Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 2-3

अन्नार्पणे

“जेव्हा एखाद्याला परमेश्वरदेवासाठी अन्नार्पण करावयाची इच्छा असेल, तेव्हा त्याने मैदा आणावा; त्याने त्यात तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा; मग त्याने ते अर्पण अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे; त्यातून मूठभर मैदा, तेल व सगळा धूप घेऊन स्मरणासाठीचे अर्पण म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. त्याच्या गंधाने परमेश्वराला आनंद होतो. अन्नार्पणातून जे काही डरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण अति पवित्र आहे.

भाजलेले अन्नार्पण

“जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या मैद्याचे बेखमीर भाकरीचे वा वरुन तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे. जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर मैद्याचे असावे. त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय. कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम मैद्याचे असावे.

“अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावे; ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे. मग याजकाने अन्नार्पणातून स्मारकाचा भाग घेऊन वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे; त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो. 10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले हे अर्पण अतिपवित्र आहे.

11 “खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वराला अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही. 12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक अर्पण म्हणून वेदीवर अर्पू नये. 13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.

पहिल्या हंगामाचे धान्यार्पण

14 “परमेश्वराकरिता तुला धान्यार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर माजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे धान्यार्पण होय. 15 त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे धान्यार्पण होय. 16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम करावा; हे परमेशवरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

शांत्यार्पणे

“कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी यांचा करावा. त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे. शांत्यार्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यांस लागून असलेली सर्व चरबी अर्पण करावी. दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व अर्पावे। ह्या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो.

“परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणसाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे. जर त्याला कोकरु अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणावे. त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोंवती शिंपडावे. अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आंतड्यावरील भोवतालची चरबी. 10 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे. 11 मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले अर्पण आहे, परंतु हे लोकांसाठी अन्नसुद्धा होईल.

12 “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर आणावा. 13 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोंवती शिंपडावे. 14 त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आंतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी. 15 दोन्ही गुरदे, त्यांवरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे. 16 मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा ह्या सुवासिक शांत्यार्पणाने परमेश्वराला आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे. 17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.”

योहान 21

येशू सात शिष्यांना दिसतो

21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.”

ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.

दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”

त्यांनी उत्तर दिले, “नाही.”

तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.

तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”

11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.

14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.

येशू पेत्राबरोबर बोलतो

15 मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”

तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”

16 पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीति करतोस का?”

पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभु तुम्हांला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.”

17 तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”

पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, “तू माझ्यावर प्रीति करतोस का?”

तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”

येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार. 18 मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”

20 मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. 21 जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?”

22 येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”

23 या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”

24 जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.

25 आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.

नीतिसूत्रे 18

18 काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात.

मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वतःच्याच कल्पना सांगायच्या असतात.

लोकांना वाईट माणूस आवडत नाही. लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात.

शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात.

लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल.

मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वतःवर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.

मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वतःचाच नाश करुन घेतो. त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात.

लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात. ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते.

जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो.

10 परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.

11 श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.

12 गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल. पण विनम्र माणसाचे गौरव होईल.

13 तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही.

14 आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.

15 शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते. तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो.

16 जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता.

17 सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.

18 दोन बलवान माणसे वाद घालत असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.

19 जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात.

20 तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील.

21 जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते. आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे.

22 जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.

23 गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.

24 काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.

कलस्सैकरांस 1

देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधु तीमथी याजकडून,

ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना:

देव, आमचा पिता याजकडून तुम्हास कृपा व शांति असो.

आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे, आभार मानतो. कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे. कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे. तुम्ही ते, आमचा सहसेवक एपफ्रास, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, त्याच्याकडून शिकून घेतले आहे. त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले.

या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की:

तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.

12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.

जेव्हा आम्ही खिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाला पाहतो

15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
    आणि निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.
16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही
    त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले.
    जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे,
सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत
    सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.

17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे.
    सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे.
    तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे.
यासाठी की प्रत्येक गोष्टीत
    त्याला प्रथम स्थान मिळावे.
19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.
20     आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत,
    किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले.
ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.

21 एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता. 22 परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे. 23 तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हांला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो.

मंडळीकरिता पौलाचे कार्य

24 आता, तुमच्यासाठी मला झालेल्या दु:खात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वतःच्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दु:ख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे. 25 देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो. ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती. ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा. 26 हा संदेश एक रहस्य आहे, जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करुन दिले आहे. 27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी. 29 या उद्देशाने मी झगडत आहे. ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने, जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center