M’Cheyne Bible Reading Plan
नवस महत्वाचे आहेत
27 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे: 3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे आसावे, 4 आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे; 5 मुलगा पांच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे. 6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पांचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पांच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे. 7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
8 “परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
परमेश्वराला द्यावयाच्या देणग्या
9 “काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. 10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बद्दल करूं नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
11 “काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात-ते अशुद्ध असतात-कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा. 12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
घराचे मोल
14 “एखाद्याने आपले घर परमेश्वराला वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
मालमत्तेचे मोल
16 “एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर [a] सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल [b] रुपे अशी किमत असावी. 17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. 18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करुन याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे. 19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. 20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही; 21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल!
22 “स्वतःच्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वतः खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल. 23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे. 24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
25 “मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा. [c]
पशूंचे मोल
26 “लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत. 27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याजकाने ठरविलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरविलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
विशेष देणगी
28 “लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. 29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
30 “भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे. 31 म्हणून एखाद्याला आपला एकदशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एकपंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
32 “गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल. 33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे ह्या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्याला बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.”
34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.
दावीदाचे स्तोत्र दावीद अबिमलेखापुढे वेड्यासारखा वागला तेव्हा त्याने दावीदाला हाकलून दिले. अशा रीतीने दावीद त्याला सोडून गेला
34 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन.
माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा
माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो.
3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला.
आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले.
मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल
लाज वाटून घेऊ नका.
6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली
आणि परमेश्वराने माझे ऐकले.
त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो.
परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे
ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
9 परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे.
परमेश्वराच्या भक्तांसाठी सुरक्षित अशी दुसरी जागा नाही.
10 शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील.
परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
11 मुलांनो माझे ऐका आणि
मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
12 जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल
आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर,
13 त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत.
त्याने खोटे बोलायला नको.
14 वाईट कृत्ये करणे सोडून द्या.
चांगली कृत्ये करा.
शांतीसाठी काम करा.
शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
15 परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो.
तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे.
तो त्यांचा सर्वनाश करतो.
17 परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल.
तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल.
18 काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात.
परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो.
तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. [a]
19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील.
परंतु परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटातून वाचवतो.
20 परमेश्वर त्यांच्या सर्व हाडांचे रक्षण करेल.
त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या
माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो.
ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
10 थोड्या मेलेल्या माशा सगळ्यांत चांगल्या अत्तरालासुध्दा वाईट वास आणतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.
2 विद्वान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात. 3 मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा् दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.
4 तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाही [a] दुरुस्त करू शकाल.
5 मी आयुष्यात जे काही पाहिले त्यात ही एक गोष्ट आहे आणि ती योग्य नाही. राजे लोक करतात तशी ती एक चूक आहे. 6 मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात. 7 जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोड्यावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.
प्रत्येक कामात संकटे असतात.
8 जो माणूस खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात पडू शकतो. जो माणूस भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता असते. 9 जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.
10 पण शहाणपण कुठलेही काम सोपे करते. धार नसलेल्या सुरीने कापणे कठीण असते. पण एखाद्याने जर सुरीला धार लावली तर कापणे सोपे जाते. शहाणपण तसेच आहे.
11 एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.
12 विद्वान माणसाचे शब्द स्तुतीला पात्र ठरतात.
पण मूर्खाचे शब्द त्याचा नाश ओढवतात.
13 मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेड्यासारख्या गोष्टी सांगायला लागतो. 14 मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.
15 मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून
त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.
कामाचे महत्व
16 राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते. 17 पण राजा जर चांगल्या घराण्यातून [b] आलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.
18 जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल
तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
19 लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
अफवा
20 राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.
खऱ्या शिक्षणाला अनुसरणे
2 तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल. 2 वडील माणसांनी आत्मसंयमित, आदरणीय व शहाणे असावे आणि विश्वासात, प्रीतीत व सहनशीलतेत बळकट असावे.
3 त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवय नसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे. 4 यासाठी की, त्यांनी तरुण स्त्रियांना, त्यांच्या पतींवर प्रेम करण्यास, त्यांच्या मुलांवर प्रेम करण्यास शिकवावे. 5 त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे. यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये.
6 त्याचप्रमाणे, तरुण मनुष्यांनी शहाणे व्हावे यासाठी त्यांना उत्तेजन देत राहा. 7 प्रत्येक गोष्टीत स्वतःला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे. तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी. 8 ज्यावर कोणी टीका करू शकत नाही असा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर. यासाठी की, जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे.
9 गुलामांना, सर्व बाबतीत त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यासाठी व त्यांना संतोष देण्याविषयी व हुज्जत न घालण्याविषयी शिकीव. 10 तसेच चोरी करु नये तर पूर्णपणे विश्वासूपणा दाखविण्यास सांग. यासाठी की, त्यांनी आपला तारणारा देव याच्या शिकवणुकीला सर्व बाबतीत सन्मान मिळवून द्यावा.
11 कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे. 12 ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी. 13 आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी. 14 त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे.
15 या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर. कोणीही तुला तुच्छ मानू नये.
2006 by World Bible Translation Center