M’Cheyne Bible Reading Plan
प्रायश्चिताचा दिवस
16 अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. 2 तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!
3 “परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी त्याने पापार्पणसाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा. 4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
5 “अहरोनाने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणाकरिता दोन बकरे व होमार्पणाकरित एक मेंढा घ्यावा. 6 त्यांने पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करुन स्वतःसाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
7 “मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. 8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व अजाजेलसाठी.
9 “परमेश्वरासाठी म्हणून, चिठ्ठी निघालेला बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा; 10 पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व तो लोकांकरिता प्रायश्चित म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
11 “मग अहरोनाने पापार्पणाच्या गोऱ्ह्याचा वध करुन स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. 12 नंतर त्याने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा. 13 त्याने तो परमेश्वरासमोर अग्नीवर, इतका घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटावरील दयासन व्यापून टाकावे म्हणजे मग तो मरणार नाही; 14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वबाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
15 “मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आतल्या दालनात आणावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. 16 ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.
17 “अहरोन प्रायश्चित करण्यासाठी जेव्हा परमपवित्रस्थानात जाईल तेव्हापासून, तो स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करुन बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात कोणी नसावे व कोणी तेथे जाऊ नये. 18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. 19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
20 “तेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरिता प्रायश्चित करण्याचे संपविल्यावर त्याने जिवंत बकरा सादर करावा. 21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे. 22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व पापकर्माचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
23 “मग अहरोनाने दर्शनमंडपात येऊन परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरुन तेथे ठेवावी. 24 मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वतःसाठी होमार्पण करावे, लोकांसाठी होमार्पण करावे आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. 25 मग त्याने पापार्पणाच्या चरबीच्या वेदीवर होम करावा.
26 “ज्या माणसाने पाप बाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर छावणीत यावे.
27 “पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त अहरोनाने प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे. मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत. 28 ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व मग छावणीत यावे.
29 “तुमच्यासाठी हा एक कायमचा विधीनियम असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता, [a] जिवास दंडन करावे, तुम्ही नम्र व्हावे; त्या दिवशी तुम्ही तसेच तुमच्या देशात राहणारे परके किंवा परदेशी ह्यापैकी कोणीही कसलेच काम करु नये; 30 कारण त्या दिवशी तुम्ही पापापासून शुद्ध व्हावे म्हणून याजक तुमच्यासाठी प्रायश्चित करील, मग परमेश्वरासमोर तुम्ही पापापासून शुद्ध ठराल. 31 तुमच्यासाठी हा फार महत्वाचा व पूर्ण विसाव्याचा शब्बाथ दिवस आहे; तुम्ही अन्न न घेता आपल्या जिवास दंडन करावे. तुम्ही नम्र व्हावे; हा कायमचा विधी नियम होय.
32 “तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. 33 त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे. 34 इस्राएल लोकांसाठी त्यांच्या पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधीनियम होय.”
परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
याकेहचा मुलगा अगूर याची नीतीसूत्रे
30 ही याकेहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकाल [a] यांना निरोप आहे.
2 मी पृथ्वीवरचा सगळ्यात वाईट माणूस आहे, मी जितके समजून घ्यायला हवे होते तितके मी समजू शकत नाही. 3 मी शहाणा व्हायला शिकलो नाही, आणि मला देवाबद्दल काहीही माहीत नाही. 4 स्वर्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल?
5 देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते. 6 म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल.
7 देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे. 8 खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे. 9 माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन.
10 सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
11 काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत.
12 काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात.
13 काही लोक स्वतःला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.
14 असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
15 काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायला आवडते. ते फक्त “मला दे,” “मला दे” एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्यांना कधीही पुरेसे मिळत नाही. 16 मृत्यूची जागा, वांझ स्त्री, पाऊस हवा असलेली कोरडी जमीन आणि रुद्र भीषण, न विझवता येणारी आग.
17 जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
18 तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. 19 आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
20 जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते.
21 तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही. 22 राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. 23 प्रेम न मिळालेली तरीही नवरा मिळवणारी स्त्री आणि मालकिणीवर सत्ता गाजवणारी नोकर असलेली मुलगी
24 पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
25 मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात पण तरी ही त्या उन्हाळाभर अन्न साठवतात.
26 ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात.
27 टोळांना राजा नसतो पण तरीही ते एकत्र काम करु शकतात.
28 पाली हाताने पकडण्याइतक्या लहान असतात. पण तुम्ही त्यांना राजाच्या घरातदेखील पाहू शकता.
29 तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.
30 सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे. त्याला कशाचीही भीती वाटत नाही.
31 गर्वाने चालणारा कोंबडा,
बकरी
आणि त्याच्या लोकांमध्ये असलेला राजा.
32 जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
33 जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.
1 आपला तारणारा देव आणि आपली आशा ख्रिस्त येशू यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून
2 विश्वासातील माझा खरा पुत्र तीमथी याला:
देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू, आमचा प्रभु याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांति लाभो.
खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा
3 मी मासेदोनियाला जात असता तुला कळकळीने विनंति केल्याप्रमाणे तू इफिस येथे राहावेस असे माझे म्हणणे आहे. यासाठी की, काही ठराविक लोकांना खोटे शिक्षण देऊ नका अशी तुला त्यांना आज्ञा करता यावी. किंवा 4 कथा-कहाण्यांच्या आहारी जाऊ नका आणि न संपणाऱ्या वंशावळ्या याकडे लक्ष देऊ नका असे तू त्यांना सांगावेस. कारण त्यामुळे भांडण वाढते आणि विश्वासाने देवाची योजना जी पूर्ण होते ती या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही. 5 आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते. 6 काहींनी पतनामुळे या गोष्टीकडून आपले लक्ष दुसरीकडे लावले आहे व ते व्यर्य बडबडीकडे वळले आहेत. 7 त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
8 आता आम्हाला हे माहीत आहे की, नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे. जर कोणी त्याचा चांगला वापर करतो. 9 म्हणजे हे जाणून घेऊन की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर नियमशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी, तिरस्करणीय लोकांसाठी, पापयांसाठी, भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी, वडिलांना ठार मारणाऱ्या, आईला ठार मारणाऱ्यासाठी, 10 खुनी लोकांसाठी, जारकर्मी, समलिंगसंभोगी, इतर मनुष्यांना फसविणारे, खोटारडे, खोटी शपथ घेणारे यांच्यासाठी आहे. इतर जे दुसरे सगळे करतात ते चांगल्या शिक्षणाविरुद्ध आहेत, 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपविली आहे, तिला हे अनुसरून आहे.
देवाच्या दयेबद्दल उपकार
12 जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभुचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले. 13 जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो. 14 परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.
15 एक विश्वसनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे. 16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली, यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळावे. 17 आता अनंतकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला माहिमा आणि गौरव अनंतकाळासाठी असो. आमेन.
18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवीत आहे. यासाठी की सुयुद्ध करण्यात तिचा उपयोग करता यावा. 19 तुम्हांला विश्वास आणि चांगला विवेक असावा. कित्येकांनी चांगला विवेक नाकारुन विश्वास तारवाप्रमाणे उद्ध्वस्त केला आहे. 20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, देवाविरुद्ध न बोलण्याविषयी त्यांनी शिकावे.
2006 by World Bible Translation Center