M’Cheyne Bible Reading Plan
शरीरातून वाहणाऱ्या अशुद्ध स्त्रावांसंबधी नियम
15 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय. 3 त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
4 “स्त्राव होणारा माणूस ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय. 5 जो कोणी त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे. 6 स्त्राव होणारा माणूस बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे. 7 स्त्राव होणाऱ्या माणसाच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 8 स्त्राव होणारा माणूस जर एखाद्या शुद्ध माणसावर थुंकला तर त्या शुद्ध माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 9 स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय. 10 त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 11 स्त्राव होणारा माणूस पाण्याने हात न धुता कोणाला शिवला तर त्या दुसऱ्या माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
12 “परंतु स्त्राव होणारा माणूस एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13 “स्त्राव होणारा माणूस आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल. 14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी. 15 मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या माणसाच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
16 “एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 17 ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. 18 स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
19 “एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तीने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; 20 ती दूर असे पर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय. 21 जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 22 ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 23 तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
24 “अशा स्त्रीबरोबर लेंगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
25 “एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्त्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋ तुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय. 26 तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात समजते. तशी अशुद्ध समजावी. 27 जर कोणी त्या वस्तूंना शिवेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 28 त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल. 29 मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे. 30 मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
31 “ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!”
32 स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो; 33 आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करुन अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.
प्रमुख गायकासाठी परमेश्वराचा सेवक दावीदयाचे स्तोत्र. दावीदाने हे स्तोत्र [a] परमेश्वराने त्याला शौलापासून आणि इतर शंत्रूपासून वाचवले तेव्हा लिहीले.
18 तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस,
मी तुझ्यावर प्रेम करतो.”
2 परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे.
माझा देव माझा खडक आहे.
मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो.
देव माझी ढाल आहे.
त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते. [b]
परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.
3 त्यांनी माझी चेष्टा केली.
परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला
आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
4 माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते.
मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.
5 थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या.
मृत्यूचा सापळा माझ्या भोवती होता.
6 सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला.
होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले.
देव त्याच्या मंदिरात होता.
त्याने माझा आवाज ऐकला.
त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
7 पृथ्वी हादरली आणि कंपित झाली.
स्वर्गाचा पाया हादरला.
का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.
8 देवाच्या नाकातून धूर आला
देवाच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या.
त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
9 परमेश्वराने आकाश फाडले
आणि तो खाली आला तो घट्ट् काळ्या ढगावर उभा राहिला.
10 परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन
वाऱ्यावर उंच उडत होता.
11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता.
तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
12 नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले.
तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
13 परमेश्वराने ढगांमधून गडगडाट केला,
त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली
परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.
15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास
आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला
पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला.
आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले.
परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते.
ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.
18 मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला.
परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.
19 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
म्हणून त्याने माझी सुटका केली.
तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.
20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल
मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली
मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो.
मी त्याचे नियम पाळतो.
23 मी त्याच्या समोर स्वत:ला शुध्द आणि निरपराध राखले.
मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.
24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल.
का? कारण मी निरपराध आहे.
देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून
तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.
25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील.
जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
26 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला
आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणाऱ्यांना तू नामोहरण करतोस.
27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस,
पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.
28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस
देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो.
देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.
30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे.
परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे.
जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
31 परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही.
आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
32 देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी
तो मला मदत करतो.
33 देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो.
तो मला उंचावर स्थिर ठेवतो.
34 देव मला युध्दाचे शिक्षण देतो.
त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.
35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस
तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास
माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
36 माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस.
त्यामुळे मी न पडता चालू शकलो.
37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो
आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन.
ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.
माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
39 देवा, तू मला युध्दात शक्तिमान बनवलेस
तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.
40 तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस
आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.
41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या
परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते.
त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले
पण त्याने उत्तर दिले नाही.
42 मी माझ्या शत्रूंचे मारुन तुकडे केले.
त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.
43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला
त्या राष्ट्रांचा प्रमुख कर
जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
44 ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील.
ते परदेशी मला घाबरतील.
45 ते परदेशी गलितगात्र होतील.
ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
46 परमेश्वर जिवंत आहे,
मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव
मला वाचवतो तो महान आहे.
47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली,
त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.
48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द् उभे राहिले
त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.
49 परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो
म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.
50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द् जिंकायला मदत करतो
तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो.
तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.
29 जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला तू चुकतो आहेस असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
2 राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
3 जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.
4 राजा जर न्यायी असला तर राष्ट्र बलशाली होते. पण राजा स्वार्थी असला आणि लोकांना त्यांच्या गोष्टी करुन घेण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत असले तर ते राष्ट्र कमजोर होईल.
5 जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वतःसाठीच सापळा तयार करीत असतो.
6 वाईट लोकांचा त्यांच्याच पापामुळे पराभव होतो पण चांगला माणूस गाणे गाऊन आनंदी राहातो.
7 चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत. 8 जे लोक स्वतःला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
9 शहाणा माणूस जर मूर्खाबरोबर त्याच्या समस्या सोडवायला लागला तर तो मूर्ख वाद घालेल व मूर्खासारख्या गोष्टी करेल आणि त्या दोघांचे कधीही एकमत होणार नाही.
10 खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांना [a] ठार मारायचे असते.
11 मूर्खाला चटकन् राग येतो पण शहाणा माणूस धीर धरतो आणि स्वतःला काबूत ठेवतो.
12 राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील.
13 गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
14 राजा जर गरीबांच्या बाबातीत न्यायी असला तर तो खूप काळ राज्य करेल.
15 मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल.
16 जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
17 तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही.
18 जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
19 जर तुम्ही फक्त सेवकाशी बोललात तर तो त्याचा धडा शिकणार नाही. तो सेवक तुमचे शब्द समजू शकेल पण तो ते पाळणार नाही.
20 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आशेला जागा नाही. जो विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाच्या बाबतीत आशेला अधिक जागा आहे.
21 जर तुम्ही तुमच्या सेवकाला तो जे जे मागेल ते ते सर्व दिले तर शेवटी तो चांगला सेवक होणार नाही.
22 रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.
23 माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरांपेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.
24 बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायला खूपच घाबरेल.
25 भीती ही सापळ्यासारखी असते. पण जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल.
26 खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांचा योग्य न्याय करतो.
27 चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
आमच्यासाठी प्रार्थना करा
3 आम्हाला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेतः बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूच्या संदेशाचा प्रसार लवकर व्हावा आणि ते गौरविले जावे. 2 आणि प्रार्थना करा की, हेकट व दुष्ट माणसांपासून आमची सुटका व्हावी कारण सर्वच लोकांचा प्रभूवर विश्वास नाही.
3 पण प्रभु विश्वासू आहे. तो तुम्हांला बळकट करील व दुष्टांपासून तुमचे रक्षण करील. 4 प्रभूमध्ये आम्हांला तुमच्याविषयी विश्वास आहे आणि खात्री आहे की, जे आम्ही तुम्हाला करण्यासाठी सांगत आहोत ते तुम्ही करीत आहात व ते पुढे करीतच राहाल. 5 प्रभु तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत आणि ख्रिस्ताच्या सोशिक सहनशीलतेकडे नेवो.
कार्य करण्यासाठी अटी
6 आता, बंधूंनो, आम्ही तुम्हांला आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो की, जो कोणी बंधु, ज्या परंपरा त्यांना आमच्याकडून मिळाल्या त्या परंपरांप्रमाणे चालत नाही, तर आळशी जीवन जगत आहे तर त्याच्यापासून दूर राहा. 7 मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वतः जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो. 8 किंवा कोणाकडूनही आम्ही फुकटची भाकर खाल्ली नाही, उलट, रात्रंदिवस आम्ही काबाडकष्ट केले यासाठी की तुमच्यावर आम्ही ओझे होऊ नये. 9 याचा अर्थ असा नाही की, आम्हांला तुमच्याकडून मदत मागण्याचा अधिकार नाही, पण आम्ही आमच्या गरजा भागविण्यासाठी काम केले ते यासाठी की, आम्ही तुमच्यासमोर उदाहरण ठेवावे व तुम्ही आमचे अनुकरण करावे. 10 कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.”
11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) 12 आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वतःची भाकर स्वतःच मिळवून खावी. 13 पण बंधूंनो, तुम्ही तुमच्यासाठी चांगले करीत असता थकू नका.
14 जर कोणी या पत्राद्वारे आमच्या सूचनांचे पालन करीत नाही, तर तो कोण आहे हे लक्षात ठेवा व त्याच्याबरोबर राहू नका, यासाठी की त्याला लाज वाटावी. 15 पण त्याला शत्रू समजू नका, परंतु धाक द्या, जसे त्याला तुमचा भाऊ समजा.
शेवटचे शब्द
16 आता प्रभु स्वतः जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला सर्वकाळ आणि सर्व प्रकारे शांति देवो, प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 मी पौल माझ्या स्वतःच्या हातांनी हा सलाम लिहितो. माझ्या प्रत्येक पत्राची ही खूण आहे. ह्या प्रकारे मी प्रत्येक पत्र लिहितो व अशा प्रकारे लिहितो.
18 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center