M’Cheyne Bible Reading Plan
बसालेल आणि अहलियाब
31 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “यहुदा वंशातील उरी याचा मुलगा बसालेल याला मी निवडून घेतले आहे. (उरी हूर याचा मुलगा होता.) 3 देवाच्या आत्म्याने त्याला भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्याला कसब, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. बसालेल आणि अहलियाब 4 बसालेल फार चांगला कसबी कारागीर आहे, तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करील. 5 तो हिऱ्यांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकूसरीची कामे करील. 6 त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; बाकीच्या कारागिरांना मी कौशल्य दिले आहे त्यामुळे ते सर्व मिळून मी तुला सांगितलेली सर्व कामे बरोबर करतील.
7 दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश,
त्यावरील दयासन
आणि तंबूचे सर्व सामान;
8 मेज व त्यावरील सर्व समान,
शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष
व त्याची उपकरणे;
9 होमवेदी व तिची उपकरणे,
गंगाळ व त्याची बैठक;
10 अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची,
विणिलेली तलम व पवित्र वस्त्रे;
11 अभिषेकाचे सुवासिक तेल
आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप.
ह्या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागिर तयार करतील.”
शब्बाथ दिवस
12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 13 “इस्राएल लोकांना हे सांग की विश्रांतीच्या पवित्र दिवसासंबंधी मी सांगितलेले नियम तुम्ही अवश्य पाळावेत, ते या करता की त्यावरून ते पिढ्यान्पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये खून म्हणून राहतील आणि त्यामुळे मी जो परमेश्वर त्या मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे हे तुम्हाला कळेल;
14 “म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसाला जर कोणी इतर दिवसासारखा लेखून तो भ्रष्ट करील तर त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी शब्बाथ दिवशी काम करील, त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे. 15 काम करण्याकरता आठवड्याचे इतर सहा दिवस आहेत; परंतु सातवा दिवस विसावा घेण्यासाठी पवित्र दिवस आहे हा परमेश्वराला मान देण्याचा पवित्र दिवस आहे; जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे. 16 इस्राएल लोकांनी शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळावा; त्यांनी तो निरंतर पाळावा कारण हा त्यांच्या माझ्यामध्ये पिढ्यान्पिढ्या चालणारा करार आहे. 17 शब्बाथ दिवस इस्राएल लोकामध्ये व माझ्यामध्ये कायमची खून आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी विसावा घेतला व त्याचा थकवा गेला.”
18 या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन सपाट दगडी पाट्या (आज्ञापट) मोशेला दिल्या.
मेंढपाळ आणि त्याची मेंढरे
10 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. 2 परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे. 3 दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. 4 आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. (त्यांचे नेतृत्व करतो). मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात. 5 अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूर पळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.”
6 येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.
येशू उत्तम मेंढपाळ आहे
7 म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे. 8 माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत. 9 मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. 10 चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.
11 “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. 12 ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो. 13 मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
14-15 “मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. 16 माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
19 येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना. 20 यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, “याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”
21 परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
येशूच्या विरोधात यहूदी पुढारी
22 यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण [a] जवळ आला. तो हिवाळा होता. 23 येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत [b]होता. 24 यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
25 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात. 26 पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत. 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. 29 माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. 30 माझा पिता आणि मी एक आहोत.”
31 तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले. 32 परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
33 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
34 येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’ [c] 35 ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे. 36 त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत, 37 जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. 38 परंतु माझा पिता करतो तीच कृत्ये जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”
39 यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.
40 मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जेथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला. 41 आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.” 42 आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
शहाणपण (ज्ञान) तुला व्यभिचारापासून परावृत्त करेल
7 मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस. 2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव. 3 माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव. 4 शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव. 5 नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील.
6 एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला 7 बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता. 8 त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली. 9 तेव्हा अंधार होत होता-सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती. 10 ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले. 11 तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे. 12 ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे. 13 तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली, 14 “आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे. 15 म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास. 16 मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत. 17 मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे. 18 चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ. 19 माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे. 20 त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.” [a]
21 त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला. 22 आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला. 23 तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.
24 मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. 25 दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका. 26 तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. 27 तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.
एकमेकांना मदत करा
6 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. 2 एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करुन घेतो. 4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. 5 कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे.
जीवन हे शेत पेरणान्यासारखे आहे
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल. 8 जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल. 10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
Paul Ends His Letter
11 पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत. 12 ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. 13 परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जग वधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15 कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्वाची आहे. 16 तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दया असो.
17 आता इथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेल्या आहेत.
18 बंधूनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center