M’Cheyne Bible Reading Plan
प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाण्याविषयीचे नियम
17 परमेश्वर मोशेले म्हणाला, 2 “अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही: 3 इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला, 4 तर त्या माणसाने तो प्राणी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणावा; त्याने त्या प्राण्याचा वध करुन रक्त सांडले आहे म्हणून त्याने तो परमेश्वराच्या निवासमंडपापाशी आणावा; त्याने जर तसे केले नाही तर त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. 5 ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे. 6 याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा म्हणजे त्या सुवासाने त्याला आनंद होईल. 7 आणि यापुढे त्यांनी ‘अजमूर्तीना’ अजिबात बळी अर्पण करु नयेत. ते त्या दुसऱ्या देवांच्या मागे लागले व अशारीतीने त्यांनी वेश्येप्रमाणे आचरण केले. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
8 “तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला, 9 तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.
10 “इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन. 11 कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे. 12 म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतो की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
13 “इस्राएलपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. 14 कारण मासांमध्ये जर अद्याप रक्त आहे तर त्या प्राण्याचा जीव अद्याप त्याच्या मांसात आहे, म्हणून मी इस्राएल लोकांना ही आज्ञा देतो की ज्या मांसात अद्याप रक्त आहे ते मांस खाऊनका! जर कोणी माणूस रक्त खाईल, तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
15 “त्याचप्रमाणे कोणी इस्राएल माणूस असो किंवा त्यांच्यामध्ये राहणार परदेशीय असो! तो जर आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे मग तो शुद्ध होईल. 16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
21 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते
तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
2 राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास.
राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
3 परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास.
तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस,
देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
5 तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस.
तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
6 देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास.
राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
7 राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
8 देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील.
तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
9 भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते.
परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो.
त्याचा क्रोध अग्नी सारखा जळतो
आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल
ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द् वाईट गोष्टींची योजना आखली
परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस.
तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस.
तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ
आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.
लमुएल राजाची नीतिसूत्रे
31 ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या.
2 तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस. 3 तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियांमुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वतःचा नाश करु नकोस. 4 लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. 5 ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील. 6 गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या. 7 ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील.
8 जर एखादा माणूस स्वतःला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे. 9 ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा.
सर्वगुणसंपन्न बायको
10 j सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे.
पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे.
11 तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो.
तो कधीही गरीब होणार नाही.
12 ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते.
ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही.
13 ती नेहमी लोकर आणि कापड
तयार करण्यात मग्न असते.
14 ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते.
ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते.
15 ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते
आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
16 ती जमिनी बघते आणि विकत घेते.
तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
17 ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे.
आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे.
18 तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो.
आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते.
19 ती स्वतःचे सूत स्वतः कातते
आणि स्वतःचे कपडे विणते.
20 ती नेहमी गरीबांना देते
आणि ज्यांना गरज असते अशांना मदत करते.
21 जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही.
तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.
22 ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते.
चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.
23 लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात.
तो देशाचा एक नेता असतो.
24 ती खूप चांगली उद्योगी-स्त्री असते.
ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.
25 ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात
तीला भविष्याबद्दल विश्वास आहे.
26 ती शहाणपणाचे बोल बोलते.
ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते.
27 ती कधीही आळशी नसते.
ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते.
28 तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात.
तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो,
29 “चांगल्या स्त्रिया खूप आहेत.
पण तू सर्वांत चांगली आहेस.”
30 मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल.
पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशंसा केली पाहिजे.
31 तिला साजेसे बक्षीस तिला द्या.
लोकांमध्ये तिची प्रशंसा करा.
तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.
पुरुष आणि स्त्रियांसाठी काही नियम
2 सर्वांत प्रथम मी कळकळीने विनंति करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे. 2 आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की, आम्हांला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. 3 हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
4 ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. 5 कारण फक्त एकच देव आहे. आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे: तो म्हणजे ख्रिस्त येशू जो स्वतःमनुष्य होता. 6 सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वतःला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्ष दिली. 7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
Special Instructions for Men and Women
8 म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. ते प्रार्थना करीत असताना त्यांनी आपले हात उंचवावेत, जे देवाला पवित्र असे आहेत. व असे न रागावता व न भांडण करता करावे.
9 त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत. 10 उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे.
11 स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे. 12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे. 13 मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला. 14 त्यानंतर हवा. आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली. आणि ती पापात पडली. 15 परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.
2006 by World Bible Translation Center