Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 5

चुकून घडलेली वेगळी पापे

“एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

“किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला वा अशुद्ध सरपटणाऱ्या गोष्टींना जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तरीही तो दोषी ठरेल.

“माणसाच्या आंतून बाहेर पडणाऱ्या स्राव इत्यादि अनेक गोष्टी अशुद्ध असतात; एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या अशा अशुद्ध गोष्टीला न कळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.

“किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी घाईघाईने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी; आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून मेंढी आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

“त्याला कोंकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगाळून मोडावी परंतु त्याचे दोन भाग करु नयेत. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. 10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.

11 “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा त्याचे पापार्पण म्हणून आणावा; ते पापार्पण असल्यामुळे त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये. 12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराकरिता होम करावा; हे पापार्पण होय. 13 अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला मैदा याजकाचा होईल.”

14 परमेश्वर मोशेला म्हणाला, 15 “परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू [a] चुकून दूषित करुन कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या किमतीचा दोष नसलेला मेंढा आणावा; 16 ज्या पवित्र वस्तूची विटंबना करुन त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पांचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.

17 “परमेश्वराने मना केलेली एखादी गोष्ट करुन कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. 18 त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय. अंशा रीतीने याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील. 19 तो माणूस जरी त्याच्या हातून नकळत पाप घडले तरी तो दोषी आहे म्हणून परमेश्वरासाठी त्याने दोषार्पण अर्पावे.”

स्तोत्रसंहिता 3-4

दावीद आपला मुलगा अबशालोम याच्याकडून पळाला तेव्हाचे दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत.
    खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”

परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस
    तूच माझे वैभव आहेस
    परमेश्वरा मला महत्व [a] देणारा तूच आहेस.

मी परमेश्वराची प्रार्थना करेन
    आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!

मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे.
    मला हे कसे कळते?
    कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
माझ्याभोवती हजारो सैनिक असतील.
    परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.

परमेश्वरा जागा हो!
    देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस
तू जर माझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस
    तर त्यांचे सगळे दात पडतील.

परमेश्वरा, जय तुझाच आहे.
    परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. [b]

माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन
    तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक.
आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग.
    मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.

लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात?
    तुम्ही माझ्याबद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.

परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा
    जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.

जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका.
    तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा
    आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.

बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल?
    परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का?
    कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

नीतिसूत्रे 20

20 द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वतःवरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.

राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.

कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.

चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.

जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.

कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.

10 जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.

11 लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.

12 आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.

13 जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.

14 एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.

15 सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.

16 तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वतःला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.

17 तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.

18 योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.

19 जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.

20 जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द् किंवा वडिलांविरुध्द् बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.

21 जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.

22 जर कुणी तुमच्याविरुध्द् काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल.

23 काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.

24 प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणसाला कसे काय कळेल?

25 देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्यायला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल.

26 दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.

27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.

28 राजा खरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बळकट ठेवते.

29 आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्यमान आहे जगाला हे दिसते.

30 आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दुख: माणसाला बदलू शकते.

कलस्सैकरांस 3

ख्रिस्तातील तुमचे नवे जीवन

म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका. कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.

म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. [a] तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता.

पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेतः राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. 10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. 11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे.

12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे. 13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. 14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. 15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंतःकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.

16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंतःकरणात देवाला गीते गा. 17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता.

लोकांबरोबर तुमचे जीवन

18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.

19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका.

20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.

21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.

22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. 23 तुमच्या अंतःकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. 24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. 25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center