Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 24

दीपवृक्ष आणि पवित्र भाकरs

24 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाच्या हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे; अहरोनाने दर्शनमंडपात साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.

“तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर मैद्याचा करावा. त्यांच्या दोन रांगा करुन एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे देवाला अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. दर शब्बाथ दिवशी अहरोनने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”

देवाला शिव्याशाप देणारा माणूस

10 त्याकाळीं कोणा एक इस्राएल स्त्रीला मिसरी-पुरुषापासून झालेला एक मुलग होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला. 11 तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करुन शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नांव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती; 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

13 मग परमेश्वरदेव मोशेला म्हणाला, 14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करुन मारुन टाकावे. 15 तू इस्राएल लोकांना अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.

17 “जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारील तर त्याला अवश्य जिवे मारावे. 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी.

19 “जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी. 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.

22 “परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

23 मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

स्तोत्रसंहिता 31

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

31 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे,
    माझी निराशा करु नकोस
    मला वाचव व माझ्यावर दया कर.
    देवा, माझे ऐक त्वरीत येऊन
    मला वाचव माझा खडक हो.
माझे सुरक्षित स्थळ हो.
    माझा किल्ला हो, माझे रक्षण कर.
देवा, तू माझा खडक आहेस
    तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे.
    त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस.
    मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले.
    मला तार!
जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.
    मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो
    तू माझे कष्ट पाहिले आहेस.
    तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.
तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस
    तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.
परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत.
    म्हणून माझ्यावर दया कर.
    मी इतका दुखी: कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहेत,माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे
    माझी वर्षे सुस्कारा टाकण्यात निघून जाणार आहेत.
माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत.
    माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात
    आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात
माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात
    तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे
    लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो.
    ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.

14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
    तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
    मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
    त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
    माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
17 परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली
    कारण मला निराश व्हायचे नव्हते.
वाईट लोक निराश होतील.
    ते मुकाटपणे थडग्यात जातील.
18 ते वाईट लोक गर्व करतात.
    आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात.
ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत
    परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील.

19 देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस.
    तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
20 वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात.
    ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस.
    तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस.
21 परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम,
    शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले.
22 मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.”
    परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.

23 देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा.
    परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो.
परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात
    त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
24 परमेश्वराच्या मदतीची वाट बघत
    असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा.

उपदेशक 7

शहाणपणाच्या शिकवणुकींचा संग्रह

चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते.
    ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
प्रेतयात्रेला जाणे हे एखाद्या समारंभाला जाण्यापेक्षा चांगले असते. का?
    कारण सगळ्या माणसांना मरणे भाग असते
    आणि प्रत्येक जिवंत माणसाने हे मान्य करायला हवे.

दु:ख हे हास्यापेक्षा चांगले असते. का?
    कारण जेव्हा आपला चेहरा दु:खी असतो तेव्हा आपले हृदय चांगले होते.
शहाणा माणूस मरणाचा विचार करतो
    पण मूर्ख माणूस फक्त वेळ चांगला जाण्याचाच विचार करतो.
शहाण्या माणसाकडून टीका होणे
    हे मूर्खाकडून स्तुती होण्यापेक्षा चांगले असते.
मूर्खाच्या हास्याची काहीच किंमत नसते.
    ते भांडे गरम करण्यासाठी काट्यांचा जाळ करण्यासारखे आहे.
काटे लवकर जळून जातात
    आणि भांडे मात्र गरम होत नाही.
एखाद्याने पुरेसे पैसे दिले तर शहाणा माणूससुध्दा्
    त्याचे शहाणपण विसरुन जाईल.
    तो पैसा त्याच्या समजूतदारपणाचा नाश करतो.
कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापेक्षा एखादी
    गोष्ट संपवणे अधिक चांगले असते.
सहनशील आणि प्रेमळ असणे हे गर्विष्ठ
    आणि अधीर असण्यापेक्षा चांगले असते.
चटकन राग येऊ देऊ नका. का?
    कारण रागावणे हा मूर्खपणा आहे.
10 “पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका.
    “काय झाले?”
    शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.

11 जर तुमच्याजवळ मालमत्ता असेल तर तिच्या जोडीला शहाणपण असणे अधिक चांगले. शहाण्या लोकांना [a] खरोखरच जास्त संपत्ती मिळते. 12 शहाणपण व पैसा संरक्षण करू शकतो. तथापि शहाणपणाने मिळविलेले ज्ञान अधिक चांगले असते कारण ते जीवन वाचविते.

13 देवाने केलेल्या गोष्टी पाहा. एखादी गोष्ट चुकीची आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही ती बदलू शकत नाही. 14 जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.

लोक खरोखर चांगले नसू शकतात

15 माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सगळे काही पाहिले आहे. चांगली माणसे तरुणपणीच मेलेली मी पाहिली आहेत. आणि वाईट माणसे खूप वर्षे जगलेली मी पाहिली आहेत. 16-17 म्हणून स्वतःला का मारायचे? खूप चांगले किवा खूप वाईट होऊ नका. आणि खूप शहाणे किंवा खूप मूर्खही होऊ नका. तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?

18 यांतले थोडे आणि त्यातले थोडे असे व्हायचा प्रयत्न करा. देवाचे भक्त सुध्दा काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी करतात. 19-20 या पृथ्वीवर सदैव चांगल्या गोष्टी करणारा आणि कधीही पाप न करणारा असा माणूस नाही. शहाणपण माणसाला शक्ती देते. एक शहाणा माणूस दहा मूर्ख नेत्यांपेक्षा अधिक बलवान असतो.

21 लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल. 22 आणि तुम्ही सुध्दा इतरांविषयी बरेचदा वाईट बोललेले आहा हे तुम्हाला माहीत आहे.

23 मी माझे शहाणपण वापरून या गोष्टींचा विचार केला. मला खरोखरच शहाणे व्हायचे होते. पण ते अशक्य होते. 24 गोष्टी अशा का आहेत ते मला खरोखरच कळत नाही. हे कोणालाही कळणे फार कठीण आहे. 25 मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो?

मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे. 26 मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापळ्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखळ्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.

27-28 गुरू म्हणतात, “मी सगळचा गोष्टी एकत्र केल्या कारण त्यांचे उत्तर काय येते ते मला पहायचे होते. मी अजूनही उत्तर शोधत आहे. परंतु मला हे मात्र मिळाले. मला हजारात एक चांगला माणूस मिळाला. पण मला एकही चांगली स्त्री मिळाली नाही.

29 “मी आणखी एक गोष्ट शिकलो. देवाने माणसाला चांगले बनवले. पण माणसांनीच वाईट होण्याचे अनेक मार्ग शोधून काढले.”

2 तीमथ्थाला 3

शेवटचे दिवस

हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.

मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात. अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत. यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत. ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत. कारण जसा यान्रेस व यांब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.

शेवटच्या सूचना

10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस. 11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले. 12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल. 13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.

14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस. 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे. 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. 17 यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center