M’Cheyne Bible Reading Plan
छावणीची व्यवस्था
2 परमेश्वर, मोशे व अहरोन यांना म्हणाला, 2 “इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाभोवती आपापले तंबू ठोकावेत; प्रत्येक दलाला आपले स्वतःचे निशाण असावे आणि प्रत्येकाने आपापल्या दलाच्या निशाणाजवळ आपला तंबू ठोकावा.
3 “यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा. 4 त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
5 “इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा. 6 त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते.
7 “जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा. 8 त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.
9 “यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.
10 “पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा. 11 त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.
12 “शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा. 13 त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते.
14 “गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा. 15 त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशें पन्नास लोक होते.
16 “रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशें पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.
17 “त्यानंतर इस्राएलचे लोक हालल्यावर लेवीच्या लोकांनी मुक्काम हलवावा (यहूदा आणि रऊबेन नंतर) दर्शनमंडप त्यांच्याबरोबर असावा व तो इतर छावण्याच्या लोकांच्या मध्ये असावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या ठोकाव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.
18 “एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा. 19 त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
20 “मनश्शेवंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शेवंशाचा प्रमुख सरदार असावा. 21 त्याच्या दलात बत्तीस दोनशें लोक होते.
22 “बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा. 23 त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते.
24 “एफ्राइम वंशाच्या छावणीत एकण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.
25 “दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा दानवंशाचा सरदार असावा. 26 त्याच्या दलात बासष्ट हजार सातशें लोक होते.
27 “आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. 28 त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.
29 “नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा. 30 त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशें लोक होते.
31 “दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशें लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.”
32 अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती. 33 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.
34 तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.
प्रमुख वादकासाठी परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र.
36 वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो, “मी देवाला भिणार नाही,
त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
2 तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो
त्याला स्वत:च्या चुका दिसत नाहीत म्हणून
तो क्षमेची याचना करीत नाही.
3 त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते
तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
4 सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो.
तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही.
परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे.
तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे
तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे.
परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे.
माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो.
तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते.
तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. [a]
11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस.
वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
12 त्याच्या थडग्यावर “इथे वाईट लोक पडले,
त्यांना चिरडण्यात आले,
ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.
असे लिहून ठेव.”
वृध्दत्वाचे प्रश्न
12 तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले” [a] असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.
2 सूर्य, चंद्र आणि तारे तुमच्या नजरेला दिसणार नाहीत अशी वेळ येण्याआधी. तरुणपणीच आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा. संकटे तर पाठोपाठ येणाऱ्या वादळाप्रमाणे पुन्हा पुन्हा येत राहतात.
3 त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत. 4 तुम्हाला नीट ऐकूही येणार नाही. तुम्हाला रस्त्यावरचा गोंधळ ऐकू येणार नाही. धान्य दळताना येणारा जात्याचा आवाज देखील तुम्हाला शांत वाटेल. बायकांची गाणी तुम्ही ऐकू शकणार नाही. पण साध्या पक्ष्याच्या गाण्याचा आवाजसुध्दा् तुम्हाला सकाळी जाग आणील. कारण तुम्ही झोपू शकणार नाहीत.
5 तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वतःला ओढाल. तुमची जगण्याची इच्छा [b] नाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोक [c] अत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.
मृत्यू
6 तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा.
चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी,
तळाशी फुटलेल्या काचेच्या भांड्यासारखे
तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी,
विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे
तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
7 तुमचे शरीर मातीपासून निर्माण झाले
आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचे शरीर परत मातीला मिळेल.
पण तुमचा आत्मा देवाकडून आला
आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचा आत्मा परत देवाकडे जाईल.
8 सगळ्या गोष्टी इतक्या निरर्थक आहेत. गुरू म्हणतात की हे सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
सारांश
9 गूरू अतिशय शहाणे होते. त्यांनी त्यांचे शहाणपण लोकांना शिकवायला वापरले. गुरूंनी शहाणपणाच्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांची नीट रचना केली. [d] 10 त्यांनी योग्य शब्द शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी खऱ्या आणि विसंबण्याजोग्या शिकवणुकी लिहिल्या.
11 विद्वान माणसाचे शब्द हे प्राण्यांना योग्य मार्गाने नेणाऱ्या चाबकासारखे असतात. ती शिकवण न तुटणाऱ्या खुंट्यासारखी असते. तुम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखविण्यासाठी तुम्ही त्या शिकवणुकीवर विश्वास ठेवू शकता. शहाणपणाच्या त्या सर्व गोष्टी त्या एकाच मेंढपाळाकडून (देवाकडून)येतात. 12 म्हणून मुला. त्या शिकवणुकींचा अभ्यास कर पण इतर पुस्तकांविषयी सावध रहा. लोक नेहमी पुस्तके लिहीत असतात. आणि खूप अभ्यास तुम्हाला कंटाळा आणेल.
13-14 आता या पुस्तकांत [e] लिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का? कारण देवाला लोक करतात त्या सर्व गुप्त गोष्टी सुध्दा माहीत असतात. त्याला सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टीं विषयी माहिती असते. लोकांनी केलेल्या गोष्टींचा तो न्यायनिवाडा करील.
1 ख्रिस्त येशूकरीता कैदी झालेला पौल, व आपला बंधु तिमथ्य यांजकडून, आमचा प्रिय बंधु व सहकारी फिलेमोन
2 आणि आमची बहीण अफ्फिया, अर्खिप्प, आमचा सहसैनिक, आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते, यांना:
3 देव आमचा पिता याजपासून व प्रभु येशू ख्रिस्तापासून कृपा व शाति असो.
फिलेमोनचे प्रेम आणि विश्वास
4 जेव्हा मी प्रार्थनेत तुझी आठवण करतो, तेव्हा नेहमी मी माझ्या देवाचे उपकार मानतो. 5 कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो, 6 मी अशी प्रार्थना करतो की, ज्या विश्वासाचा सहभागी तू आमच्याबरोबर आहेस, तो विश्वास आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमधील सर्व चांगल्या गोष्टी त्या सखोलपणे समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करोत. 7 तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंतःकरणे संजीवित झाली आहेत.
अनेसिमचा भाऊ म्हणून स्वीकार कर
8 म्हणून, जरी मी तुझा बंधु म्हणून तुला तुझे योग्य कर्तव्य करण्याविषयी आज्ञा करुन सांगण्याचे धैर्य असले, तरी 9 प्रेमामुळे मी तुला आवाहन करणे पसंत करतो. मी पौल, एक वृद्ध मनुष्य म्हणून जसा आहे तसा स्वतःला सादर करतो आणि आता ख्रिस्त येशूमधील कैदीसुद्धा असलेला असा,
10 मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनेसिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो, त्याजविषयी कळकळीने विनवितो की, 11 पूर्वी तो तुला निरुपयोगी होता पण आता तो तुलाच नाही तर मलासुद्धा उपयोगी आहे. [a]
12 मी त्याला तुझ्याकडे परत पाठवीत आहे. मी असे म्हणायला हवे की, मी त्याला पाठवीत असताना जणू काय माझे ह्रदयच पाठवित आहे. 13 त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी. 14 परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते. यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे.
15 कदाचित त्याला थोड्या काळासाठी तुझ्यापासून दूर घेतले जाणे यासाठी झाले असावे की, तू त्याला कायमचे तुझ्याजवळ घ्यावे. 16 एक गुलाम म्हणून नव्हे, उलट गुलामापेक्षाही चांगला एक भाऊ म्हणून घ्यावे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. पण तू त्याच्यावर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करशील, फक्त एक मनुष्य म्हणूनच नव्हे, तर प्रभूमधील एक बंधु म्हणून.
17 तर जर मग तू मला खरोखर भागीदार समजतोस, तर माझे स्वागत जसे तू केले असतेस तसे त्याचे स्वागत कर. 18 आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव. 19 मी, पौल, हे माझ्या स्वतःच्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वतःचे जीवन तू मला देणे लागतोस.) 20 होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंतःकरण उल्हासित कर. 21 तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे म्हणून मी तुला लिहीत आहे. मला माहीत आहे की, मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील.
22 शिवाय कृपा करुन माझ्या विश्रांती करिता खोली तयार करुन ठेव. कारण माझा विश्वास आहे की, तुमच्या प्रारथ्रनांचा परीणाम म्हणून मला सुरक्षितरीच्या तुमच्या स्वाधीन करण्यात येईल.
Final Greetings
23 येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास 24 तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक जे माझे सहकाही आहेत, ते सलाम सांगतात.
25 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center