M’Cheyne Bible Reading Plan
शब्बाथ दिवसाविषयी नियम
35 मग मोशेने सगळया इस्राएल लोकांना एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, “ज्या आज्ञा तुम्ही पाळाव्या म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो;
2 “कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे. 3 शब्बाथ दिवशी तुम्ही राहात असलेल्या जागेत कोठेही तुम्ही विस्तव देखील पेटवू नये.”
पवित्र मंडपात आणावयाची अर्पणे
4 मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा. 5 परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ; 6 निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस; 7 लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड; 8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले; 9 तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी.
10 “जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे, 11 पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या; 12 पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट, 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची पवित्र भाकर; 14 प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आमि दिव्यासाठी तेल; 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा; 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक; 17 अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा; 18 निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी आधार देणाऱ्या मेखा व तणावासाठी लागणाऱ्या दोऱ्या; 19 पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.”
लोकांनी आणलेली महान अर्पणे
20 मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले. 21 नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली. 22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
23 ज्यांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले. 24 चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले. 25 ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले. 26 ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले.
27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. 28 लोकांनी सुगंधी मसाले व जैतूनाचे तेल देखील आणले त्यांचा उपयोग सुगंधी धूप अभिषेकाचे तेल आणि दिव्याचे तेल यासाठी करण्यात आला.
29 ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.
बसालेल आणि अहलियाब
30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पहा परमेश्वराने यहुदा वंशातील उरी (उरी हा हूरचा पुत्र होता) ह्याचा मुलगा बसालेल ह्याची निवड केली आहे. 31 परमेश्वराच्या आत्म्याने बसालेल याला भरले आहे त्याला सर्व प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी कसब आणि ज्ञान दिले आहे. 32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करील. 33 तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील. 34 परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे. 35 कोरीव काम करणारे कुशल सुतार, धातू काम करणारे कारागीर, निळया, जांभळया ज्ञान व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसवी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या. सर्व कारागिरीची कामे ते करु शकतात कारण परमेश्वराने त्यासाठी ह्या दोघांना ज्ञान व कसब दिले आहे.
येशू शिष्यांचे समाधान करतो
14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. 2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. 3 मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 4 आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”
5 थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
6 येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. 7 जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”
8 फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”
9 येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.
पवित्र आत्म्याचे अभिवचन
15 “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. 16 आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे. 17 साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.
18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
22 मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”
23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.
27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
30 “मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. 31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो.
“चला आता, आपण निघू या.”
11 काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
2 जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील.
3 चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वतःचाच नाश करुन घेतात.
4 ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो.
5 जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टींमुळे नाश होईल.
6 इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात.
7 दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
8 चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील.
9 दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते.
10 चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात.
11 इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो.
12 ज्या माणसाला चांगली समज बुध्दी् नसते तो त्याच्या शेजाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केंव्हा गप्प बसायचे ते कळते.
13 जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
14 कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरेच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो.
15 जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल.
16 दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात.
17 दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वतःवर संकटे ओढवून घेतो.
18 दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्यायी आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते.
19 चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात.
20 जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो.
21 दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
22 जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते.
23 चांगल्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
24 जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल.
25 जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्यांना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
26 जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो.
27 जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात.
28 जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.
29 जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल.
30 चांगला माणूस ज्या गोष्टी करतो त्या जीवनवृक्षासारख्या असतात. शहाणा माणूस लोकांना नवे आयुष्य देतो.
31 जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्यांच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.
शरीराचे ऐक्य
4 म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हांला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. 2 नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते. 5 एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, 6 एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,
7 ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे. 8 यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.
“जेव्हा तो उच्चस्थानी चढला,
तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले
आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.” (A)
9 आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही? 10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात. 11 आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. 12 ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. 13 आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.
14 हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत 15 त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे. 16 ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.
अशा मार्गाने तुम्ही जगावे
17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 18 त्यांची अंतःकरणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंतःकरणे कठीण झाली आहेत. 19 त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे. 20 परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि 21 मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल. 22 तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. 23 यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि 24 नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.
25 म्हणून लबाडी करु नका! “प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.” 26 “तुम्ही रागवा पण पाप करु नका.” सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. 27 तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. 28 जो कोणी चोरी करील असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.
29 तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. 31 सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. 32 एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
2006 by World Bible Translation Center