास होईल तुला मूल होऊ शकणार नाही; तू गरोदर असशील तर तुझे मूल मरुन जाईल; तुझे लोक तुला बाहेर टाकतील व तुझी निंदा करतील.’
“मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे विशेष शपथ घ्यावयास सांगावे; तिने जर लबाडी केली तर ह्या सर्व वाईट गोष्टी तिच्यावर येतील असे तिने कबूल करावे; 22 याजकाने म्हणावे, ‘तुला त्रास देणारे हे पाणी तू प्यालीच पाहिजेस; जर तू पाप केले असशील तर तुला मुले होऊ शकणार नाहीत आणि जर तुझ्या उदरात मूल असेल तर ते जन्मण्यापूर्वीच मरुन जाईल.’ मग त्या स्त्रीने म्हणावे ‘आमेन’ म्हणजे आपण म्हणता तसे मला होवो.
23 “मग याजकाने दिलेल्या सुचनेचे शब्द आणि त्या स्त्रीने उच्चारलेल्या शपथेचा शब्द गुडांळी कागदावर लिहावेत व गुंडाळीवरील ते शब्द त्या पाण्यात धुवावेत. 24 मग पीडा देणारे ते शापित पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि ती अपराधी असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल.
25 “नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे. 26 मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन ते वेदीवर ठेवावे व त्याचा होम करावा. त्या नंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे: 27 जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल. ते तिच्या पोटात जाईल आणि तिला खुप त्रास होईल. तिच्या पोटात मूल असेल तर तें जन्मण्याआधीच मरेल आणि तिला कधीही मुले होणार नाहीत. सर्व लोक तिला शाप देतील. 28 परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती पूर्वीसारखीच होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल. 29 तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. 30 किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी. 31 मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने [a] पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”
प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र
39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
मी फार चिडलो होतो.
3 मी फार रागावलो होतो
आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
म्हणून मी काही तरी बोललो.
4 माझे काय होईल?
हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.
7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
तूच माझी आशा आहेस!
8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
9 मी माझे तोंड उघडणार नाही.
मी काही बोलणार नाही.
परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
मी थोड्याच वेळात जाणार आहे.
ती म्हणते
3 रात्रीच्या वेळी मी माझ्या बिछान्यात
माझे प्रेम असलेल्या पुरुषाला मी शोधते.
मी त्याला शोधले
पण तो मला सापडला नाही.
2 मी आता उठेन.
मी शहराभोवती फिरेन.
मी रस्त्यांवर आणि चौकांत
माझे प्रेम असलेल्या पुरुषाला शोधीन.
मी त्याला शोधले
पण मला तो सापडला नाही.
3 शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.
मी त्यांना विचारले, “माझे प्रेम असलेल्या पुरुषाला तुम्ही पाहिलेत का?”
4 मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.
इतक्यात मला माझे प्रेम असलेला पुरुष सापडला.
मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही.
मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले.
तिच्या खोलीत जिने मला जन्म दिला, तेथे नेले.
ती स्त्रियांशी बोलते
5 यरुशलेमच्या स्त्रियांनो, रानहरिणी
आणि मृगी यांच्या साक्षीने मला वचन द्या.
मी जो पर्यंत तयार होत नाही
तो पर्यंत प्रेम जागवू नका, प्रेम जागृत करु नका.
तो आणि त्याची वधू
6 खूप लोकांच्या समूहाबरोबर
वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे?
गंधरस व ऊद आणि इतर सूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या धुरासारखे
त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.
7 ही बघ, शलमोनाची प्रवासाला जाण्याची खुर्ची!
साठ सैनिक, इस्राएलचे शक्तिमान
सैनिक तिचे रक्षण करीत आहेत.
8 ते सगळे प्रशिक्षित लढवय्ये आहेत.
त्यांच्या बाजूला त्यांच्या तलवारी आहेत.
रात्री येणाऱ्या कुठल्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
9 राजा शलमोनाने स्वतःसाठी प्रवासी खुर्ची तयार केली.
लाकूड लबानोनहून आणले.
10 चांदीचे खांब केले.
पाठ सोन्याची केली.
बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली.
त्यावर यरुशलेमच्या स्त्रियांनी प्रेमाने कलाकुसर केली.
11 सियोनेच्या स्त्रियांनो, बाहेर या,
आणि राजा शलमोनाला पाहा.
ज्या दिवशी त्याचे लग्न झाले,
ज्या दिवशी तो खूप आनंदी होता,
त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
येशू मोशेपेक्षा महान आहे
3 म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे. 2 ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता. 3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. 4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे. 5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली. 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत.
आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,
“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
8 तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.
ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये
देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले,
तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
10 त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो,
‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात,
या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’
11 म्हणून रागाच्या भरात मी शपथ वाहून म्हणालो,
‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’” (A)
12 सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात. 13 उलट, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. 14 कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर 15 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:
“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत;
तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” (B)
16 ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते? 17 आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
18 कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? 19 म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.
2006 by World Bible Translation Center