M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल देवाचा आहे
19 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
3 “तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझे शब्बाथ पाळलेच पाहिजेत; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
4 “तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
5 “तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल. 6 त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. 7 तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही. 8 कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
9 “तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका. 10 आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
11 “तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये. 12 तुम्ही माझ्या नांवाने खोटी शपथ वाहू नये; तसे कराल तर तुम्ही माझे मय न धरता माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
13 “आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
14 “बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा-त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
15 “न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या. 16 इतर लोकाविषयी खोट्यानाट्या गोष्टी सांगत इकडे तिकडे फिरु नका; आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे.
17 “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. 18 लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
19 “तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका; दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरु नका; भिन्न सूत एकत्र करुन विणलेला कपडा अंगात घालू नका.
20 “एकाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरुन मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीर संबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारु नये; 21 हे पाप केलेल्या माणसाने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा; 22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
23 “तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोंचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळ झाडे लावाल, तेव्हा फळ झाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊं नयेत. 24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. 25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिकात अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
26 “तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका;
“तुम्ही काही जादू-टोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्यांच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
27 “आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका. 28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करुन घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊन नका. मी परमेश्वर आहे!
29 “तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
30 “तुम्ही माझे शब्बाथ, काम न करिता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
31 “सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्या मागे लागू नका; ते तुम्हाला अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
32 “वडीलधाऱ्यामाणसांना मान द्या; वृद्ध माणूस घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
33 “कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहात असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका. 34 तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वतः सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
35 “लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका. 36 तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले!
37 “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे.”
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
दावीदाचे स्तोत्र.
24 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे.
जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली.
ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 तिथे कोण उपासना करु शकतो?
ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्रदय शुध्द आहे,
ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही
आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात.
ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात.
ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
8 तो गौरवशाली राजा कोण आहे?
परमेश्वरच तो राजा आहे.
तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
“मौज-मजा” करण्याने सुख मिळते का?
2 मी स्वतःशी म्हणालो, “मी मौज-मजा करायला हवी. जितका शक्य होईल तितका आनंद मी उपभोगायला हवा.” पण हेही अगदीच टाकाऊ आहे हे मला समजले. 2 सतत हसत राहणे हाही एक मूर्खपणाच आहे. मौजमजा करण्यातून काहीही चांगले घडत नाही.
3 म्हणून माझे मन शहाणपणाने भरता भरता माझे शरीर मद्याने (द्राक्षारसाने) भरायचे असे मी ठरवले. मी हा मूर्खपणा करायचे ठरवले कारण मला सुखी व्हायचा मार्ग शोधायचा होता. लोकांना त्यांच्या छोट्याशा आयुष्यात चांगले करण्यासारखे असे काय आहे ते मला शोधायचे होते.
अतोनात कष्ट केल्याने सुख मिळते का?
4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वतःसाठी द्राक्षाचे मळे लावले. 5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे लावली. 6 मी माझ्यासाठी तळी निर्माण केली. आणि त्या तळ्यांचा उपयोग मी माझ्या वाढणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी केला. 7 मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.
8 मी स्वतःसाठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्यांच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.
9 मी खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध् झालो. माझ्या आधी यरुशलेममध्ये राहणाऱ्या कोणाही माणसा पेक्षा मी मोठा होतो आणि माझे शहाणपण मला मदत करण्यासाठी नेहमी तयार होते. 10 माझ्या डोळ्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.
11 परंतु नंतर मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे पाहिले. मी जे कष्ट केले त्यांच्याकडे पाहिले. आणि ते सर्व म्हणजे वेळेचा अपव्यय होता असे मी ठरवले. वाऱ्याला पकडण्यासारखेच ते होते. आपण जीवनात जे काही करतो त्यापासून काहीही लाभ होत नाही.
कदाचित शहाणपणच उत्तर असेल
12 कोठलाही माणूस राजापेक्षा अधिक काही करू शकत नाही एखाद्या राजाने तुम्हाला जे करावेसे वाटते ते आधीच केलेले असते. आणि राजा ज्या गोष्टी करतो त्या करणे म्हणजेही वेळेचा अपव्यय आहे हेही मला समजले. म्हणून मी पुन्हा पुन्हा शहाणे व मूर्ख होण्याचा आणि वेड्या गोष्टी करण्याच्या बाबतीत विचार करू लागलो. 13 शहाणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे. 14 ते असे आहे: शहाणा माणूस त्याच्या मनाचा उपयोग डोळ्यांप्रमाणे, त्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी करतो. परंतु मूर्ख मात्र अंधारात चालणाऱ्या माणसासारखा असतो.
परंतु मूर्ख आणि शहाणा हे दोघेही सारख्याच रीतीने नाश पावतात. दोघेही मरतात. 15 मी स्वतःशीच विचार केला, “मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वतःशीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.” 16 शहाणा आणि मूर्ख दोघेही मरणारच आणि लोक शहाण्या माणसाचे अथवा मूर्ख माणसाचे सदैव स्मरण कधीच ठेवणार नाहीत. त्यांनी जे जे केले ते सर्व लोक भविष्यात विसरून जातील. म्हणून शहाणा माणूस आणि मूर्ख माणूस दोघेही समान आहेत.
आयुष्यात खरे सुख आहे का?
17 यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटायला लागला. जीवनातील सर्व गोष्टी वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारख्या निरुपयोगी आहेत या विचाराने मला खूप दु:ख झाले.
18 मी जे अपार कष्ट केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्यांना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही. 19 मी जो अभ्यास केला आणि काम करून जे मिळवले त्याच्यावर इतरांचीच सत्ता राहणार आहे आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख ते मला माहीत नाही. हेही निरर्थकच आहे.
20 म्हणून मी माझ्या सर्व कामांबद्दल दु:खी झालो. 21 माणूस आपले सर्व ज्ञान, शहाणपण आणि कौशल्य वापरून कष्ट करू शकतो. पण तो माणूस मरेल आणि इतरांना त्याच्या कष्टाचा फायदा मिळेल. त्या लोकांनी कष्ट केले नाहीत तरी त्यांना सगळे काही मिळेल. त्यामुळे मला खूप दु:ख झाले. ते योग्य नाही आणि शहाणपणाचेही नाही.
22 माणसाने खुप कष्ट केल्यावर आणि भांडल्यावर त्याला आयुष्यात खरोखर काय मिळते? 23 आयुष्यभर त्याला दु:ख, मनस्ताप आणि कष्टच मिळतात. त्याचे मन रात्रीदेखील स्वस्थ नसते. हे सुध्दा शहाणपणाचे नाही.
24-25 एक तरी माणूस असा आहे का ज्याने माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आयुष्य उपभोगले? नाही. आणि मी हे शिकलो: माणसाला करता येण्यासारखी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि त्याला करायला लागणारे काम आवडीने करणे. हे सर्व देवाकडून [a] येते हेही मी पाहिले. 26 जर माणसाने चांगले कृत्य केले आणि देवाला प्रसन्न केले तर देव त्याला शहाणपण, ज्ञान आणि आनंद देईल. पण जो माणूस पाप करतो त्याला वस्तू गोळा करायचे आणि त्यांचे ओझे वहायचे काम मिळेल. देव वाईट माणसाकडून घेतो आणि चांगल्या माणसाला देतो. पण त्याचे सर्व काम निरुपयोगी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
खोठ्या सिक्षकांविरुद्ध इशारा
4 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, 2 आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देतील. 3 ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्नपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत. 4 कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारु नये. 5 कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
ख्रिस्त येशूचा चांगला सेवक हो
6 तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. 7 परंतु देवहीन गोष्टी, ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव. 8 कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. 9 हे सत्य वचन आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे. 10 म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो. कारण आम्ही, जो सर्व लोकांचा व विशेषेकरून जे विश्वास ठेवतात, अशा विश्वासणाऱ्यांचा विशेषकरुन तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे.
11 आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव. 12 तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी, विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो.
13 मी येईपर्यंत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वतःला वाहून घे. 14 जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे, त्याविषयी निष्काळजी राहू नको. 15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी. 16 आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.
2006 by World Bible Translation Center