Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 1

मोशे इस्राएल लोकांची शिरगणती करतो

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर. वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा. प्रत्येक वंशातला एकजण तुम्हाला मदत करील तो त्या वंशाचा प्रमुख असेल. तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही:

रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;

शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;

यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;

इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;

जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;

10 योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.

11 बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान;

12 दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;

13 आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;

14 गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;

15 नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;”

16 हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले. 17 प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे व अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले; 18 आणि त्यांनी सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमविले; मग त्यांच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली. 19 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.

20 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र-थोरला मुलगा-रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्यांच्याप्रमाणे करण्यात आली. 21 ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.

22 शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; 23 ती मोजदाद एकूण एकुणसाठ हजार तीनशे भरली.

24 गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; 25 ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली.

26 यहुदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली; 27 ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.

28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली; 29 ती मोजदाद एकूण चोपन्न हजार चारशे भरली.

30 जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली; 31 ती मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.

32 योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; 33 ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली.

34 मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; 35 ती मोजदाद एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.

36 बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; 37 ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली.

38 दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; 39 ती मोजदाद एकूण बासष्ट हजार सातशे भरली.

40 आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; 41 ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.

42 नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली. 43 ती मोजदाद एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.

44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली. 45 त्यांनी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली. 46 ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.

47 इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही. 48 परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, 49 “लेवी कुळांच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करुं नको; 50 लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी. 51 जेव्हा जेव्हा पवित्र निवास मंडप हलवावयाचा असेल तेव्हा तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; लेवी कुळापैकी नसलेला कोणी जर पवित्रनिवास मंडपाच्या सेवेचा प्रयत्न करु लागलां तर त्याला जिवे मारावे. 52 इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ ठोकावेत. 53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”

54 परमेशवराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.

स्तोत्रसंहिता 35

दावीदाचे स्तोत्र.

35 परमेश्वरा माझ्या लढाया लढ.
    माझे युध्द कर.
परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल.
    ऊठ आणि मला मदत कर.
भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी
    माझा पाठलाग करणाऱ्या लोकांशी लढ
परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”

काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत
    त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर.
    त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते
लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत.
    त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव.
    परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
    परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.
मी काहीही चूक केली नाही तरी
    त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
    त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे.
    एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन.
    त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.
10 माझी सर्व हाडे म्हणतील,
    “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा,
तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
    तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”
11 साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे.
    ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.
12 मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील.
    परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे.
13 जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले,
    अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले.
    त्यांच्यासाठी प्रार्थना करुन मी हेच मिळवले का?
14 मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले.
    मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखे वागवले.
आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे.
    त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.
15 परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते.
    मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो
परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
16 त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली.
    त्यांनी माझ्यावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.

17 परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?
    ते लोक माझा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव, माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत.

18 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.
    मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.
19 माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत.
    त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल. [a]
20 माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत.
    या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत.
21 माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलत आहेत.
    ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.”
22 परमेश्वरा, काय घडत आहे
    ते तुला तरी दिसतं आहे ना?
    मग गप्प बसू नकोस मला सोडून जाऊ नकोस.
23 परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा,
    माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय दे.
24 परमेश्वरा, देवा तुझ्या न्यायी बुध्दीने मला न्याय दे
    त्या लोकांना मला हसू देऊ नकोस.
25 “आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस.
    परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
26 माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे.
    माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते
ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते.
    म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.
27 काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते.
    ते सर्व लोक सुखी होवोत
ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे
    त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”

28 म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन.
    मी रोज तुझी स्तुती करेन.

उपदेशक 11

संकटांचा सामना दृढतेने करा

11 जिथे जिथे जाल तिथे तुम्ही चांगल्या गोष्टी करा. [a] तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी कराल त्या तुमच्याकडे परत येतील.

तुमच्याकडे जे काही आहे त्याची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा [b] पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हाला कल्पना नसते.

तुम्ही पुढील गोष्टींबद्दल खात्री बाळगा. जर ढग पाण्याने भरलेले असतील तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. झाड जर उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जिथे पडते तिथेच राहते.

पण काही गोष्टींविषयी तुम्हाला खात्री नसते. त्याबाबतीत तुम्हाला संधी शोधावी लागते. जर एखादा माणूस चांगल्या हवामानाची वाट बघत बसला तर तो कधीच पेरणी करू शकणार नाही. आणि जर एखादा माणूस प्रत्येक ढगाकडून पाऊस पाडण्याची अपेक्षा करू लगला तर त्याला आपले पीक कधीच घेता येणार नाही.

वाऱ्याची दिशा तुम्हाला माहीत नसते. आणि आईच्या शरीरात तिचे बाळ कसे वाढते ते आपल्याला माहीत नसते. त्याच प्रमाणे देव काय करील तेही तुम्हाला माहीत नसते. सर्व गोष्टी तोच घडवून आणतो.

म्हणून अगदी पहाटेलाच पेरणीला सुरुवात करा आणि संध्याकाळपर्यंत थांबू नका. का? कारण कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवेल हे तुम्हाला माहीत नसते. कदाचित तुम्ही जे जे काही कराल ते ते यशस्वी होईल.

जिवंत असणे चांगले असते. सुर्याचा प्रकाश पहाणे छान असते. तुम्ही कितीही जगलात तरी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक दिवस उपभोगला पाहिजे. पण तुम्ही मरणार आहात याची आठवण ठेवा. तुम्ही जिवंत असाल त्यापेक्षा अधिक काळ मेलेले असाल. आणि मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.

तुम्ही तरुण आहात तो पर्यंत देवाची सेवा करा

तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा. 10 रागाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि शरीराला पाप करायला प्रवृत्त करू नका. [c] आयुष्याच्या पहाटे तरुण असताना लोक मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात.

तीताला 3

जगण्याचा योग्य मार्ग

सत्ताधीश, आणि अधिकारी यांच्या अधीन राहण्या विषयी व त्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी व प्रत्येक चांगले काम करण्यास तयार राहण्याविषयी, कोणाचीही निंदा न करण्याविषयी, भांडण टाळण्याविषयी आणि सर्व माणसांना मोठी नम्रता दाखविण्याविषयी त्यांना सतत आठवण करून देत राहा.

मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो. पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो. देवाने तो पवित्र आत्मा आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे विपुलपणे आम्हावर ओतला. यासाठी की, आता देवाकडून त्याच्या कृपेमध्ये आम्ही निर्दोष घोषित केले जावे. अनंतकाळच्या जीवनाच्या आशेने आम्ही त्याचे वारस व्हावे. ही शिकवण विश्वसनीय आहे.

आणि यावर जोर द्यावा असे मला वाटते. यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी लोकांसाठी चांगल्या व हिताच्या आहेत.

परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळीसंबंधी चर्चा, भांडणे, नियमशास्त्राविषयीचा झगडा टाळ. करण ते निष्फळ व निरर्थक असे आहेत. 10 एकदोन वेळा बोध करून, फूट पाडणाऱ्या व्यक्तीला टाळा. 11 कारण तुला माहीत आहे की, असा मनुष्य वाइटाकडे वाहवत गेला आहे व तो पाप करीत आहे व त्याने स्वतःलाच दोषी ठरविले आहे.

लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी

12 जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे. 13 जेना वकील व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासासाठी ज्याची गरज भासेल ती पुरविण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. यासाठी की, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. 14 आपल्या लोकांनी चांगली कृत्ये करण्याविषयी शिकले पाहिजे यासाठी की तातडीच्या गरजा भागविल्या जाव्यात, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.

15 माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. विश्वासामध्ये आम्हावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सलाम सांग.

देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center