M’Cheyne Bible Reading Plan
अहरोनाचे कुटुंब याजक घराणे
3 परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ अशी:
2 अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार. 3 अहरोनाचे हे मुलगे याजक ह्यां नात्याने परमेश्वराची पवित्र सेवा करण्यासाठी निवडले होते व त्यांचा अभिषेक करण्यात आला होता; 4 परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात मरण पावले. त्यांनी परमेश्वराकरिता यज्ञ अर्पण केला परंतु त्यासाठी त्यांनी परमेशवराला मान्य नसलेल्या प्रकारे अग्नीचा उपयोग केला. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामर हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
लेवी याजकांचे मदतनीस
5 परमेशवर मोशेला म्हणाला, 6 “लेवी वंशातील सर्व लोकांना अहरोन याजकाकडे आण म्हणजे ते त्याचे मदतनीस होतील. 7 अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील. 8 इस्राएल लोकांनी दर्शनमंडपातील सर्व वस्तूचे रक्षण करावे. ते त्यांचे काम आहे परंतु त्या वस्तूची निगा राखण्यामुळे लेवी लोक इस्राएल लोकांची मदत करतील. पवित्रनिवास मंडपात त्यांनी ह्याप्रकारे सेवा करावी.
9 “लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
10 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी दुसरा पवित्र वस्तूच्याजवळ येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करु लागला तर त्याला जिवे मारावे.”
11 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला, 12 “इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील तेव्हा आता इतर इस्राएल लोकांना त्यांचे प्रथम जन्मलेले मुलगे मला द्यावे लागणार नाहीत. 13 जेव्हा तुम्ही मिसर देशात होता तेव्हा त्या मिसरच्या लोकांचे प्रथम जन्मलेले मुलगे मी मारुन टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी घेतले. ते माझेच आहेत. परंतु तुमची प्रथम जन्मलेली मुले तुमचीच राहातील व फकत लेवी माझे होतील. मी परमेश्वर आहे.”
14 परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला, 15 “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.” 16 म्हणून मोशेने देवाची आज्ञा मानून त्यांची गणती केली.
17 लेवीला गेर्षोन, कहाथ व मरारी नांवाचे तीन मुलगे होते.
18 प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता.
गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.
19 कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
20 मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी.
ही लेवी कुळातील घराणी होत.
21 गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे. 22 ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते. 23 गेर्षोने कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासस्थानाच्या मागे आपले डेरे ठोकले. 24 लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता. 25 दर्शन मंडपातील पवित्र निवास मंडप, बाह्य मंडप आणि आच्छादन यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. दर्शन मंडपाच्या प्रवेश द्वारावरील पडद्याचीही निगा त्यांच्यावर सोपवली होती. 26 पवित्र निवास मंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान ह्यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
27 कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे. 28 हया कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले. 29 त्यांना पवित्र निवास मंडपाचा दक्षिणेकडचा भाग देण्यात आला, तेव्हा तेथे त्यांनी आपली छावणी उभारली. 30 उजीयेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता. 31 पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
32 अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपविले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
33 मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे. 34 ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते. 35 अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. ह्या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली. 36 मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले; 37 तसेच पवित्र निवास मंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका-उथळ्या-मेखा आणि तणाव्याचे दोर ह्यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
38 मोशे, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
39 लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.
लेवी लोक इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांची जागा घेतात
40 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर; 41 आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्या ऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
42 तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली. 43 मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
44 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला, 45 “मी परमेश्वर तुला अशी आज्ञा देतो की इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे; आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी मी लेवी लोकांचे पशू घेतो, कारण लेवी माझे लोक आहेत. 46 लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर मुलगे अधिक शिल्लक राहातात. 47 त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येककडून पवित्र स्थानातील अधिकृत चलणाप्रमाणे पाच शेकेल चांदी प्रत्येकी 273 जणांसाठी घे. (एक शेकेल म्हणजे वीस गेरा) इस्राएल लोकांकडून ही चांदी घे, 48 व ती अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांनी सोडविलेल्या दोनशें त्र्याहत्तर प्रथम जन्मलेल्या लोकांनी दिलेले ते सोडवणुकीचे पैसे होत.”
49 तेव्हा मोशेने त्या दोनशे त्र्याहत्तर लोकांकडून पैसे गोळा केले. ह्या दोनशेत्र्याहत्तर लोकांची जागा घेण्यास लेवी लोकाकडे कोणी उरले नव्हते. 50 इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ह्या लोकांकडून अधिकृत पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशें पासष्ट शेकेल चांदी गोळा केली. 51 परमेश्वराने सांगितलेले मोशेने ऐकले व त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने ती चांदी-ते पैसे-अहरोन व त्याच्या मुलांना दिले.
37 तू दुष्टांवर चिडू नकोस.
वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या
आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास
तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे
तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
5 परमेश्वरावर अवलंबून राहा.
त्याच्यावर विश्वास ठेव.
आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
6 परमेश्वर तुझा चांगुलपणा
आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा
दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस.
तुला स्वत:ला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे.
परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत.
तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
आणि ते शांती व समाधानात जगतील.
12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
13 परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो.
त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात.
त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल
व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या
जमावापेक्षा चांगले असतात.
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल
आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.
18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो
त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही.
भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत
आणि त्या माणसांचा नाश होणार आहे
त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील.
त्यांचा संपूर्ण नाश होईल.
21 वाईट माणूस पैसे चटक्न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही.
परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
23 परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो.
परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल
तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे.
आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही
चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो
आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
27 जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास
आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील.
28 परमेश्वराला न्याय आवडतो.
तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही.
तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल
पण दुष्टांचे निर्दालन करेल.
29 चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
ते सदैव त्या जमिनीवर राहातील.
30 चांगला माणूस चांगला उपदेश करतो
आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.
31 परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते.
तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.
32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
33 परंतु परमेश्वर त्यांना तसे करु देत नाही.
तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही.
34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा.
त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल
आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.
35 मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा
दुष्टमाणूस पाहिला होता.
36 परंतु नंतर तो नाहीसा झाला,
मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
37 शुध्द आणि सत्यवादी राहा
शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल.
38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल.
आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.
39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो
ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले
लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.
1 शलमोनाचे सर्वांत सुंदर गीत
प्रेयसी आपल्या प्रियकरास:
2 चुंबनांनी मला झाकून टाक कारण
तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
3 तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे,
पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे.
त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4 मला तुझ्याबरोबर ने.
आपण पळून जाऊ.
राजाने मला त्याच्या खोलीत नेले.
यरुशलेममधील स्त्रिया पुरुषाला
आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ.
तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव.
तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
ती स्त्रियांशी बोलते
5 यरुशलेमच्या मुलींनो,
मी काळी आणि सुंदर आहे.
मी तेमान आणि शलमोनाच्या तंबूंसारखी काळी आहे.
6 मी किती काळी आहे,
सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका.
माझे भाऊ माझ्यावर रागावले होते.
त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली.
त्यामुळे मला स्वतःची [a] काळजी घेता आली नाही.
ती त्याच्याशी बोलते
7 मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते.
मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस?
तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस?
मी तुझ्याबरोबर यायला हवे.
नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
तो तिच्याशी बोलतो
8 तू खूप सुंदर स्त्री आहेस.
काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे.
मेंढ्यांच्या मागे मागे जा.
तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल.
9 फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडी [b] जशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस. [c]
त्या घोड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत.
10-11 हे तुझ्यासाठी केलेले अलंकार:
डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार.
तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे.
ती म्हणते
12 माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर
लवंडलेल्या राजापर्यंत जातो.
13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात
असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
14 माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील
मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे.
तो म्हणतो
15 प्रिये, तू किती सुंदर आहेस!
तू फारच सुंदर आहेस.
तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
ती म्हणते
16 प्रियकरा, तू सुध्दा् सुस्वरुप आहेस
आणि मोहक आहेस.
आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत.
छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहेत.
देव त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे
1 भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. 2 पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला. 4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की:
“तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुझा पिता झालो आहे.” (A)
देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,
“मी त्याचा पिता होईन,
व तो माझा पुत्र होईल.” (B)
6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,
“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.” (C)
7 देवदूताविषयी देव असे म्हणतो,
“तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो,
आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.” (D)
8 पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,
“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे,
आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
9 नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस.
म्हणून देवाने तुझ्या देवाने,
तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.” (E)
10 आणि देव असेही म्हणाला,
“हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास,
आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील
ते कापडासारखे जुने होतील.
12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील,
तू त्यांना कपड्यासारखे बदलशील,
पण तू नेहमी सारखाच राहशील,
आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.” (F)
13 तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,
“तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बैस.” (G)
14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?
2006 by World Bible Translation Center