M’Cheyne Bible Reading Plan
शरीरसंबंधीविषयी नियम
18 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग: मी परमेश्वर तुमचा देव आहे. 3 तुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.” 4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी कसोशीने पाळा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. 5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
6 “तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये! मी परमेश्वर आहे:
7 “तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये. 8 तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची [a] लाज जाईल.
9 “तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, [b] तू तिच्यापाशी जाऊ नको.
10 “तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल!
11 “जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
12 “तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. 13 तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. 14 तू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे.
15 “तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे.
16 “तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.
17 “एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे.
18 “तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
19 “स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते.
20 “तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील!
21 “तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.
22 “स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
23 “कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
24 “असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वतःला अशुद्ध करुन घेऊ नका! कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे! कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली! 25 म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!
26 “ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये. 27 कारण तुमच्या पूर्वी ह्या देशात राहाणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ पापकृत्ये केल्यामुळे हा देश अमंगळ झाला आहे. 28 जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्ही हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील. 29 जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ पापी कृत्य करतील त्या सर्वाना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. 30 इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
16 “कुत्री” माझ्या भोवती आहेत
मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे
सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायाला जखमा केल्या आहेत. [a]
17 मला माझी हाडे दिसू शकतात.
लोक माझ्याकडे टक लावून पाहतात
आणि पाहातच राहतात.
18 ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात
आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या [b] टाकल्या आहेत.
19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस
तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [c]
22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
1 हे गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता.
2 सारे काही व्यर्थ आहे. गुरू म्हणतात, “सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. [a] 3 आयुष्यात केलेल्या अपार कष्टांमुळे माणसाला खरोखरच काही प्राप्त होते का? [b] नाही.”
काहीही बदलत नाही
4 लोक जगतात आणि लोक मरतात. पण पृथ्वी मात्र सदैव असते. 5 सूर्य उगवतो आणि मावळतो. आणि नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणाहून उगण्यासाठी धावपळ करतो.
6 वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो.
7 सगळ्या नद्या पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी वाहातात. त्या सागराला जाऊन मिळतात पण समुद्र भरून जात नाही.
8 शब्द सगळ्या गोष्टी [c] पूर्णपणे सांगू शकत नाहीत. पण लोक बोलणे [d] चालूच ठेवतात. शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात. पण आपले कान तृप्त होत नाहीत. आणि आपण जे बघतो ते बघून आपल्या डोळ्यांचेही पारणे फिटत नाही.
काहीच नवीन नाही
9 सुरुवातीपासून गोष्टी जशा होत्या तशाच त्या राहतात. जे आता पर्यंत करण्यात आले तेच करण्यात येणार. या आयुष्यात नवीन असे काहीच नसते.
10 एखादा माणूस म्हणेल, “बघा हे नवीन आहे.” पण ती गोष्ट तर नेहमीच होती. आपल्याही आधी ती इथे होती.
11 खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात रहात नाहीत. आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही.
शहाणपण सुख आणते का?
12 मी, गुरू उपदेशक यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो. 13 मी अभ्यास करायचा निश्चय केला आणि माझ्या शहाणपणाचा उपयोग या जीवनात ज्या गोष्टी केल्या जातात त्या शिकून घेण्यासाठी करायचे ठरवले. मला कळले की देवाने आपल्याला करायला दिलेली ही फार कठीण गोष्ट आहे. 14 मी पृथ्वीवर केल्या गेलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यासारख्या आहे असे मला वाटले. त्या वारा पकडण्यासारख्या [e] आहे असे वाटले. 15 या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. जर एखादी वस्तू वाकडी असली तर ती सरळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि एखादी वस्तु हरवली असली, तर ती आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही.
16 मी स्वतःशीच म्हणालो: “मी खूप शहाणा आहे. माझ्या आधी ज्या राजांनी यरुशलेमवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी शहाणा आहे. शहाणपण आणि ज्ञान म्हणजे खरोखर काय ते मला माहीत आहे.”
17 शहाणपण आणि ज्ञान हे मूर्खपणाच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा किती चांगले आहे हे समजून घेण्याचे मी ठरवले. पण शहाणा होणे हे वाऱ्याला पकडण्यासारखे आहे हे मला कळते. 18 अतिशहाणपणाने निराशा येते. ज्या माणसाला खूप शहाणपण मिळते त्यालाच खूप दु:खही मिळते.
मंडलीतील पुढारी
3 हे सत्य वचन आहे: जर कोणी (मंडळीत) अध्यक्ष [a] (सर्वांगीण काळजीवाहक) होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. 2 आता अध्यक्षाने (सर्वागीण काळजीवाहकाने) त्याचे जीवन लोकांनी टीका करु नये अशा रीतीने जगावे. त्याला एकच पत्नी असावी. 3 तो मद्य पिणारा नसावा, तो हिंसक वृत्तीचा नसावा तर तो सभ्य, आत्मसंयमी, आदरणीय, व आदरातिथ्य करणारा असावा. तो शिकविण्यात प्रवीण असावा. 4 तो पैशावर प्रेम करणारा नसावा. त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत. 5 जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
6 तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून जाणार नाही. व सैतानाला जशी शिक्षा झाली तशी शिक्षा होऊन त्याचा अंत होणार नाही. 7 आणखी म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये त्याचे चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये. व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये
मंडळीत सेवाकार्य करणारे
8 त्याचप्रमाणे, विशेष मदतनीस [b] आदरणीय असावेत, ते दुटप्पी नसावेत, ते विश्वसनीय असावेत. ते अति मद्यपान करणारे व दुतोंडे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. 9 देवाने जे आम्हांला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी स्वच्छ विवेकाने धरून ठेवावे. 10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग जर त्यांच्या विरुद्ध असे आढळले नाही, तर त्यांनी मदतनीसाचे काम करावे.
11 त्याचमप्रमाणे, [c] (विशेष मदतनीस) स्रियांनीही आदरणीय असावे. त्या चुगलखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
12 जे खास मदतनीस आहेत त्यांना फक्त एकच पत्नी असावी. आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. 13 कारण मदतनीस म्हणून जे चांगली सेवा करतात, ते त्यांच्यासाठी आदरणीय स्थान मिळवितात आणि ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्या विश्वासात महान आत्मविश्वास मिळवितात.
आपल्या जीवनाचे रहस्य
14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहीत आहे. 15 यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे. 16 आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
तो मानवी शरीरात दिसला;
आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला,
देवतूतांनी त्याला पाहीले होते;
राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला.
जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला
आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
2006 by World Bible Translation Center