M’Cheyne Bible Reading Plan
देव अहरोनाच्या दोन मुलांचा नाश करतो
10 मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला; 2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.’” तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
4 अहरोनाचा चुलता उज्जिएल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्र स्थानाच्या पुढच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6 मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा; 7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, 9 “जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे. 10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जणावा; 11 आणि परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.”
12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, “परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे; 13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हव्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
14 “त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे. 15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी अणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला, 17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते; 18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागीं बसून अवश्य खावयाचे होते.”
19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
2 दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
3 त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
मग चांगली माणसे काय करतील?
4 परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
5 परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
6 तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
7 परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.
प्रमुख गायकासाठी शेमीनिथ सुरावरचे दावीदाचे स्तोत्र.
12 परमेश्वरा, मला वाचव!
सर्व चांगले लोक आता गेले आहेत.
आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही.
2 लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात.
प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो.
3 परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत
परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या जीभा छाटून टाकल्या पाहिजेत.
4 ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ
कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून
आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.”
5 परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते
अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात.
परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन
आणि त्यांचे रक्षण करीन.”
6 परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत.
ते अग्नीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
7 परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे.
त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.
8 ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत.
ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्त [b] असतात.
शलमोनाची आणखी नीतिसूत्रे
25 ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहुदाचा राजा हिज्कीया याच्या नोकरांनी या शब्दांची नक्कल केली.
2 काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात अशी देवाची इच्छा असते. या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवायचा देवाला हक्क आहे. पण राजा ज्या गोष्टी शोधून काढतो त्याबद्दल त्याला मान मिळतो.
3 आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही.
4 चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो. 5 त्याचप्रमाणे राजापासून त्याचे दुष्ट उपदेशक दूर केले तर चांगुलपणा त्याचे राज्य भक्कम करील.
6 राजासमोर स्वतःची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका. 7 राजाने स्वतःच तुम्हाला आमंत्रण दिलेले अधिक चांगले. पण तुम्ही स्वतः होऊनच गेलात तर इतर लोकांसमोर तुम्हाला गोंधळल्यासारखे होईल.
8 तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द् केले तर तुम्ही गोंधळून जाल.
9 जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका. 10 तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही.
11 तुम्ही जर योग्य वेळी चांगली गोष्ट संगितली तर ते चांदीच्या तबकातले सोन्याचे सफरचंद असेल.
12 जर शहाण्या माणसाने तुम्हाला समज दिली असेल तर ती शुध्द सोन्याच्या अंगठ्यापेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा अधिक किंमती असेल.
13 विश्वासू दूताची किंमत ज्यांनी त्याला पाठविले असेल त्यांच्या इतकीच असते. तो उन्हाळ्यातील हंगामाच्या दिवसांतल्या थंडगार पाण्यासारखा आहे.
14 जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
15 धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते.
16 मध चांगला असतो पण तो खूप खाऊ नका. तुम्ही जर तो खूप खाल्लात तर तुम्हाला त्याचा तिटकारा येईल. 17 त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल.
18 जो माणूस खरे सांगत नाही तो धोकादायक असतो. तो सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण यांसारखा असतो. 19 खोटे बोलणाऱ्यावर संकटकाळी विश्वास टाकू नका. तो माणूस दुखणाऱ्या दातासारखा वा जायबंदी झालेल्या पायासारखा असतो. तुम्हाला त्याची तेंव्हा सर्वांत जास्त गरज असते तेव्हाच तो तुम्हाला इजा करत असतो.
20 दुखी: माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे.
21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या. 22 तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.
23 उत्तरेकडून वाहणारा वारा पाऊस आणतो त्याचप्रमाणे चुगल्या राग आणतात.
24 वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा छपरावर राहाणे अधिक चांगले.
25 खूप लांबच्या स्थळाहून आलेली, चांगली बातमी ही तुमच्या तहानलेल्या जीवाला थंडगार पाण्यासारखी असते.
26 जर चांगला माणूस दुबळा झाला आणि वाईट माणसाचा मार्ग आक्रमू लागला तर ते चांगल्या पाण्यात माती कालवल्यासारखे असते.
27 जर तुम्ही खूप मध खाल्लात तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्याचप्रमाणे स्वतःसाठी खूप मानमरातब घेण्याचा प्रयत्न करु नका.
28 जर माणूस स्वतःवर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.
देवाला संतोषविणारे जीवन
4 बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा. 2 कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या. 3 आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. 4 त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. [a] 5 आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे. 6 त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे. 7 कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते. 8 म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
9 आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे. 10 आणि हे खरे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
11 आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा. 12 यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
प्रभूचे येणे
13 बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही. 14 कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
15 आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही. 16 कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील. 17 मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू. 18 म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
2006 by World Bible Translation Center