M’Cheyne Bible Reading Plan
कहाथी कुळाची कामे
4 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, 2 “लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या लोकांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते) 3 सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची दर्शनमंडपात सेवा करण्यासाठी गणती कर. 4 दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूची त्यांनी काळजी घ्यावी.
5 “इस्राएल लोक आपला तळ नवीन जागी हलवितील तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपात जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने पवित्र कराराचा कोश झाकावा. 6 मग त्यांनी ह्या सर्वावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व मग कराराच्या कोशाला दांडे लावावे.
7 “मग त्यांनी पवित्र मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे पवित्र भाकरही त्यावर ठेवावी. 8 मग त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या उत्तम कातड्याने झाकून टाकावे; त्यानंतर मेजाला दांडे बसवावे.
9 “मग त्यांनी दीपवृक्ष आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी. 10 मग ह्या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या उत्तम कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या खांबांवर त्यांनी ठेवावे.
11 “त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या उत्तम कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.
12 “मग पवित्र स्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
13 “मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व तिच्यावर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे. 14 नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी व कटोरे हे वेदीचे सर्व सामान गोळा करुन ते वेदीवर ठेवावे; मग तिच्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
15 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.
16 “पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व सामान व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
17 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, 18 “सावध राहा! कहाथी लोकांचा नाश होऊदेऊ नका; 19 तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे व ते दाखवावे. 20 जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील व पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”
गेर्षोनी कुळाची कामे
21 परमेश्वर मोशेला म्हणाला, 22 “गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्याप्रमाणे त्यांची यादी कर; 23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाच्या ज्या लोकांनी सैन्यात सेवा केली आहे अशा लोकांची गणती कर; दर्शनमंडपाची देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे राहील.
24 “गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशी: 25 त्यांनी पवित्र निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि तलमशा उत्तम कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, 26 पवित्रनिवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराजा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि ह्या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे; 27 अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी. त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी. तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी. ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे 28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्यावर त्यांच्या कामाची जबाबदारी राहील.”
मरारी कुळाची कामे
29 “मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्या प्रमाणे गणती कर. 30 म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दलात सेवा केलेल्या पुरुषांची गणती कर. हे लोक दर्शनमंडपातील विशेष सेवा करतील. 31 तुम्ही जेव्हा पुढील प्रवासासाठी निघाल तेव्हा दर्शनमंडपाचा सांगाडा वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे. 32 तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या माणसांच्या नावांवी यादी करा व प्रत्येकाने नेमके काय वाहून न्यायचे ते त्याला सांगा. 33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.”
लेवी वंशाची कुळे
34 मोशे, अहरोन व इस्राएल लोकांचे पुढारी ह्यांनी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली. 35 त्यांनी, सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. दर्शनमंडपासाठी त्यांना खास काम दिले गेले होते.
36 हे काम करण्यास दोन हजार सातशे पन्नास कहाथी लोक पात्र ठरले. 37 तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र सेवा करण्याचे काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्या प्रमाणे हे केले.
38 तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली; 39 म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. त्यांना दर्शनमंडपासाठी करण्यासाठी विशेष काम दिले गेले होते. 40 तेव्हा दर्शनमंडपात काम करण्यास दोन हजार सहाशें तीस गेर्षोनी लोक पात्र ठरले. 41 तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
42 त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली, 43 म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. 44 तेव्हा तीन हजार दोनशें मरारी लोक दर्शनमंडपात काम करण्यास पात्र ठरले. 45 तेव्हा त्यांना त्यांचे विशेष काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
46 तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यांनी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली. 47 तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले. 48 त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती. 49 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची गणती करण्यात आली; प्रत्येक माणसाला त्याने स्वतः करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.
स्मरण दिवसाचे दावीदाचे स्तोत्र.
38 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस
तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस
तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे.
मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस.
त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे
आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
5 मी मूर्खपणा केला आता
मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे
आणि मी दिवसभर उदास असतो.
7 मला ताप आला आहे
आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
8 मी फार अशक्त झालो आहे
मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे
उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
10 माझे हृदय धडधडत आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे
आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र
आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत.
माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत.
ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे.
मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे.
मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर.
देवा, तूच माझ्यावतीने बोल.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील.
मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुका केल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे.
हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले.
मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत
आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात
आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या.
मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला
परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस.
देवा माझ्याजवळ राहा.
22 लवकर ये आणि मला मदत कर.
माझ्या देवा मला वाचव!
2 मी शारोनाचे कुंकुमपुष्प (गुलाबपुष्प) आहे.
दरीतले कमलपुष्प आहे.
तो म्हणतो
2 प्रिये इतर स्त्रियांमध्ये
तू काट्यांतल्या कमलीपुष्पासाखी आहेस.
ती म्हणते
3 प्रियकरा इतर पुरुषांमध्ये
तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.
ती स्त्रियांशी बोलते.
मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते.
त्याचे फळ मला गोड लागते.
4 माझ्या सख्याने मला द्राक्षारसाच्या घरात आणले.
माझ्यावर प्रेम करायची त्याची इच्छा होती.
5 मनुका देऊन माझ्यात शक्ती आणा.
सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा.
कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
6 माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे
आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे.
7 यरुशलेमच्या स्त्रियांनो मला वचन द्या.
तुम्हाला वनातील हरिणींची
आणि रानमृगांची शपथ घालून विनवते की माझी तयारी होईयर्पंत [a] प्रेम जागृत करु नका.
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [b] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
14 माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या,
पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा,
मला तुला बघू दे.
तुझा आवाज ऐकू दे.
तुझा आवाज अतिशय गोड आहे
आणि तू खूप सुंदर आहेस.
ती स्त्रियांशी बोलते
15 आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा.
लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या
मळ्यांचा नाश केला आहे.
आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत.
16 माझा प्रियकर माझा आहे
आणि मी त्याची.
माझा सखा कमलपुष्पांवर जगतो.
17 जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो
आणि सावल्या लांब पळून जातात
प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्या [c]
हरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.
आमचे तारण नियमशास्त्रापेक्षा मोठे आहे
2 त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये. 2 कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. 3 तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
त्यांचे तारण करण्यासाठी ख्रिस्त मनुष्यांसारखा झाला
5 जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. 6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:
“मनुष्य कोण आहे की ज्याची
तुला चिंता वाटते?
किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की
ज्याचा तू विचार करावास?
7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (A)
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही. 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (B)
13 तो आणखी म्हणतो,
“मी माझा विश्वास देवावर ठेवीन.” (C)
आणि तो पुन्हा म्हणतो,
“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” (D)
14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16 कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17 या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
2006 by World Bible Translation Center