Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 9

याजक आपले काम सुरू करतात

आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना (पुढाऱ्यांना) बोलावले. मोशे अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर; आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही एक एक वर्षाची व निर्दोष असावीत; आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे.’”

मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजन येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे तेज तुम्हाला दिसेल.”

मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व काही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकाकडील बळीही अर्पण करुन त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”

तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वतःसाठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. मग अहरोनाचे मुलगे रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. 10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. 11 मग अहरोनाने मांस कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.

12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले. 13 मग अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. 14 त्याने त्याची आंतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.

15 मग त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोही पापार्पण म्हणून अर्पिला. 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.

18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले. 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली. 20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला. 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.

22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करुन त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.

23 मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले; 24 तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.

स्तोत्रसंहिता 10

10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
    संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
    आणि गरीब लोकांना त्रास देतात.
दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
    आधाशी लोक देवाला शाप देतात.
    अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
    ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
    देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
    देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
    आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
ते लोक नेहमी शाप देत असतात.
    ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
    ते सतत वाईट योजना आखत असतात.
ते गुप्त जागी लपून बसतात
    आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
    ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
    ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
    पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
    आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
    असा विचार गरीब लोक करतात.

12 परमेश्वरा, ऊठ!
    आणि काहीतरी कर.
    देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.

13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
    कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
    आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
    परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
    म्हणून त्यांना मदत कर.

15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस.
    त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर.
    दुखी: लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस.
    दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून सोड!

नीतिसूत्रे 24

— 19 —

24 वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका. ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.

— 20 —

चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात. आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात.

— 21 —

शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते. ज्ञान माणसाला शक्ती देते. युध्द सुरु करण्याआधी तुम्ही काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तुम्हाला जर (युध्द) जिंकायचे असेल तर तुम्हाला अनेक चांगले मार्गदर्शक हवेत.

— 22 —

मूर्ख लोकांना शहाणपण कळू शकत नाही. आणि लोक जेव्हा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करतात तेव्हा मूर्ख माणूस काहीही बोलू शकत नाही.

— 23 —

जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत. मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वतः ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.

— 24 —

10 जर तुम्ही संकटाच्या वेळी दुर्बल असाल तर तुम्ही खरोखरच दुर्बल आहात.

— 25 —

11 जर लोक एखाद्याला ठार मारण्याचे ठरवीत असतील तर तुम्ही त्याला वाचवायला हवे. 12 “माझा त्याच्याशी काही संबंध नाही” असे तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराला सर्व माहीत असते. आणि तुम्ही काही गोष्टी का करता ते त्याला माहीत असते. परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्याला सर्व कळते. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल.

— 26 —

13 मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो. 14 त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.

— 27 —

15 चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका. 16 चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल.

— 28 —

17 तुमचा शत्रू संकटात असतो तेव्हा आनंद मानू नका. तो पडतो तेव्हा आनंदून जाऊ नका. 18 जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.

— 29 —

19 दुष्ट लोकांना तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका. 20 या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.

— 30 —

21 मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस. 22 का? कारण त्या प्रकारच्या माणसांचा लगेच नाश होऊ शकतो. देव आणि राजा त्यांच्या शत्रूंसाठी किती संकटे निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहीत नाही.

आणखी नीतिसूत्रे

23 हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत.

न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये. 24 जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला “तू जाऊ शकतोस” असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील. 25 पण जर न्यायाधीशाने अपराध्याला शासन केले तर सर्व लोक आनंदी होतील.

26 खरे उत्तर सर्वांना आनंदी करते. ते ओठावरच्या चुंबनासारखे वाटते.

27 शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.

28 काही चांगले कारण असल्याशिवाय कुणाच्याही विरुध्द बोलू नका. खोटे सांगू नका.

29 “त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका.

30 मी आळशी माणसाच्या शेताजवळून जात होतो. मी शहाणा नसलेल्या माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. त्या 31 शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती. 32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करु लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. 33 “थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.” 34 या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.

1 थेस्सलनीकाकरांस 3

म्हणून, आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने, आम्ही अथेन्स येथेच राहण्याचे ठरविले.आणि आम्ही तीमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरीता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरीता सहकारी असा आहे, आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे. यासाठी की, सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये. कारण तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे की, यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे. खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हांला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की, आपला छळ होणार आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, नेमके तसेच घडले आहे. म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करुन घेण्याविषयी तीमथ्याला पाठविले. कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीति वाटत होती.

पण तीमथ्य आताच तुमच्याकडून परत आला आहे. आणि त्याने आम्हांला तुमचा विश्वास व प्रिति याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हांला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत, तसे तुम्हीही झाला आहात. म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारण म्हणजे तुमचा विश्वास. होय आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे. तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे? 10 दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की, आम्हाला तुमची व्यक्तिश: भेट घेणे शक्य व्हावे आणि अजुनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी.

11 आता देव स्वतः आमचा पिता आहे आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त तो आम्हांला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवो. 12 प्रभु करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढवो. आणि भरुन टाको. जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरुन वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरुन वाहावे. 13 यासाठी की, जेव्हा आमचा प्रभु येशू त्याच्या पवित्र जनांसह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंतःकरणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center