Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 38

होमार्पणाकरता वेदी

38 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडेचार फूट उंच अशी केली. त्याने तिच्या प्रत्येक कोपऱ्यास एक याप्रमाणे चार शिंगे बनविली व ती कोपऱ्यांना अशी जोडली की वेदी व शिंगे एकाच अखंड तुकड्यांची बनविलेली दिसू लागली; त्याने ती पितळेने मढविली. मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली. मग त्याने वेदीसाठी पितळेची पडद्यासारखी जाळी बनविली व ती वेदी भोवतीच्या काठाखाली अशी बसवली की ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. मग त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार गोल कड्या केल्या; त्यांच्यात दांडे घालून वेदी वाहून नेण्याकरता त्या उपयोगी होत्या. मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले. वेदी उचलून वाहून नेण्याकरता तिच्या बांजूच्या गोल कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फव्व्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.

दर्शन मंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्त्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.

पवित्र निवास मंडपाभोक्तीचे अंगण

मग त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची पन्नास वार लांबीची एक कनात त्याने केली. 10 तिला वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबाचा आधार दिलेला होता; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती व तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.

12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;

13 पूर्वेकडील रुंदीची बाजू पंचवीस वार लांब होती; 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात वार लांबीची कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन खुर्च्या होत्या; 15 अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते. 17 खांबाच्या खुर्च्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.

18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर नक्षी विणलेली होती; तो दहा वार लांब व अडीच वार उंच होता; ही उंची अंगणाच्या सभोवतीच्या कनातीच्या उंचीइतकी होती. 19 तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती. 20 पवित्र निवास मंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.

21 मोशेने लेवी लोकांना, पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा मंडप तयार करण्याकरता लागलेल्या सर्व सामानाची यादी करण्यास सांगितले होते; अहरोनाचा मुलगा इथामर त्याच्यावर ती जबाबदारी प्रमुख म्हणून सोपविलेली होती.

22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहुदा वंशातील हराचा नातू म्हणजे उरीचा मुलगा बसालेल याने बनविल्या; 23 तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निव्व्या, व जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढण्याचा कामात तरबेज होता.

24 लोकांनी पवित्रस्थानाकरता परमेश्वराला अर्पण केलेले सोने सुमारे दोन टनाहून जास्त होते. [a]

25 लोकांपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी पावणेचार टनाहून [b] अधिक होती. 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली. 27 त्यांनी ती चांदी पवित्रस्थानाकरिता शंभर खुर्च्या व अंतरपटाच्या खुर्च्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक खुर्चीसाठी पंचाहत्तर पौंड चांदी [c] वापरली. 28 बाकची पन्नास पौंड चांदी [d] आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.

29 साडे सव्वीस टनाहून अधिक [e] पितळ परमेश्वरासाठी देण्यात आले. 30 त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील खुर्च्या, वेदी तिची उपकरणे व तिची जाळी ह्या करता; 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या खुर्च्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या खुर्च्या, तसेच पवित्र निवास मंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.

योहान 17

येशू त्याच्या अनुयायांसाठी प्रार्थना करतो

17 येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतःबरोबर माझे गौरव कर.

“ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले, आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.

11 “आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12 मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्थंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. आणि मी त्यांना संभाळले आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही, हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.

13 “पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो.” 14 “मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.

15 “या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस. 16 जसा मी या जगाचा नाही, तसे तेसुद्धा या जगाचे नाहीत. 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे. 18 जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो. 19 त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.

20 “आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंति करतो. 21 यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. 22 आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे. 23 मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.

24 “हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे. 25 नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही, तरी मी तुला ओळखतो, आणि त्यांना माहीत आहे की, तू मला पाठविलेले आहेस. 26 मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे, व तुझी ओळख करून देतच राहीन, यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये असावे.”

नीतिसूत्रे 14

14 शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.

जो माणूस योग्य रीतीने जगतो तो परमेश्वराला मान देतो. पण जो माणूस इमानदार नसतो तो परमेश्वराचा तिरस्कार करतो.

मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.

जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.

सत्यवादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो.

जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.

मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही.

हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कारण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते.

मूर्ख माणूस त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी किंमत मोजण्याच्या कल्पनेला हसतो. पण चांगले लोक त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

10 जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो.

11 वाईट माणसाच्या घराचा नाश होईल. पण चांगल्या माणसाचे घर सदैव राहील.

12 लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.

13 माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.

14 दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.

15 मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.

16 शहाणा माणूस परमेश्वराचा आदर करतो आणि वाईटापासून दूर राहतो. पण मूर्ख विचार न करता गोष्टी करतो. तो लक्षपूर्वक गोष्टी करत नाही.

17 जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.

18 मूर्खांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल शिक्षा होते. पण शहाण्यांना ज्ञानाचा लाभ होतो.

19 चांगले लोक वाईटांबरोबर लढताना जिंकतील, वाईटांना त्यांच्यापुढे नतमस्तक होणे भाग पडेल.

20 गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात.

21 जो शेजाऱ्याला पाण्यात पहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.

22 जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.

23 जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल.

24 शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते.

25 जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो.

26 जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.

27 परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो.

28 जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते.

29 सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द् करतो.

30 जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.

31 जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.

32 संकटाच्यावेळी दुष्ट माणसाचा पराभव होतो. पण चांगली माणसे मरणाच्या दारातही विजयी होतात.

33 शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते.

34 चांगुलपणा देशाला महान बनवतो. पण पाप कुठल्याही लोकांना लाज आणते.

35 राजाजवळ जेव्हा शहाणे नेते असतात तेव्हा राजा आनंदी असतो. पण मूर्ख नेत्यांवर राजा रागावतो.

फिलिप्पैकरांस 1

ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तीमथ्य यांजकडून, फिलिप्पै येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनिसांना,

देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त याजपासून तुम्हांस कृपा असो.

पौलाची प्रार्थना

प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.

तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.

आणि माझी हीच प्रार्थना आहे:

की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.

पौलाच्या त्रासामुळे प्रभूच्या कार्याला मदत होते

12 बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे. 13 याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे. 14 शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.

15 हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात. 16 हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे. 17 पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल. 18 पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो.

आणि मला आनंद होतच राहील. 19 कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे. 20 हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल. 21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. 22 पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन. 23 या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल. 24 पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन. 26 यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.

27 पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात. 28 आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल. 29 कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे. 30 माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center