M’Cheyne Bible Reading Plan
यज्ञ व अर्पणे
1 परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.
3 “जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील. 4 त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.
5 “त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे. 6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे. 7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी; 8 त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी; 9 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
10 “कोणाला कळपामधून शेरडू वा मेंढरु होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोष नसलेला नर अर्पावा. 11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे. 12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी. 13 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.
14 “जेव्हा कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने होले किंवा पारव्याची पिले आणावी. 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. 16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. 17 त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
काही अनुयायांना येशूची कबर रिकामी दिसते(A)
20 मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले. 2 म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
3 मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. 4 तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला. 5 आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
6 मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला. 7 तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. 8 शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्धा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. 9 येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.
येशू मरीया मग्दालियाला दिसतो(B)
10 मग शिष्य त्यांच्या घरी गेले. 11 पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली 12 आणि तिने दोन देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते, तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता.
13 त्यांनी तिला विचारले, “बाई तू का रडत आहेस?”
ती म्हणाली, “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.” 14 यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे.
15 तो म्हणाला, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?”
तिला वाटले तो माळी आहे, ती म्हणाली, “दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
16 येशू तिला म्हणाला, “मरीये.”
ती त्याच्याडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बुनी!” (याचा अर्थ गुरुजी)
17 येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग: मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.”
18 मरीया मग्दालिया ही बातमी घेऊन शिष्यांकडे गेली. “मी प्रभुला पाहिले आहे!” आणि तिने त्यांना सांगितले की, त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(C)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दिसतो
24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
योहानाने हे पुस्तक का लिहिले?
30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
17 मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे!
2 सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल.
3 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.
4 दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा.
5 काही लोक गरीबांची थट्टा करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.
6 नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.
7 मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते.
8 काही लोकांना कुठेही गेले तरी लाच म्हणजे दैवी मंत्र वाटते आणि ती कामही करते असे वाटते.
9 एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल.
10 हुशार माणूस तंबी दिल्या बरोबर शिकतो. परंतु मूर्ख माणूस शंभर फटके मारल्यावरही शिकत नाही.
11 वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
12 मूर्खाला भेटण्यापेक्षा, जीची पिल्ले चोरीला गेलीत अशा चवताळलेल्या अस्वलाच्या मादीला तोंड देणे बरे!
13 जे लोक तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तुम्हाला आयुष्यभर संकटांना सामोर जावे लागेल.
14 वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.
15 दोषी नसणाऱ्याला शिक्षा करणे आणि दोषी असणाऱ्यांचे समर्थन करणे या दोन गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत.
16 मूर्खाकडचा पैसा वाया जातो. का? कारण तो मूर्ख पैशाचा वापर शहाणा होण्यासाठी करत नाही.
17 मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.
18 केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.
19 ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वतःचीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.
20 वाईट माणसाला नफा होणार नाही. जो माणूस खोटे बोलतो त्याच्यावर संकटे येतील.
21 मूर्ख मुलगा असलेले वडील दु:खी होतील. मूर्खाचे वडील सुखी नसतील.
22 आनंद चांगल्या औषधासारखा असतो. पण दु:ख हे आजारासारखे असते.
23 वाईट माणूस दुसऱ्यांना फसवण्यासाठी गुप्ततेने पैसे घेतो.
24 शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.
25 मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
26 काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.
27 शहाणा माणूस शब्द काळजीपूर्वक वापरतो. शहाणा माणूस लवकर रागावत नाही.
28 मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.
काही गोष्टी करणे
4 म्हणून माझ्या प्रिय आणि भेटीस आतुर झालेल्या बंधूंनो, माझा आनंद आणि मुकुट असलेल्यांनो मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर राहा.
2 मी युवदीया आणि संतुखेला सुद्धा प्रभूमध्ये बहिणी या नात्याने एकच विचार करण्यासाठी उत्तेजन देत आहे. 3 माझ्या विश्वासू सहकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की, ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या प्रसारासाठी कष्ट घेतले आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यांना कृपा करुन मदत करा.
4 प्रभूमध्ये नेहमी आनंद करा.
5 मी पुन्हा म्हणेनः आनंद करा! तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी. प्रभु जवळ आहे. 6 कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. 7 जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंतःकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
8 शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका. 9 जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हांला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत राहा. आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील.
फिलिप्पैच्या ख्रिस्ती लोकांचे पौल आभार मानतो
10 मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली. अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली. परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हांला मिळाली नाही. 11 मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. 12 गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे. 13 जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
14 तरीही माझ्या संकटकाळात तुम्ही साहाय्य केलेत हे चांगले केले. 15 तुम्हा फिलिप्पैकरांना माहीत आहे की, सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदोनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही. 16 कारण जेव्हा मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही माझी गरज भागविण्यासाठी मदत पाठविली, 17 मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, उलट, तुमच्या हिशेबी अधिक फळवृद्धी व्हावी असे पाहतो. 18 माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणारा असा आहे. 19 आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीला साजेल अशा रीतीने पुरवील. 20 आपला देव व पिता याला अनंतकाळ गौरव असो. आमेन.
21 ख्रिस्त येशूमधील प्रत्येक संताला सलाम सांगा. माझ्याबरोबर जे बंधु आहेत ते तुम्हांला सलाम सांगतात. 22 येथील सर्व संत विशेषकरुन कैसराच्या घरातील संत तुम्हांला सलाम सांगतात.
23 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center