M’Cheyne Bible Reading Plan
मांस खाण्यासंबंधीचे नियम
11 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला: 2 “इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे: 3 ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
4-6 “काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, ते तुम्ही खाऊ नयेत, उंट, शाफान-सशासारखा खडकात राहणारा एक प्राणी, ससा हे असे प्राणी आहेत, ते तुम्हांकरिता अशुद्ध प्राणी आहेत. 7 डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हांकरिता अशुद्ध आहे. 8 ह्यां प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवाला शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
जलचर प्राणी खाण्यासंबंधी नियम
9 “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे. 10-11 जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टिने ते अयोग्य आहेत. ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये. 12 जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
खाण्यास मना केलेले पक्षी
13 “देवाच्या दृष्टिने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले व म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरूड, गिधाडे, कुरर, 14 घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे, 15 निरनराळ्या जातीचे कावळे, 16 शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे, 17 पिंगळा, करढोक, मोठे घुबड, 18 पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड, 19 करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
खाण्याच्या कीटकासंबंधी नियम
20 “जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये! 21 परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे. 22 त्याच प्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावे.
23 “परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये. 24 त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवाला शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल; 25 जो कोणी मेलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
प्राण्यांविषयी आणखी नियम
26-27 “ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत; चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे. 28 जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
रांगणाऱ्या प्राण्यांविषयी नियम
29 “जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे, 30 चौपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिज्या सरडा. 31 हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
अशुद्ध प्राण्यांविषयी नियम
32 “त्यांच्यापैकी कोणी मरुन एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, तो पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे. 33 त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे. 34 अशुद्ध खापराचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध होते. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध होईल. 35 त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करुन ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
36 “झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध होईल. 37 त्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे; 38 परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यांवर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
39 “खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे. 40 कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
41 “जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत. 42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. 43 कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वतःला अशुद्ध करुन घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करुन विटाळवू नका! 44 कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका! 45 मी तुम्हाला मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
46 प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्याविषयी हे नियम आहेत. 47 ह्या नियमावरुन शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्यांच्यातील भेद तुम्हांस समजावा.
बाळंत झालेल्या मातांच्या शुद्धीकरणाविषयी नियम
12 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग,
“जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.
6 “तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. 7 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी. 8 मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
2 तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
3 परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
नाही तर मी मरुन जाईन.
4 जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.
5 परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
6 मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
त्याला शहाणे लोक शोधायचे होते
शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
दुष्टांना देव माहीत नाही.
त्यांच्याकडे खायला [b] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
6 परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
मूर्खांबद्दलची नीतिसूत्रे
26 उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.
2 एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात.
3 घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो.
4 एक वाईट परिस्थिती: मूर्खाने जर तुम्हाला मूर्खासारखा प्रश्न विचारला तर मूर्खासारखे उत्तर देऊ नका. नाहीतर तुम्ही सुध्दा मूर्खासारखेच दिसाल. 5 पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
6 तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
7 मूर्ख जेव्हा शहाण्यासारखे बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा ते लंगड्याने चालण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते.
8 मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे.
9 मूर्ख जेव्हा काहीतरी शहाणपणाचे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते झिंगलेल्या माणसाने हातात रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते.
10 मूर्खाला किंवा वाटेवरच्या कोणालाही मोलाने काम करायला सांगणे धोकादायक असू शकते. त्यामुळे कोणाला इजा होईल ते सांगता येणार नाही.
11 कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
12 जर एखादा माणूस शहाणा नसताना स्वतःला शहाणा समजत असेल तर तो मूर्खापेक्षाही वाईट आहे.
13 आळशी माणूस म्हणतो, “मी माझे घर सोडू शकत नाही. रस्त्यात सिंह आहे.”
14 आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
15 आळशी माणूस स्वतःचे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो.
16 आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते.
17 दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रस्त्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते.
18-19 जो माणूस एखाद्याला फसवतो आणि नंतर तो केवळ गंमत करीत होता असे म्हणतो तेव्हा ते वेड्याने अग्नीबाण हवेत फेकून कुणाला तरी अपघाती करण्यासारखेच आहे.
20 शेकोटीत जर लाकडे नसतील तर ती शेकोटी विझून जाते. त्याचप्रमाणे अफवा नसतील तर वाद संपून जातात.
21 लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.
22 लोकांना गप्पा-टप्पा आवडतात. ते चांगले अन्न खाल्ल्यासारखे असते.
23 दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते. 24 दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो. 25 तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे. 26 तो त्याच्या दुष्ट योजना चांगल्या शब्दांनी लपवतो. पण तो फारच नीच असतो आणि शेवटी तो ज्या वाईट गोष्टी करतो त्या सर्वांना दिसतील.
27 जर एखाद्याने दुसऱ्याला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःच त्यात अडकतो जर एखाद्याने दुसऱ्यावर दरड टाकण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःच त्या दरडीखाली चिरडून जाईल.
28 जो माणूस खोटे बोलून ज्या लोकांना दु:ख देतो त्यांचा तो तिरस्कार करीत असतो. आणि तो जर त्याच्या मनात नसताना काही बोलला तर तो स्वतःलाच दु:खी करीत असतो.
प्रभूच्या येण्यासाठी तयार राहा
5 बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही. 2 कारण तुम्ही स्वतःचे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल. 3 जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
4 परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही. 5 कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. 6 म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु. 7 कारण जे झोपतात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात, 8 परंतु आपण दिवसाचे असल्याने स्वःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.
9 कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही, तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे. 10 तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे. 11 म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.
शेवटच्या सूचना आणि सलाम
12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या. 13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या.
एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. 15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका. 20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका. 21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा. 22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
23 देव स्वतः जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्यत्व म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. 24 देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.
25 बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा. 26 पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा. 27 मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे. 28 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center