M’Cheyne Bible Reading Plan
याजकांकरिता विधीनियम
21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे, जे याजक त्यांना असे सांग की मेलेल्या माणसाला र्स्ण्श करुन याजकाने स्वतःला अशुद्ध करून घेऊ नये. 2 परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ, 3 आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण ह्यांच्या प्रेताला स्पर्श केल्यास हरकत नाही. 4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वतःला अपवित्र करुन घेऊ नये.
5 “याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत; 6 त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
7 “याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये. 8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.
9 “एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 “आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत; 11 त्याने आपणाला अशुद्ध करुन घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या बापाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये. 12 त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
13 “त्याने कुमारिकेशीच लग्न करावे, 14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे. 15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांत आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; [a] कारण मी जो परमेश्वर त्या मी त्याला पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
16 परमेश्वर मोशेला म्हणाला, 17 “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यामध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग-शारीरिक दोष-निघाले तर त्याने आपल्या देवाकरिता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. 18 शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला, 19 मोडक्या पायाचा, थोटा, 20 कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
21 “अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊं नये; 22 तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे; 23 परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परम पवित्र स्ताने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
24 तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्राएल लोक ह्यांना हे सर्व सांगितले.
दावीदाचे स्तोत्र.
26 परमेश्वरा, माझा न्याय कर.
मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर.
मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
2 परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे.
माझ्या ह्रदयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
3 मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो.
मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
4 मी कपटी लोकांबरोबर जात नाही,
मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
5 मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो.
मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
6 परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून
तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
7 परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो
तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या सत्यांची गाणी मी गातो.
8 परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते.
मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
9 परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस.
त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10 ते लोक इतरांना फसवतील.
वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11 परंतु मी निरपराध आहे.
म्हणून देवा माझ्यावर दया कर आणि मला वाचव.
12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे.
परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.
दावीदाचे स्तोत्र.
27 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस.
मला कुणाचीही भीती बाळगायला नको.
परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे.
म्हणून मी कुणालाही भीत नाही.
2 माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील
ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील.
माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन
माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
3 परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही.
युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही.
का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
4 मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
मला हे मागायचे आहे,
“मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे
मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन
आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”
5 मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील.
तो मला त्याच्या तंबूत लपवेल
तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
6 माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे.
परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन.
मी बळी देताना आनंदाने ओरडेन.
मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.
7 परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे.
माझ्याशी दयेने वाग.
8 परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे.
मला अगदी माझ्या ह्रदयातून तुझ्याशी बोलायचे आहे.
परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
9 परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस.
तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस.
मला मदत कर! मला दूर लोटू नकोस.
मला सोडू नकोस, देवा तूच माझा तारणारा आहेस.
10 माझे आईवडील मला सोडून गेले.
परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव.
मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले.
मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की
मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ.
सामर्थ्यवान आणि धीट हो
व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
मरणे सगळ्यात चांगले आहे का?
4 खूप लोकांना वाईट वागणूक दिली गेल्याचे मी पुन्हा पाहिले. आणि या दु:खी लोकांचे सांत्वन करायला कुणीही नाही. हे ही मी पाहिले. दुष्ट लोकांकडेच सर्व सत्ता असते. हे मी पाहिले. आणि ते ज्या लोकांना दु:ख देतात त्यांचे सांत्वन करायलाही कुणी नसते, हे ही मी पाहिले. 2 जे लोक जिवंत आहेत त्यांच्यापेक्षा मेलेल्या लोकांची अवस्था चांगली आहे असे मला वाटते. 3 आणि जे लोक जन्मतःच मरतात त्यांच्यासाठी तर सर्व खूपच चांगले आहे. का? कारण या जगात जी वाईट कृत्ये केली जातात ती त्यांनी कधी पाहिली नाहीत.
इतके कष्ट का करायचे?
4 नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
5 काही लोक म्हणतात, “हाताची घडी घालून स्वस्थ बसणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर काम केले नाही तर उपाशीपोटी मराल.” 6 कदाचित ते सत्य असेल. पण मी म्हणतो की तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.
7 ज्या गोष्टीचा अर्थ लागत नाही असे काही तरी मी पुन्हा पाहिले; 8 एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वतःला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
मित्र आणि कुटुंबीय शक्ती देतात
9 एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
10 जर एखादा माणूस पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण जर माणूस एकटा असताना पडला तर ते वाईट असते. त्याला मदत करायला तिथे कुणीही नसते.
11 जर दोन माणसे एकत्र झोपली तर त्यांना ऊब मिळेल. पण जो माणूस एकटाच झोपतो त्याला उबदार वाटणार नाही. त्याला ऊब मिळणार नाही.
12 शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर अधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.
लोक, राजकारण आणि लोकप्रियता
13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही. 14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुंरूगातून राज्य करायला आला असेल. 15 पण मी आयुष्यात लोकांना बघितले आहे आणि मला हे माहीत आहे. लोक त्या तरुणाचेच ऐकतील. तोच नवीन राजा बनेल. 16 खूप लोक त्या तरुणाच्या मागे जातील. पण नंतर त्या लोकांना तो आवडेनासा होईल. हाही अविचारच आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
Special Instructions for Slaves
6 जे सर्व गुलाम म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली काम करीत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पूर्ण आदर देण्यायोग्य समजावे. यासाठी की देवाच्या नावाची आणि आमच्या शिक्षणावर अशीतशी टीका होणार नाही. 2 व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत, त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, ते मालक त्यांचे बंधू आहेत, उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी. कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत.
या गोष्टी लोकांना शिकीव व बोध करुन तसे करायला सांग.
खोटे शिक्षण आणि खरी संपत्ती
3 जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभु याची जी निकोप वचने आणि देवाच्या सेवेचे खरे शिक्षण मान्य करीत नाही 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क 5 आणि ज्यांची मने डागाळलेली आणि सत्यापासून हिरावलेली आहेत अशा माणसांची सततची भांडणे होतात, त्यांना असे वाटते की, देवाची सेवा करणे हे श्रीमंत होण्याचे माध्यम आहे.
6 वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. 7 कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही. 8 जर आपणांस अन्न, वस्त्र (आसरा) असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे. 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात. 10 कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे.
तू लक्षात ठेवाव्यास अशा काही गोष्टी
11 पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. 12 विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. 14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. 15 जो धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. 16 ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.
17 या युगातील श्रीमंतांस आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. 18 चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतःजवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. 19 असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल.
20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी विश्वासापासून दूर जा. 21 ज्यांनी हा दावा केला ते या “विद्येमुळे” विश्वासाच्या खुणेपासून ढळले आहेत.
देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center