M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल लोकांच्या देशासाठी विसाव्याचा समयs
25 सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल त्यावेळी त्या देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा. 3 सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे; 4 पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये. 5 तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.
6 “तरी तुम्हाला भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहाणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल; 7 आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.
योबेल वर्ष
8 “तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल. 9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे; 10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही ‘योबेल’ म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. 11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी ‘योबेल’ वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत; 12 कारण ते ‘योबेल’ वर्ष होय; ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा. 13 ह्या ‘योबेल’ वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
14 “तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका. 15 तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या ‘योबेल’ वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हाला जमीन विकावयाची असेल तर ‘योबेल’ वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल कां? कारण तो फकत पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हाला विकत आहे. 16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हाला खरोखरी फक्त काही पिकेच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. 17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे! मी परमेश्वर तुमचा देव आहे!
18 “माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा! म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल; 19 आणि भूमि तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल.
20 “तुम्ही कदाचित् म्हणाल, ‘आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहाणार नाही.’ 21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षाचे पीक देईल. 22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तो पर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.
मालमत्तेविषयी नियम
23 “जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा; 24 म्हणून लोक आपली जमीन विकतील खरी परंतु ती नेहमी त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळणार. 25 तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमतेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी. 26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या माणसाला आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वतःची ऐपत वाढली असेल. 27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि त्याला त्याने जमीन विकली असेल त्याला शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी. 28 पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
29 “एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील. 30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यान्पिढ्या त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही. 31 तटबंदी नसलेली नगरे उगड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यांतील घरे योबेल वर्षी त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
32 “परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यांतील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. 33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. 34 लेवी लोकांच्या नगराभोंवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
गुलामांच्या मालकांकरिता नियम
35 “तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वतःचे [a] पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; 36 त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वरदेवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला [b] आपल्यापाशी राहू दे. 37 तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको. 38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.
39 “तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वतःला तुला दास म्हणून विकले तर त्याला गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको; 40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी. 41 त्या वर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे; 42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये. 43 तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
44 “तुमच्या दास दासी विषयी; तुमच्या देशासभोंवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे; 45 तसेच तुमच्या देशात राहाणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील; 46 तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करुन घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेंकावर कठोरपणाने चालवू नये.
47 “तुझा एखादा परदेशीय किवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःस तुम्हामध्ये राहात असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल; 48 तर त्यांची विक्री झाल्यावरही त्याला स्वतःला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडवता येईल; 49 किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्याला सोडवता येईल किंवा तो स्वतःचा धनवान झाला तर त्याला स्वतः पैसे भरुन स्वतःची सुटका करुन घेता येईल.
50 “त्याला विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्याला फकत थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे! 51 योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील. 52 योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा. 53 त्याने आपल्या मालकापाशी प्रत्येक वर्षी साळकरु प्रमाणे राहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये.
54 “जरी त्या माणसाला पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलबाळे मुक्त होतील. 55 कारण इस्राएल लोक माझे दास आहेत; त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी देव आहे!
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
शहाणपण आणि सत्ता
8 शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो.
2 तुम्ही नेहमी राजाची आज्ञा पाळली पाहिजे असे मी म्हणतो. तुम्ही हे करा कारण देवाला तुम्ही तसे वचन दिले. आहे. 3 राजाला काही गोष्टी सुचवताना भीती बाळगू नका आणि चुकीच्या गोष्टी करायला मदतही करू नका. पण राजा त्याला (स्वतःला) आनंद देणाऱ्याच आज्ञा देतो हे लक्षात ठेवा. 4 राजाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. आणि काय करायचे हे त्याला कोणीही सांगू शकत नाही. 5 जो माणूस राजाच्या आज्ञा पाळतो तो माणूस सुरक्षित राहातो. शहाण्या माणसाला हे करायची योग्य वेळ माहीत असते आणि योग्य गोष्टी केव्हा करायच्या हे ही त्याला माहीत असतात.
6 माणसाकडे सगळ्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग असतो. आणि प्रत्येकाने संधीनुसार काय करायचे ते ठरवायचे असते. तो अनेक संकटांत असला तरी त्याने या गोष्टी केल्या पाहिजेत. 7 कारण काय घडेल या बद्दल त्याला खात्री नसते. का? कारण भविष्यात काय होईल ते त्याला कुणीही सांगू शकत नाही.
8 आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वतःचे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.
9 मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. या जगात घडणाऱ्या गोष्टी विषयी मी खूप विचार केला. लोक नेहमी दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्यांच्यासाठी वाईट आहे.
10 दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडले. हे फारच अविचारी आहे.
न्याय, बक्षिसे आणि शिक्षा
11 लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते.
12 पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरी ही त्याला भरपूर आयुष्य मिळेल. असे असले तरी देवाची आज्ञा पाळणे आणि त्याला मान देणे हे अधिक चांगले असते. 13 दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल.
14 पृथ्वीवर घडणारी आणखी एक गोष्ट अशी आहे जी योग्य वाटत नाही. वाईट गोष्टी वाईट माणसांच्या बाबतीत घडाव्या आणि चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांच्या बाबतीत. पण कधी कधी चांगल्या माणसांचे वाईट होते आणि वाईट माणसांचे चांगले हे योग्य नाही. 15 म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.
देव जे काही करतो ते सर्व आपल्याला कळत नाही
16 लोक या आयुष्यात जे करतात त्याचा मी नीट अभ्यास केला. लोक किती व्यग्र होते ते मी पाहिले. ते रात्रंदिवस काम करतात. ते जवळ जवळ कधीच झोपत नाहीत. 17 देव ज्या असंख्य गोष्टी करतो त्याही मी पाहिल्या आणि देव पृथ्वीवर ज्या गोष्टी करतो त्या लोकांना कळणे शक्य नसते. एखादा माणूस ते समजून घेण्याचा प्रयत्न करील पण त्याला ते अशक्य आहे. एखाद्या विद्वान माणसाने जरी असे म्हटले की त्याला देवाचे काम समजते. तरी ते खरे नसते. त्या सर्व गोष्टी कळणे कोणालाही शक्य नाही.
4 देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो. 2 वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.
3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर. 4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील. 5 पण तुझ्याबाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
6 माझ्याबाबतीत म्हणायचे तर, मी अगोदरच पेयार्पणा सारख ओतला जात आहे. व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे. 7 मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे. 8 आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.
व्यक्तिगत संदेश
9 तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर. 10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे. 11 लूक एकटा असा आहे की, जो अजूनदेखील माझ्याजवळ आहे. जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्याबरोबर घेऊन ये. कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे. 12 तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे.
13 त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
14 आलेवसांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील. 15 त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर. कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. 17 प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले. 18 प्रभु मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.
शेवटचा सलाम
19 प्रिस्कीला अविवल्ला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग. 20 एरास्त करिंथात राहिला. त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता. 21 तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर.
युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.
22 प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center