M’Cheyne Bible Reading Plan
मूर्तीची पूजा करण्याविरुद्ध ताकीद
20 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की इस्राएल लोकांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहाणाऱ्या परदेशीयापैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा! 3 मीही त्या माणसाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नांवाला कलंक लावला! 4 मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझांके करुन त्याला जिवे मारणार नाहीत. 5 तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी मोलख दैवताच्या नादी लागून त्याच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
6 “जो माणूस सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे. [a] मी त्याच्या विरुद्ध होईन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
7 “म्हणून पावन व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे! 8 तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे!
9 “जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; [b] त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
व्यभिचाराच्या पापाबद्दल शिक्षा
10 “जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला व जारिणीला अवश्य जिवे मारावे. 11 जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
12 “एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
13 “एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील.
14 “कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
15 “कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे. 16 कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
17 “कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करुन घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी. [c]
18 “ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करुन पाप केले आहे.
19 “आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याच्या हातून मात्रागमनाचे पाप घडेल, त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी. [d]
20 “कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
21 “आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती [e] होणार नाही.
22 “म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही. 23 ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका. 24 मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश [f] तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे.
“त्यात दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करुन मी तुम्हाला माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे! 25 म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू व शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये. 26 तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
27 “कोणी पंचाक्षरी किंवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.”
दावीदाचे स्तोत्र.
25 परमेश्वरा, मी स्वत:ला तुझ्याकडे सुपूर्द करतो.
2 देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे
आणि माझी निराशा होणार नाही.
माझे शत्रू मला हसणार नाहीत.
3 एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही
परंतु दगाबाज मात्र निराश होतील.
त्यांना काहीही मिळणार नाही.
4 परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर.
मला तुझे मार्ग शिकव.
5 मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव
तू माझा देव आहेस,
माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
6 परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे
तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव.
7 माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस
परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
8 परमेश्वर खरोखरच चांगला आहे.
तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.
9 तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो
त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
10 जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी
तो सच्चा आणि दयाळू असतो.
11 परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या.
परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस.
12 जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले
तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.
13 तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील
आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.
14 परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो.
तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो.
15 मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो.
तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.
16 परमेश्वरा, मी दु:खा व एकाकी आहे.
माझ्याकडे वळ व मला दया दाखव.
17 माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर.
माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.
18 परमेश्वरा, माझ्या यातनांकडे व संकटांकडे पाहा.
मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
19 माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक.
ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.
20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव.
माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस.
21 देवा तू खरोखरच चांगला आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर.
22 देवा, इस्राएलाच्या लोकांचे
त्यांच्या सर्व शत्रूंपासून रक्षण कर.
वेळ आहे
3 सगळ्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील.
2 जन्माला येण्याची
आणि मरण्याचीही वेळ असते.
रोप लावण्याची आणि
ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
3 ठार मारण्याची आणि
बरे करण्याची पण वेळ असते.
सगळ्याचा नाश करण्याची
आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.
4 रडण्याची आणि
हसण्याचीही वेळ असते.
दु:खी होण्याची आणि
आनंदाने नाचायचीही वेळ असते.
5 हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते
आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते. [a]
कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते
आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते.
6 काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते
आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते.
गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते
आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
7 वस्त्र फाडण्याचीही वेळ असते.
आणि ते शिवण्याचीही वेळ असते.
गप्प बसण्याचीही वेळ असते
आणि बोलण्याचीही वेळ असते.
8 प्रेम करण्याचीही वेळ असते
आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.
युध्द् करण्याची वेळ असते
आणि शांतीचीही वेळ असते.
देव त्याच्या जगावर सत्ता गाजवतो
9 खूप कष्ट केल्यानंतर माणसाला खरोखरच काही मिळते का? नाही. 10 देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले. 11 देवाने आपल्याला या जगाबद्दल [b] विचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो.
12 मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे. 13 प्रत्येक माणसाने खावे. प्यावे आणि कामाचा आनंद लुटावा असे देवाला वाटते. या देवाने दिलेल्या भेटी आहेत.
14 देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे. 15 पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आपण त्या आता बदलू शकत नाही. आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण ज्या लोकांना वाईट वागणूक मिळते त्यांना मदत करायची देवाची इच्छा आहे. [c]
16 मीही आयुष्यात या गोष्टी बघितल्या. मी पाहिले की न्यायालये न्यायाने आणि चांगुलपणाने भरलेली पाहिजेत. पण आता तेथे दुष्ट प्रवृत्ती आहेत. 17 म्हणून मी स्वतःशीच म्हटले, “देवाने सगळ्या गोष्टींची वेळ ठरवली आहे आणि त्याने लोक ज्या गोष्टी करतात त्यांचा न्याय करण्यासाठी ही योग्य वेळ ठरवली आहे. देव चांगल्या आणि वाईट लोकांचा न्याय करील.”
लोक खरोखरच पशूसारखे आहेत का?
18 लोक एकमेकांना ज्या गोष्टी करतात त्यांचा मी विचार केला आणि मी स्वतःशीच म्हणालो, “आपण पशूंसारखे आहोत, हे लोकांना कळावे असे देवाला वाटते. 19 माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का? 20 माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील. 21 माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे?”
22 म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.
इतर लोकांबरोबर राहण्याचे काही नियम
5 वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर. 2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागीव.
3 ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे. 4 पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे. 5 जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते. 6 पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे. 7 म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही. 8 पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.
9 एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्न झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी. 10 चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबाळांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.
11 पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. 12 आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते. 13 आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वतःला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. 15 मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16 जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी [a] व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.
More About Elders and Other Matters
17 जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषतः जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना. 18 कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको. [b] आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.” [c]
19 दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस. 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करु नको.
22 देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23 नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षारसाचा वापर कर.
24 काही लोकांची पापे स्पष्ट आहेत. व ती त्यांच्याअगोदर न्यायालयात जातात पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात. 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपविता येत नाहीत.
2006 by World Bible Translation Center