M’Cheyne Bible Reading Plan
त्वचारोगाविषयी नियम
13 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, 2 “एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ठ्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे. 3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्ठा तपासावा व त्या चट्ठ्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्ठा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्ठा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
4 “त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा चट्ठा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे ठेवावे. 5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्ठा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे. 6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्ठा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
7 “परंतु त्या माणसाने स्वतःला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे. 8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
9 “एखाद्या माणसाला महारोगाचा चट्ठा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे. 10 याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढच्या चट्ठ्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर 11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
12 “एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे, 13 त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे. 14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा. 15 याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
16 “परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे; 17 याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्ठा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
18 “कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला 19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा. 20 याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्ठा आहे. 21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागाकातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे. 22 तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्ठा आहे. 23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.
24 “एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात पांढरा डाग दिसून येईल. 25 तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय. 26 पण तपासल्यावर त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती फुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे. 27 सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय; 28 परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
29 “एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्ठा असला, 30 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय. 31 तो चाईचा चट्ठा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्ठा असलेल्या व्यक्तीला त्याने सात दिवस वेगळे ठेवावे; 32 सातव्या दिवशी त्याने त्या चट्ठ्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही, 33 तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे. 35 परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली 36 तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे. 37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
38 “कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत पांढरे डाग असतील. 39 तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय न करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
40 “कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय. 41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे. 42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्ठा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे. 43 मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले, 44 तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्ठा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
45 “ज्याला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांना इशारा देण्यासाठी ‘अशुद्ध अशुद्ध’ असे ओरडत जावे. 46 जोपर्यत त्याच्या अंगावर चट्ठा असेल तितक्या दिवसापर्यत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
47-48 “एकाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्ठा पडला, किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला. 49 आणि तो चट्ठा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्ठा होय; तो याजकाला दाखवावा; 50 याजकाने तो चट्ठा तपासावा; चट्ठा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करुन ठेवावी. 51-52 त्याने सातव्या दिवशी तो चट्ठा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे. याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;
53 “परंतु तो चट्ठा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे. 54 याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
56 “परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा. 57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे. 58 परंतु तो चट्ठा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्ठा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
दावीदाचे गाणे.
15 परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल?
तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2 जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो,
अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल.
3 तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वत:च्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही.
त्यांना त्रास होईल असे काही करत नाही.
तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
4 तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही.
परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो.
त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल,
तर तो त्या वचनाला जागतो. [a]
5 जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील
तर तो कर्जावर व्याज आकारत नाही.
आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही.
जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील. [b]
दावीदाचे मिक्ताम [c] नावाचे स्तोत्र
16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
2 मी परमेश्वराला म्हणालो,
“परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
6 माझा वाटा फारच अद्भूत आहे
माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
9 त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [d]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
27 भविष्यात काय घडेल याबद्दलच्या फुशारक्या मारु नका. उद्या काय घडेल ते तुम्हाला माहीत नसते.
2 स्वतःचीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या.
3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते.
4 राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.
5 उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते.
6 मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते.
7 तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही.
8 घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी.
9 अत्तर आणि गोड वास असलेल्या वस्तू तुम्हाला आनंद देतात. पण संकटे तुमच्या मनाची शांती घालवतात.
10 तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मित्रांना विसरु नका. आणि तुम्ही संकटात असाल तर मदतीसाठी दूरच्या तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका. जवळच्या शेजाऱ्याला विचारणे हे दूरवरच्या तुमच्या भावाकडे जाण्यापेक्षा चांगले असते.
11 मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन.
12 शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात.
13 जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जाबद्दल स्वतः जामीन राहिलात तर तुम्हाला तुमचे कपडेदेखील गमवावे लागतील.
14 “सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल.
15 सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते. 16 त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते.
17 लोखंडाच्या सुरीला धार करण्यासाठी लोखंडाचेच तुकडे वापरतात. त्याचप्रमाणे लोक एकमेकांना धारदार बनविणे एकमेकापासूनच शिकतात.
18 जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल.
19 माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वतःचा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते.
20 मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही.
21 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
22 मूर्खाला दळून तुम्ही त्याचे पीठ केले तरी त्याचा मूर्खपणा तुम्ही घालवू शकणार नाही.
23 तुमच्या मेंढ्यांची आणि पशुधनाची काळजी घ्या. त्यांची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखत आहात याची खात्री करा. 24 संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा् कायम राहात नसतात. 25 गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा. 26 तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या. 27 तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शेळीचे बरेच दूध असेल. त्यामुळे तुमच्या सेवकमुली निरोगी राहतील.
1 पौल सिल्वान आणि तीमथ्य याजकडून, थेस्सलनीका येथील मंडळीला जो देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची आहे त्यांना
2 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांति तुम्हांबरोबर असो.
3 बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे. 4 म्हणून आम्हाला स्वतः देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात व तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.
देवाच्या न्यायाविषयी पौल सांगतो
5 देव त्याच्या न्याय करण्यामध्ये योग्य आहे हा त्याचा पुरावा आहे. त्याचा हेतू हा आहे की ज्यासाठी आता तुम्हांला त्रास सोसावा लागत आहे, त्या देवाच्या राज्यात प्रवेश करण्यास तुम्हांला पात्र ठरविले जावे. 6 खरोखर जे तुम्हांला दु:ख देतात त्याची दु:खाने परतफेड करणे हे देवाच्या दृष्टीने त्याच्यासाठी योग्य आहे. 7 आणि आमच्याबरोबर जे तुम्ही दु:ख भोगीत आहात त्यांना आमच्याबरोबर विश्रांती देण्यासाठी, प्रभु येशू प्रकट होताना तो स्वर्गातून आपले सामर्थ्यवान दूत आणि अग्निज्वालेसह येईल. 8 आणि ज्यांना देव माहीत नाही आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आवश्यक त्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांना देव शिक्षा करील. 9 ते अनंतकाळचा नाश असलेला असा शिक्षेचा दंड भरतील. ते प्रभु येशूच्या समक्षतेतून आणि वैभवी सामर्थ्यातून वगळले जातील. 10 त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.
11 या कारणासाठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो व विनंति करतो की, आमच्या देवाने त्याच्या पाचारणासाठी योग्य असे तुम्हाला गणावे तुमच्या विश्वासापासून निर्माण होणारे प्रत्येक काम व चांगुलपणाचा निश्चय समर्थपणे पूर्ण करावा. 12 यासाठी की आमचा देव आणि प्रभु येशूच्या कृपेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.
2006 by World Bible Translation Center