M’Cheyne Bible Reading Plan
चुकून केलेल्या पापांसाठी अर्पणे
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने मना केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यातः
3 “जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा. 4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. 5 मग अभिषेक झालेल्या याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे; 6 त्याने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. 7 मग त्याने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे; 8 आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आंतड्यावरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी; 9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी; 10 शांत्यर्पणात जसे हे भाग अर्पण करतात तसेच ते अर्पण करुन याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. 11 गोऱ्ह्याचे कातडे, आंतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण, 12 असा सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
13 “इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील. 14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा. 15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर एकाने त्याचा वध करावा. 16 नंतर अभिषेक झालेल्या याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे; 17 मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. 18 मग त्याने दर्शनमंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. 19 त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा; 20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे अर्पण करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे परमेश्वर देव त्यांच्या पापांची क्षमा करील. [a] 21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व इस्राएल लोकांकरिता पापार्पण होय.
22 “एखाद्या अधिपतीने परमेश्वराने मना केलेले कर्म केले व चुकून पाप घडले तर तो दोषी ठरेल. 23 त्याने केलेले पाप जेव्हा त्याला कळून येईल तेव्हा त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा; 24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. 25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. 26 उपकारस्तुतीच्या अर्पणातील यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे याजकाने ह्या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशा प्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे देव त्या अधिपतीला क्षमा करील.
27 “एखादा सामान्य माणूस परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केल्यामुळे चुकून पाप घडल्यामुळे दोषी ठरला; 28 आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी; 29 त्याने त्या बकरीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा; 30 मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे; 31 आणि याजकाने त्या बकरीच्या चरबीचा शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबी प्रमाणे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशा प्रकारे याजकाने त्या सामान्य माणसाकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्याला क्षमा करील.
32 “त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोंकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. 33 त्याने त्या कोंकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्याला वधावे. 34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 35 त्याने शांत्यर्पणाच्या कोंकराच्या चरबी प्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्या प्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे देव त्याला क्षमा करील.
भाग पहिला
(स्तोत्रसंहिता 1-41)
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
आणि वाईटाचे निर्दालन करतो.
2 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
7 आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
आणि तू माझा मुलगा झालास.
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [b] नाश करते
तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”
10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
19 गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.
2 काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
3 माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो.
4 जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
5 जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
6 पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
7 माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.
8 जर एखाद्याचे स्वतःवर खूपच प्रेम असेल तर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करील, तो समजून घेण्याचा खूप प्रयत्न करील आणि त्याला त्याचे बक्षिस मिळेल.
9 जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
10 मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
11 जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते.
12 राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.
13 मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते.
14 लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
15 आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.
16 जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो स्वतःचेच रक्षण करतो. पण जर तो या गोष्टीला महत्व देत नसेल तर तो मारला जातो.
17 गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
18 तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वतःचा नाश करायला मदत करीत आहात.
19 जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील.
20 उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल.
21 माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात.
22 लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
23 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.
24 आळशी माणूस स्वतःच्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्दा करीत नाही.
25 जर एखादा माणूस स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
26 एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वतःला लाज आणतो आणि स्वतःचा अनादर करतो.
27 तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.
28 जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील.
29 जो माणूस स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.
2 कारण माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यावतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावातिकीयात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिश: भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हांला माहीत व्हावा. 2 यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे. 3 ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.
4 मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये. 5 कारण मी जरी शरीराने तुम्हांपासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदीत आहे.
ख्रिस्तात जगत राहा
6 म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला. 7 त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा.
8 मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्त्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हांला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा. 9 कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते. 10 आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात.
11 मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता, 12 हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने (देवाने) ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले.
13 तुमच्या पापांमुळे आणि तुमची सुंता न झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरीत्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवान दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली. 14 त्याने आमच्याविरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हांला विरोध होता, तो त्याने आमच्यातून काढून घेतला, आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला. 15 त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे.
मनुष्यांनी केलेल नियम पाळू नका
16 म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये. 17 कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. 18 कोणीही जो स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंतःकरणामुळे गर्वाने फुगलेला असतो. 19 आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो.
20 जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता. 21 “याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!” 22 या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. 23 खरोखर, मनुष्यांनी केलेला धर्म, स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत.
2006 by World Bible Translation Center