M’Cheyne Bible Reading Plan
इतर पापांकरिता अर्पाक्याची दोषार्पणे
6 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “कोणी परमेश्वराविरुद्ध खालीलपैकी एखादी गोष्ट करुन पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव म्हणून ठेवलेली वस्तू परत करण्यास खोटे बोलून नकार दिला. किंवा एखाद्याची चोरी केली किंवा कोणाला फसवीले. 3 किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली किंवा एखादे काम करण्याचे वचन दिले, पण मग ते काम करणार नाही किंवा एखादे वाईट काम केले; 4 जर कोणी वरील प्रमाणे काही केले तर त्याच्यावर पाप केल्याचा दोष येईल; त्याने चोरलेली वस्तू माघारी आणावी; किंवा फसवून काही घेतलेले किंवा गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव किंवा जिच्याबद्दल त्याने लबाडी केली अशी सापडलेली वस्तू किंवा 5 खोटे वचन देऊन न केलेले काम त्या प्रत्येकाबद्दल त्याने पूर्ण भरपाई करावी आणि त्या त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने खऱ्या मालकाला पैसे द्यावेत; दोषार्पण आणण्याच्या दिवशीच त्याने हे करावे. 6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा; 7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्या माणसासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला देव क्षमा करील.”
होमार्पणे
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, 9 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. 10 मग याजकाने आपला सणाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदी जवळ ठेवावी. 11 मग याजकाने आपली वस्त्रे बदलावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी; 12 परंतु वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर जळावू लाकडे ठेवून तो पेटत ठेवावा व त्याच्यावर शांत्यार्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा. 13 वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
14 “अन्नार्पणाचा नियम असा आहे: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते आणावे; 15 याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर मैदा, थोडे तेल व सगळा धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; तो परमेश्वरासाठी स्मारक अर्पण होईल; त्याच्या सुवासाने परमेश्वराला संतोष होतो.
16 “त्यातून उरलेले, खमीर नसलेले हे अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे. 17 ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्याना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे. 18 ह्या अर्पणातून अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुष हे खाऊ शकतो परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यान्पिढ्या सतत चालू राहावा; ह्या अर्पणास स्पर्श झाल्याने ते पवित्र होतील.”
याजकांचे अन्नार्पण
19 परमेश्वर मोशेला म्हणाला, 20 “अहरोन व त्याच्या मुलांनी अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी परमेश्वराला अर्पण आणावयाचे ते हे: आठ वाट्या म्हणजे एक दशांश एफा मैदा रोजच्या अर्पणाच्यावेळी आणावा, व त्यापैकी अर्धा सकाळी व अर्धा संध्याकाळी अर्पावा. 21 तो तेलात चांगला मळावा आणि तव्यावर चांगला भाजल्यावर व तेलात परतल्यावर आत आणावा व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करावेत; त्यांचा सुवास परमेश्वराला आनंद देईल.
22 “अहरोनाच्या मुलांपैकी त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून ज्याची निवड होईल त्यानेही असेच अर्पण आणावे. कायमचा विधी म्हणून ह्या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा. 23 याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.”
पापार्पणाचा विधि
24 परमेश्वर मोशेले म्हणाला, 25 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधि असा. ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे. 26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी खावा. 27 ज्या माणसाला किंवा वस्तूला त्या मांसाचा स्पर्श होईल तो माणूस किंवा ती वस्तू पवित्र होईल;
“त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्र स्थानीं धुवावे. 28 पापार्पणाचे मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
29 “याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला पापार्पणाचे मांस खाण्याचा हक्क आहे; ते परम पवित्र आहे; 30 पण ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपात पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी [a] आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.
प्रमुख गायकासाठी बासरीवरील दावीदाचे स्तोत्र.
5 परमेश्वरा, माझे शब्द ऐक.
मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे.
2 माझ्या देवा! माझ्या राजा!
माझी प्रार्थना ऐक.
3 परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो.
मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो
आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
4 देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत.
वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही.
वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
5 मूर्ख तुझ्याकडे येऊ शकत नाहीत.
जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस.
6 जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस.
जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.
7 परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन.
मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन.
8 परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखव लोक
माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात.
म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव.
9 ते लोक खरे बोलत नाहीत.
ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत
त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत
ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.
10 देवा, तू त्यांना शिक्षा कर.
त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत.
म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर.
11 परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे.
त्यांना कायमचे सुखी कर.
देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते
त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.
12 परमेश्वरा, जेव्हा तू चांगल्या माणसांसाठी चांगल्या गोष्टी करतोस
तेव्हा तू त्यांचे रक्षण करणाऱ्या मोठ्या ढालीसारखा आहेस.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरील शेमीनीथवरचे [a] दावीदाचे स्तोत्र.
6 परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस.
रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
2 परमेश्वरा माझ्यावर दया कर.
मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे.
मला बरे कर,
माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.
3 माझे सर्व शरीर थरथरत आहे.
परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे? [b]
4 परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे.
तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.
5 मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत.
मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत.
म्हणून तू मला बरे कर.
6 परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली.
माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे.
माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत.
तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शक्तिहीन, दुबळा झालो आहे.
7 माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला.
त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे.
आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
8 वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा.
का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली.
त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
10 माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील.
एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.
21 शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी खड्डे खणतात. पाण्याला दिशा देण्यासाठी ते वेगवेगळे खड्डे बुजवतात. त्याच रीतीने परमेश्वर राजाच्या मनावर ताबा मिळवतो. राजाने जिथे जावे असे परमेश्वराला वाटते तिथे परमेश्वर त्याला नेतो.
2 माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.
3 ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात.
4 गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.
5 काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.
6 जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी लबाडी केलीत तर तुमची संपत्ती लवकरच नाहीशी होईल आणि तुमची संपत्तीच तुम्हाला मरणाचा मार्ग दाखवील.
7 दुष्ट लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्या त्यांचा नाश करतील. ते लोक योग्य गोष्टी करायला नकार देतात.
8 वाईट लोक नेहमी दुसऱ्यांना फसवायचा प्रयत्न करतात. पण चांगले लोक विश्वासू आणि न्यायी असतात.
9 सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.
10 दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
11 जे लोक देवाची चेष्टा करतात त्यांना शिक्षा करा म्हणजे मूर्ख लोक धडा शिकतील. ते शहाणे होतील आणि नंतर त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळेल.
12 देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील.
13 जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.
14 जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते.
15 योग्य न्याय चांगल्या लोकांना आनंदी बनवतो. पण तोच दुष्ट लोकांना घाबरतो.
16 जर एखाद्याने शहाणपणाचा मार्ग सोडला तर तो विनाशाकडे जातो.
17 जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही.
18 दुष्ट लोक चांगल्या माणसांवर जे अत्याचार करतात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. जे लोक अप्रामाणिक असतात त्यांना प्रामाणिक लोकांवर केलेल्या अत्याचाराची किंमत मोजावी लागते.
19 वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
20 शहाणा माणूस त्याला लागणाऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. पण मूर्ख माणूस त्याला मिळालेल्या वस्तू लगेच संपवून टाकतो.
21 जो माणूस नेहमी प्रेम आणि दया दाखवायचा प्रयत्न करतो त्याला चांगले आयुष्य, संपत्ती आणि मान मिळेल.
22 शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो.
23 माणसाने जर आपण काय बोलतो याची काळजी घेतली तर तो बऱ्याच संकटांतून सुटू शकेल.
24 गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.
25-26 आळशी माणूस अधिकाचा हव्यास धरुन आपला नाश करुन घेतो. तो स्वतःचा नाश करतो कारण तो त्या गोष्टींसाठी कष्ट करायला नकार देतो पण चांगला माणूस दान देतो कारण त्याच्याकडे भरपूर असते.
27 वाईट लोक जेव्हा, त्याला बळी अर्पण करतात तेव्हा परमेश्वर आनंदी नसतो. खास करुन त्यावेळी, ज्यावेळी वाईट लोक त्याच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात.
28 जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल.
29 चांगल्या माणसाला त्याचे नेहमी बरोबर असते हे माहीत असते. पण दुष्ट माणसाला तसा आव आणावा लागतो.
30 परमेश्वर ज्याच्या विरुध्द् आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.
31 लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द् जिंकू शकत नाहीत.
4 मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.
पौल ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी करावयास सांगतो
2 नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा. 3 त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. 4 ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा.
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या. 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे.
पौलाबरोबर असलेल्या लोकांविषयीची बातमी
7 तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल. 8 त्याला मी याच कारणाने पाठवीत आहे की, आमच्याविषयीची बातमी तुम्हांला कळावी आणि तुमची अंतःकरणे उत्तेजित व्हावीत. 9 मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवीत आहे, तो तुम्हांला येथे काय घडत आहे ते सांगतील.
10 अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो, त्याचप्रमाणे बर्णबाचा चुलत भाऊ मार्क ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. 11 येशू ज्याला युस्त म्हणतात तोसुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहूदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत.
12 एपफ्राससुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्क वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे. 13 जे लवादिकीयात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. याचा मी साक्षी आहे. 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात.
15 लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. 16 आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखविले जाईल, तेव्हा ते लावदकीयाच्या मंडळीतसुद्धा वाचले जाते की नाही ते पाहा आणि तू सुध्दा माझे पत्र वाच. 17 आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.”
18 मी, पौल, हा सलाम माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहितो. मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center