M’Cheyne Bible Reading Plan
मोशे पवित्र निवास मंडप उभा करतो
40 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा पवित्र मंडप उभा कर. 3 आज्ञापटाचा कोश त्या पवित्र मंडपात ठेव व तो अंतरपटाने झांक. 4 मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव. 5 सोन्याची धूपवेदी मंडपात आण व ती आज्ञापटाच्या कोशापुढे ठेव आणि पवित्र निवास मंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6 “दर्शन मंडपाच्या म्हणजे पवित्रनिवास मंडपाच्या दारापुढे होमार्पणासाठी वेदी ठेव. 7 दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यात पाणी भर. 8 सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
9 “अभिषेकाचे तेल घेऊन पवित्र निवास मंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल. 10 होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करुन पवित्र कर म्हणजे ती परम पवित्र होईल. 11 गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यांस अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
12 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल. 13 मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील. 14 मग त्याच्या मुलांना अंगरखे घाल. 15 त्याच्या बापाला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; तू त्यांना अभिषेक केल्यावर ते याजक होतील; ते घराणे पिढ्यान्पिढ्या निरंतरचे याजकपण करीत राहील.” 16 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली व परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्वकाही त्याने केले.
17 योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली. 18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवास मंडप उभा केला; प्रथम त्याने खुर्च्या (बैठक) बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले; 19 त्यानंतर पवित्र निवास मंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20 मोशेने करार घेऊन आज्ञापटाच्या कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. 21 मग मोशेने तो कोश पवित्र निवास मंडपात नेला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून आज्ञापटाचा कोश झाकला; अशा रीतीने त्याने पवित्र कोश सुरक्षित केला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. 22 मग मोशेने पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपात अंतरपटाच्या समोर मेज ठेवले; 23 मग त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. 24 मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला। 25 नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे ठेवले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26 मग त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली. 27 नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. 28 मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दाराला पडदा लावला.
29 त्याने पवित्र निवास मंडपाच्या दर्शन मंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे वाहिली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30 मग त्याने दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले. 31 मोशे, अहरोन व अहरोनाची मुले त्यात आपापले हातपाय धूत असत; 32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33 मग त्याने पवित्र निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्या प्रकारे परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
परमेश्वराचे तेज
34 मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. 35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36 पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत; 37 परंतु तो मेघ पवित्र निवास मंडपावर असे पर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाई पर्यंत ते तेथेच थांबत. 38 परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
19 मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली. 2 आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले. 3 ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.
4 पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.” 5 जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”
6 मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!”
पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही.”
7 यहूद्यांनी जोर देऊन म्हटले, “आम्हांला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वतःदेवाचा पुत्र असल्याचा दावा केला.”
8 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला. 9 आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?”
11 येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”
12 तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”
13 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि “फरसबंदी नावाची जागा,” (जिला इब्री भोषेत गब्बाथा) म्हणतात तेथे तो न्यायासनावर बसला. 14 तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती.पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.”
15 यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!”
पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?”
मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”
16 मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(A)
मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. 17 येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. (इब्री भाषेत त्याला गुलगुथा म्हणतात.) 18 गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.
19 आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “ येशू नासरेथकर-यहूद्यांचा राजा.” 20 ती पाटी यहूदी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.
21 यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, “‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे, ‘असा दावा करतो, असे लिहा.’”
22 पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
23 जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले, तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली. आणि चौघात ती वाटून घेतली. फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. त्याला शिवलेले नव्हते. 24 म्हणून ते एकमेकांस म्हणाले, “हा आपण फाडू नये, तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरवू या.” हे यासाठी घडले की, पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.
“त्यांनी माझी वस्त्रे आपआपसांत वाटून घेतली
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” (B)
म्हणून शिपायांनी असे केले.
25 येशूच्या वधस्तंभाशोजारी त्याची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची आई मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. 26 जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती तो जवळच उभा होता, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, “आई, हा तुझा मुलगा आहे,” 27 आणि त्या शिष्याला येशू म्हणाला, “ही तुझी आई आहे.” म्हणून त्या दिवसापासून या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
येशू प्राण सोडतो(C)
28 नंतर, हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे, आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्ती व्हावी म्हणून, येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.” 29 तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडवून भरून एजोबाच्या काठीवर ठेवून त्याच्या तोंडला लावला. 30 येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.
31 तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथाचा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहूदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले, 32 म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले. 33 पण जेव्हा ते येशूकडे आले. तेव्हा त्यांना आढळून आले की, तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.
34 तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. 35 ज्या मनुष्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की, तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की, तुम्ही विश्वास धरावा. 36 या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.” [a] 37 आणि दुसऱ्या शास्रभागात म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.” [b]
येशूला कबरेत ठेवतात(D)
38 नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.
39 त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड [c] गंधरस व अगरू [d] घेऊन आला. 40 मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले. 41 जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते. 42 तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.
16 लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.
2 माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
3 तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.
4 परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल.
5 जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील.
6 खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्द [a] करील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल.
7 जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील.
8 योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.
9 माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो.
10 राजा बोलतो तेव्हा त्याचे शब्द म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत
11 परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात.
12 राजे लोक वाईट गोष्टी करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. चांगुलपणा त्याच्या राज्याला मजबूत करील.
13 राजाला सत्य ऐकायचे असते. राजांना खोटे न बोलणारे लोक आवडतात.
14 जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो.
15 राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते.
16 ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
17 चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो.
18 जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.
19 विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते.
20 जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.
21 माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो.
22 ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात.
23 शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.
24 मायेचे शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात.
25 एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो.
26 कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.
27 कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
28 संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो.
29 जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो. 30 जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो.
31 जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे.
32 सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वतःच्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे.
33 लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.
कोणत्याही गोष्टीपेक्षा ख्रिस्त अधिक महत्त्वाचा आहे
3 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी मी पुन्हा लिहिण्यास मला त्रासदायक वाटत नाहीत, आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे.
2 “कुत्र्या” विषयी सावध असा! दुष्कर्माविषयी सावध असा! शरीराला इजा करणाऱ्यांपासून सावध असा, 3 कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही. 4 जरी मला स्वतःला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते. 5 तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे. 6 माझ्या आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिलेल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
7 त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो. 8 शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो. 9 आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे. 10 मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे. 11 या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न
12 हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो. 13 बंधूंनो, ते मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. 14 ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
15 तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आमची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील. 16 फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.
17 बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. 18 कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागतात. 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयींचा विचार करतात. 20 आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत. 21 त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.
2006 by World Bible Translation Center