M’Cheyne Bible Reading Plan
22 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्या पवित्र होतात; त्या माझ्या आहेत; म्हणून त्या याजकांनी घेऊ नयेत; त्या पवित्र वस्तू घेऊन जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही माझा मान न राखता-माझे भय न धरता-माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे! 3 तुझ्या वंशजापैकी कोणी जर त्या पवित्र वस्तूना हात लावील, तर तो अपवित्र ठरेल; त्याला मजसमोरुन दूर करावे! इस्राएल लोकांनी त्या वस्तू मला अर्पण केल्या आहेत. मी परमेश्वर आहे.
4 “अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला माणूस, 5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या माणसास स्पर्श केल्यामुळे याजक अशुद्ध होईल. 6 याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊं नयेत. 7 सूर्य मावळल्यावरच तो माणूस शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
8 “आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊं नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
9 “त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; तो ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना ह्या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे. 10 फकत याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये; 11 परंतु याजकाने स्वतःचे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे. 12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या माणसाबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत. 13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी राहात असेल तर मग आपल्या बापाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे.
14 “एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यात घालून याजकास द्यावी.
15 “इस्राएल लोक परमेश्वराला अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत; 16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वतःवर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!”
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 18 “अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की तुम्हांइस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हांमध्ये राहाणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुषीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल, 19-20 व तो गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा! परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्वीकारु नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
21 “एखाद्या माणसाला आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुषीच्या अर्पणासाठी परमेश्वराला गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल. 22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
23 “गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड-पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुषीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
24 “ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
25 “परमेश्वराला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही विदेशी लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!”
26 परमेश्वर मोशेला म्हणाला, 27 “वासरु, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल. 28 परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्या प्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
29 “परमेश्वराकरिता तुम्हाला उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा. 30 अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
31 “तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे! 32 माझ्या पवित्र नांवाचा मान राखावा-माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे! 33 मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परेशवर आहे!”
दावीदाचे स्तोत्र.
28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
2 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
मी तुला साद घालीन त्यावेळी
माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
3 परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
4 परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
5 वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
6 परमेश्वराची स्तुती कर.
त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
7 परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
8 परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
परमेश्वर त्याला वाचवतो.
परमेश्वर त्याची शक्ती आहे.
9 देवा, तुझ्या लोकांना वाचव
जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
शब्द देण्याआधी काळजी घ्या
5 देवाची उपासना करायला जाताना काळजी घ्या. मूर्ख लोकांप्रमाणे यज्ञ करण्यापेक्षा देवाचे ऐकणे चांगले आहे. मूर्ख लोक बरेचदा वाईट गोष्टी करतात आणि ते त्यांना कळत देखील नाही. 2 देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पृथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:
3 खूप काळजी केल्यामुळे वाईट स्वप्ने पडतात
आणि मूर्खाकडून खूप शब्द बोलले जातात.
4 जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या. 5 कसलेच वचन न देणे हे काही तरी वचन देऊन त्याची पूर्तता न करण्यापेक्षा चांगले असते. 6 म्हणून तुमच्या शब्दामुळे स्वतःला पाप करायला लावू नका. “मी जे बोललो ते मला बोलायचे नव्हते.” असे याजकाला म्हणू नका. तुम्ही जर असे केलेत तर देव तुमच्या शब्दांवर खरोखरच रागावेल आणि तुम्ही ज्याच्यासाठी कष्ट केलेत त्या सर्वाचा नाश करील. 7 तुमची निरर्थक स्वप्ने आणि पोकळ बडबड तुम्हाला संकटात लोटणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही देवाला मान द्यायला हवा.
प्रत्येक राजावर एक राजा असतो
8 काही देशांत गरीब लोकांवर खूप कष्ट करायची सक्ती केली जाते. गरीबांच्या बाबतीत हे अन्यायकारक आहे हे तुम्ही जाणता. हे गरीबांच्या हक्काविरुध्द आहे. पण आश्चर्य वाटून घेऊ नका. जो राजा त्यांना हे करायला भाग पाडतो त्याला भाग पाडणारा ही एक राजा आहे. आणि या दोघांना भाग पाडायला लावणारा आणखी एक राजा आहे. 9 राजाही गुलाम आहे-त्याचा देशच त्याचा मालक आहे. [a]
संपत्ती सुख विकत घेऊ शकत नाही
10 जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्ती बद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हा ही अविचार आहे.
11 एखाद्याकडे जास्त संपत्ती असेल तर ती खर्च करण्यासाठी त्याला मित्रांची आवश्यकता असते. त्यामुळे श्रीमंत माणसाला काहीच लाभ होत नाही. तो फक्त त्याच्या संपत्ती कडे पाहू शकतो.
12 जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही.
13 मी या आयुष्यात एक अतिशय वाईट गोष्ट घडलेली पाहिली. माणूस भविष्यासाठी पैसे साठवतो. 14 पण काही तरी वाईट घडते आणि त्याची संपत्ती जाते. त्यामुळे त्याच्या मुलाला द्यायला त्याच्याजवळ काहीही राहात नाही.
15 माणूस त्याच्या आईच्या उदरातून जगात येतो तेव्हा काहीही न घेता येतो. आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हाही तो त्याच प्रकारे जातो. काहीही न घेता. तो गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो बरोबर काहीही नेत नाही. तो ज्या रीतीने जगात येतो त्याच रीतीने जातो. 16 हे फारच वाईट आहे म्हणून “वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यात माणसाला काय मिळते?” 17 त्याला फक्त दुःखाने आणि खिन्नतेने भरलेले दिवस मिळतात. आणि शेवटी तो निराश, आजारी आणि रागीट बनतो.
आयुष्यातील काम आनंदाने करा
18 मी पाहिले आहे की, माणूस करू शकेल अशी चांगली गोष्ट पुढीलप्रमाणे आहे: माणसाने पृथ्वीवरील त्याच्या लहानशा आयुष्यात खावे. प्यावे आणि काम करण्यात आनंद मिळवावा. देवाने त्याला काही दिवसांचेच आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच त्याच्याजवळ आहे.
19 जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे. 20 माणसाला जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्याला त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.
1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,
2 प्रिय मुलगा तीमथ्य याला,
देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.
आभारप्रदर्शन आणि उत्तेजन
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. 4 माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे. 5 तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. 6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव. 7 कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आत्मा दिला आहे.
8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवार्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.
9 त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती. 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.
11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते. 12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. 16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही. 17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला. 18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2006 by World Bible Translation Center