Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 23

पवित्र सण

23 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्र सण असे.

शब्बाथ दिबस

“सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.

वल्हांडण सण

“परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

बेखमीर भाकरीचा सण

“त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर-खमीर न घातलेली भाकर खावी. सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये. सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”

पहिल्या हंगामाचा सण

परमेश्वर मोशेला म्हणाला, 10 “इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; 11 याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी स्वीकारण्यात येईल.

12 “पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे; 13 तुम्ही त्याच बरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश मैद्याच्या पिठाचे अन्नार्पण अर्पावे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थाश हिन द्राक्षारस अर्पावा. 14 तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.

पन्नासाव्या दिवसाचा-हंगामाचा-सण

15 “तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-रविवारी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे; 16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रविवारी म्हणजे पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे. 17 त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळाण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.

18 “एक गोऱ्हा, दोन मेंढे व एक एक वर्षाची सात नर कोंकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वराला संतोष होईल. 19 आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी एक एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावेत.

20 “याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी. 21 त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हाला पिढ्यान्पिढ्या निंरंतरचा नियम होय.

22 “तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचूं नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”

कर्णे वाजविण्याचा सण

23 आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला, 24 “इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी; 25 तुम्ही कोणतही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वराला अर्पण अर्पावे.”

प्रायश्चिता:चा दिवस

26 परमेश्वर मोशेला म्हणाला, 27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करुन नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे. 28 त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.

29 “त्या दिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास दंडन करुन आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. 30 त्या दिवशी कोणाही माणसाने जर कसलेही काम केले तर मी देव त्याला त्याच्या लोकातून नाहीसा करीन. 31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहात असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हाला हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय. 32 तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास दंडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”

मंडपाचा सण

33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, 34 “इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा; 35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही काम करु नये. 36 सात दिवस परमेश्वराला अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वराला अर्पण अर्पावे; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.

37 “परमेश्वराने हे सण नेमलेले आहेतः त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यांत योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वराला अर्पावे. 38 परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.

39 “जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. 40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन परमेश्वरासमोर सात दिवस उत्सव करावा. 41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा. 42 तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात राहावे, 43 म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”

44 तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांना कळवले.

स्तोत्रसंहिता 30

दावीदाचे एक स्तोत्र हे स्तोत्र मंदिरअर्पण करण्याच्या वेळचे आहे.

30 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस.
    तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस
    आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली
    आणि तू मला बरे केलेस.
तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस
    तू मला खड्ड्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.

देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात.
    त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
देव रागावला होता म्हणून
    त्याचा निर्णय होता “मृत्यू.”
परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो
    परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.

मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो
    तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास
    तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते.
परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास
    आणि मला खूप भीती वाटली.
देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली.
    मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का?
    मेलेले लोक मातीत नुसते झोपतात.
ते तुझी स्तुती करत नाहीत.
    आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर.
    परमेश्वरा, मला मदत कर.”

11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस.
    तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस.
    तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.
12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन.
    अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन.
    तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.

उपदेशक 6

संपत्ती सुख आणीत नाही

मी या आयुष्यात आणखी एक गोष्ट बघितली आहे. जी योग्य नाही. ती समजायला फार कठीण आहे: देव माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानमरातब देतो, त्या माणसाजवळ त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्याला जे जे हवे ते सर्व असते. परंतु देव त्याला या सगळ्याचा उपभोग घेऊ देत नाही. कोणीतरी अनोळखी येतो आणि सारे काही घेऊन जातो. ही अतिशय वाईट आणि निरर्थक गोष्ट आहे.

एखादा माणूस खूप वर्षे जगेल आणि कदाचित त्याला 100 मुले असतील. परंतु जर तो माणूस चांगल्या गोष्टीत समाधानी नसला आणि तो मेल्यावर त्याची कोणाला आठवणही आली नाही तर जन्मतःच मेलेले मूल त्या माणसापेक्षा खूप बरे आहे असे मला वाटते. मूल मेलेले निपजणे ही अतिशय निरर्थक गोष्ट आहे. ते मूल लगेच निनावीच एका काळोख्या कबरेत पुरले जाते. त्या मुलाला कधीही सूर्यदर्शन होत नाही. त्या मुलाला कधीही काहीही माहीत होत नाही. अशा मुलाला आयुष्यात देवाने दिलेल्या गोष्टींचा उपभोग घेऊ न शकणाऱ्या माणसापेक्षा अधिक विसावा मिळतो. तो माणूस कदाचित 2,000 वर्षे जगेल. पण त्याने जर आयुष्याचा उपभोग घेतला नाही तर जन्मतःच मेलेल्या मुलाने त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग [a] शोधला असे म्हणावे लागते.

माणूस खूप कष्ट करतो. का? स्वतःचे पोट भरण्यासाठी. पण तो कधीही समाधानी असत नाही. याच रीतीने शहाणा माणूस मूर्खा पेक्षा अधिक चांगला नसतो. गरीब राहून आयुष्य जसे सामोरे येते तसा त्याचा स्वीकार करणे हे अधिक चांगले. आपल्याजवळ जे आहे. त्यात समाधान मानणे हे अधिकाची हाव धरण्यापेक्षा बरे आहे. कारण अधिकाची हाव धरणे निरर्थक आहे. ते अधिक वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. [b]

10-11 माणूस, म्हणजे ज्यासाठी त्याला निर्माण केले गेले तो एक माणूस आणि त्याबद्दल वाद करणे निरर्थक आहे. माणूस या विषयी देवाजवळ वाद घालू शकत नाही. का? कारण देव माणसापेक्षा शक्तिशाली आहे. आणि खूप वेळ वाद घातला तरी त्यात बदल होणार नाही.

12 माणसाच्या छोट्याश्या आयुष्यात त्याच्यासाठी पृथ्वीवर काय चांगले आहे ते कोणाला कळणार? त्याचे आयुष्य सावलीप्रमाणे सरकते. पुढे काय घडणार आहे ते त्याला कोणीही सांगू शकणार नाही.

2 तीमथ्थाला 2

ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक

माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने आपल्या दु:खाचा सहभागी बनून राहा. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. जर कोणी मैदानी स्पर्धेत भाग घेतो तर नियमाप्रमाणे स्पर्धेत घेतल्याशिवाय त्याला विजयाचा मुकुट मिळविता येत नाही. अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा. मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभु तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल.

येशू ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे.

कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही. 10 म्हणून, देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंतकाळचे गौरव प्राप्त व्हावे.

11 येथे एक विश्वसनीय सत्य आहे:

जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत.
    तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू
12 जर आम्ही दु:खसहन केले
    तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू
जर आम्ही त्याला नाकारले
    तर तोही आम्हाला नाकारील
13 जरी आम्ही अविश्वासू आहोत
    तरी तो अजूनही विश्वासू आहे
    कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.

मान्य सेवक

14 लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते. 15 देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.

16 पण ऐहिक वादविवाद टाळ कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात. 17 आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत, 18 जे सत्यापासून दूर गेले आहेत. ते म्हणतात की, मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत.

19 तथापि देवाने घातलेला भक्कम पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.” [a] “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”

20 मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात. 21 म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करील तर तो मानसन्मानस योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येकसमर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल.

22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग. 23 नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी. 26 ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center