Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 30

धूप जाळण्यासाठी वेदी

30 देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी. ती चौरस असावी; ती आठरा इंच [a] लांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंच [b] उंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी. वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा. त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत. वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.

“अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा; पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा. तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये.

10 “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.”

मंदिरावरील खंडणी

11 परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वतःच्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही. 13 शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय. 14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे. 15 श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल. 16 हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.”

गंगाळ

17 परमेश्वर मोशेला म्हणाला, 18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. 19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत; 20 दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत. 21 त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.”

अभिषेकाचे तेल

22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. 24 आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे.

25 “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; 26 हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28 तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.

30 “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; 31 इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. 32 ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. 33 ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”

धूप

34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. 37 या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. 38 सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वतःसाठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”

योहान 9

जन्मापासून आंधळा असलेल्या मनुष्याला येशू दृष्टि देतो

येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला. परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे?”

येशूने उत्तर दिले, “त्याच्या स्वतःच्या पापामुळे अगर त्याच्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत, ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करु शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”

असे बोलल्यानंतर, येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला, आणि त्या चिखलाचा गोळा करुन त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.

काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते. ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले, “पाहा! येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना?”

काही लोक म्हणाले, “होय! हा तोच आहे.” परंतु दुसरे काही म्हणाले, “नाही हा तो मनुष्य नाही. हा फक्त त्याच्यासारखा दिसतो.”

मग तो माणूस स्वतः होऊनच म्हणाला, “अहो, मीच तो पूर्वीचा आंधळा आहे.”

10 लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”

11 त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”

12 लोकांनी त्या मनुष्याला विचारले, “तो मनुष्य कोठे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “मला माहीत नाही.”

येशूने बरे केलेल्या मनुष्याची परुश्यांकडून चौकशी

13 मग लोकांनी परुशी लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता. 14 येशूने चिखल करुन त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बाथ दिवस होता. 15 म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”

16 परुश्यांतील काही लोक म्हणाले, “हा मनुष्य शब्बाथाचा नियम पाळीत नाही. म्हणून तो देवापासून नाही.”

दूसरे लोक म्हणाले, “परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत.” याविषयी त्या यहूदी लोकांचे एकमत होईना.

17 मग यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले, “त्या मनुष्याने तुला बरे केले, आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो एक संदेष्टा आहे.”

18 हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे यावर यहूदी लोकांचा विश्वासच बसेना, हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले. 19 यहुदी लोकांनी त्याच्या आईवडिलांना विचारले, “हा तुमचाच मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता हा जन्मापासून आंधळा होता तर आता याला कसे काय दिसू लागले?”

20 त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचाच मुलगा आहे. आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हांला माहीत आहे. 21 परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वतः बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.” 22 त्याचे आईवडील असे म्हणाले कारण त्यांना यहूदी धर्मपुढाऱ्यांची फार भीति वाटत होती. येशू हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी म्हणेल, त्याला शिक्षा करायची असे यहूदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते. अशा लोकांना यहूदी पुढारी सभास्थानाबाहेर घालवू शकत होते. 23 म्हणून “त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे” असे त्या मनुष्याचे आईवडील म्हणाले.

24 मग जो जूर्वी आंधळा होता त्याला यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले, “तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावे. हा मनुष्य पापी आहे हे आम्हांला माहीत आहे.”

25 त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे मला नक्की माहीत आहे की, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”

26 यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”

27 त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”

28 यहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. 29 देव मोशेशी बोलत असे हे आम्हांला माहीत आहे. परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हांला माहीत नाही.”

30 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले. 31 देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल. 32 जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 33 हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडूल आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.”

34 यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले, “तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस काय?” आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले.

आध्यात्मिक आंधळेपणा

35 यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले, हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”

36 त्या मनुष्याने विचारले, “महाराज, हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.”

37 येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”

38 “होय, प्रभु, मी विश्वास ठेवतो.” त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले.

39 येशू म्हणाल, “जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की, जे आंधळे आहेत त्यांना दिसावे. आणि आम्हांला पाहता येते असे वाटणारे आंधळे व्हावेत.”

40 परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”

41 येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”

नीतिसूत्रे 6

एखाद्याला कर्ज मिळवून देण्यात मदत करण्यातले धोके

मुला, दुसऱ्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का? तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले. तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वतःला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग. विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस. शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणाऱ्या पक्ष्याप्रमाणे स्वतःला सोडव.

आळशी असल्यामुळे धोके

आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक. मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही. पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.

आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस? 10 आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी इथे थोड्या वेळासाठी पडतो.” 11 परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल.

दुष्ट माणूस

12 दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो. 13 तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो. 14 तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो. 15 पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही.

परमेश्वर ज्याचा तिरस्कार करतो त्या सात गोष्टी

16 परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.
17     डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात.
    जीभ, जी खोटे बोलते,
    हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
18     ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते.
    पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
19     माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो.
    माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.

20 माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. 21 त्यांचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव. 22 त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.

23 तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात. 24 त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात. 25 ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस. 26 वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल. 27 जर एखाद्याने स्वतःवर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील. 28 जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील. 29 दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.

30-31 माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत. 32 पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वतःचा नाश करीत असतो. तो स्वतःच त्याच्या नाशाला कारणीभूत असतो. 33 लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही. 34 त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल. 35 त्याचा राग शांत करण्यासाठी कितीही पैसा दिला तरी तो पुरेसा ठरणार नाही.

गलतीकरांस 5

तुमचे स्वातंत्र्य राखा

आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका. ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे, तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरु पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांना काही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.

तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला? सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही. “थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.” 10 प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.

11 बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती. 12 माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वतःला नामर्द करुन घ्यावे.

13 परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा). 14 कारण संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा.” 15 पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.

आत्मा आणि मानवी स्वभाव

16 पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. 17 कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. 18 पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.

19 देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, 20 मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, 21 दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. 22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. 25 जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या. 26 आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center