M’Cheyne Bible Reading Plan
याजक नेमण्याचा विधी
29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; 2 मग मैद्याच्या बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर चपात्या कराव्यात; 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मेंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत;
4 “अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी; 5 याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा; 6 त्याच्या डोक्याला मंदिल किंवा फेटा बांधावा आणि फेट्यावर पवित्र मुकुट ठेवावा. 7 नंतर अभिषेकाचे तेल घेऊन ते अहरोनाच्या डोक्यावर ओतावे व त्याला अभिषेक करावा; यावरून अहरोनाला याजकाच्या सेवेसाठी निवडले आहे असे दिसून येईल.
8 “मग त्याच्या मुलांना तेथे आणून त्यांना अंगरखे घालावेत; 9 मग त्यांना कमरबंद बांधावेत व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांना याजकपद मिळेल व ते कायम राहील. ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले यांच्यावर संस्कार करुन तू त्यांना याजक बनवावेस.
10 “नंतर तो गोज्या दर्शन मंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; परमेश्वर हे सर्व पाहील. 12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी तू वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरवी, काळजाभोंवतीची चरवी आणि दोन्ही गुरदे व त्यांच्या भोवतीची चरबी अशी त्या गोऱ्ह्याच्या शरीरातील सर्व चरबी काढून घ्यावी व गुरदे व तिचा वेदीवर होम करावा. 14 नंतर गोऱ्हाचे मांस, कातडे व बाकी राहिलेले शरीर छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावे; हा याजकांच्या पाप निवारण्याचा यज्ञ होय.
15 “मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेढ्यांच्या डोक्यावर ठेवावेत; 16 आणि त्या मेंढ्याचा वध करावा; त्याच्या रक्तातून थोडेस रक्त घेऊन वेदीच्या चारही बाजूस शिंपडावे. 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके ह्यांच्या बरोबर ठेवावेत; 18 मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.
19 “नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत; 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे. 21 नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
22 “तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत; 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवावे व ते अर्पण म्हणून परमेश्वरासमोर वर धरण्यास त्यांना सांगावे. 25 मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
26 “मग त्या मेंढ्याचे ऊर घेऊन परमेश्वरासमोर विशेष अर्पण म्हणून वर धरावे; मग ते तुझ्याकरिता तुझ्याजवळ ठेव. 27 नंतर अहरोन व त्याची मुले ह्यांच्या समर्पण विधीसाठी मारलेल्या मेढ्याचे अर्पिलेले ऊर व मांडी ही अहरोन व त्याच्या मुलांना द्यावी; हे अर्पण त्यांच्यासाठी पवित्र होईल. 28 इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.
29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर सांभाळून ठेवावीत; ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावीत, जेव्हा त्यांची याजक म्हणून निवड होईल तेव्हा त्यांनी ती घालावीत. 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो मुलगा याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्त्रे सात दिवस घालावीत.
31 “महान याजक म्हणून अहरोनाच्या समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे; 32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी; 33 ही अर्पणे त्यांची पवित्र याजकासाठी निवड होण्याच्या वेळी, त्यांचे पाप नाहीसे व्हावे म्हणून वाहिलेली होती, म्हणून ती अर्पणे त्यांनीच खावीत. 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.
35 “अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पण विधीच्या सात दिवसात मी तुला आज्ञा केलेल्या ह्या सर्व गोष्टी कराव्यात. 36 त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे 37 सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.
38 “दररोज वेदीवर एक एक वर्षाची दोन कोकरे ठार मारावीत व त्यांचा होम करावा. 39 एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा. 40 पहिल्या कोकराच्या अर्पणासोबत आठमापे सपीठपाव हीन: (द्रव पदार्थ मोजण्याचे माप)-द्राक्षारसात मळून अर्पण करावे. 41 आणि संध्याकाळी दुसऱ्या कोकराबरोबरही सकाळच्या अर्पणाप्रमाणे आठमापे सपीठ अर्पण करावे व पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे; ह्या हव्याच्या मधुर सुवासाने परमेश्वराला संतोष होईल.
42 “ह्या सर्व गोष्टीचे अर्पण दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर करीत राहावे; ह्या अर्पणानंतर मी परमेश्वर त्या ठिकाणी भेट देईन व तुमच्याशी बोलेन. 43 त्याठिकाणी मी इस्राएल लोकांना भेटेन आणि माझ्या महानतेने मंडप पवित्र होईल.
44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या मुलांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन. 45 मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. 46 आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहाता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मीच परमेश्वर त्यांचा देव आहे.”
8 येशू जैतुनाच्या डोंगरावर [a] निघून गेला. 2 दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
3 नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले. 4 ते येशूला म्हणाले, “गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले. 5 मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”
6 येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. 7 यहूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.” 8 मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
9 येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती. 10 येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”
11 त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.”
मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”
(वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)
येशू जगाचा प्रकाश आहे
12 नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”
13 परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”
14 येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही. 15 तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. 16 पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो. 17 तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते. 18 स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”
19 लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20 येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
यहूदी लोकांना येशूविषयी समजत नाही
21 येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
22 म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वतःला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही’?”
23 पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात, पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही. 24 तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’ [b] यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”
25 यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?”
येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे. 26 तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”
27 येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांना पित्याविषयी सांगत होता. 28 म्हणून येशू लोकांना म्हणाला. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल (वधस्तंभावर ठार माराल). मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हांला समजेल. तुम्हांला समजेल की, ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. 29 ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.” 30 येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पापापासून सुटका याविषयी येशू बोलतो
31 ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. 32 मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
33 यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”
34 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. 35 गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. 36 म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. 37 तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे. 38 माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”
39 यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.”
येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या. 40 देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही. 41 पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.”
परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
42 येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठविले. 43 मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही. 44 तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.
45 “मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. 46 मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? 47 जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”
स्वतःविषयी व अब्राहामाविषयी येशू बोलतो
48 यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”
49 येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही. 50 स्वतःला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला (देवाला) वाटते. तोच न्यायाधीश आहे. 51 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.”
52 यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’ 53 तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?”
54 येशूने उत्तर दिले, “जर मी स्वतःच स्वतःचा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता. 55 परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो. 56 माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”
57 यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”
58 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.” 59 जेव्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.
व्यभिचारापासून दूर राहाण्याचे शहाणपण
5 मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे. 2 नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील. 3 दुसऱ्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील. 4 पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असेल. आणि तलवारीपेक्षा धारदार असेल. 5 तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल. 6 तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर.
7 मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका. 8 जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका. 9 जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील. 10 तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील. 11 तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल. 12-13 नंतर तुम्ही म्हणाल, “मी माझ्या आई-वडिलांचे का ऐकले नाही? मी शिस्त पाळायला नकार दिला. मी सुधारायला नकार दिला. 14 आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.”
15-16 तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस. 17 तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको. 18 म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. 19 ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो. 20 दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.
21 तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो. 22 दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील. 23 तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वतः च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.
4 मी जे म्हणत आहे ते हे की, जोपर्यंत वारसदार हा लहान मूल आहे तोपर्यंत तो गुलामापेक्षा वेगळा नाही. जरी तो सर्वांचा मालक असला तरी, 2 तो जोपर्यंत त्याच्या पित्याने नेमून दिलेला वेळ आहे तोपर्यंत पालकांच्या आणि विश्वास्तांच्या ताब्यात असतो. 3 याच प्रकारे जोपर्यंत आम्ही “मुले” होतो तोपर्यंत आम्हीसुद्धा या जगाच्या निरर्थक नियमांचे गुलाम होतो. 4 परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला, व नियम शास्त्राप्रमाणे वागला. 5 यासाठी की, त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे.
6 आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठविले आहे. आत्मा “अब्बा” [a] म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो. 7 म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.
गलतीया येथील ख्रिस्ती लोकांकरिता पौलाचे प्रेम
8 गतकाळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते, त्यांचे तुम्ही गुलाम होता. 9 परंतु आता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलाम होण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता? 10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. 11 मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.
12 बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते. 13 तुम्हांला माहीत आहे की, माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमतः मी तुम्हांला सुवार्ता सांगितली. 14 आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वतः ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले. 15 मग जो आनंद तुम्हांला मिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की, जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे काढून ते मला दिले असते. 16 तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?
17 तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल. 18 हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे. 19 माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल. 20 आता मला तुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेघळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे.
हागार आणि साराचे उदाहरण
21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हांला मला विचारु द्या की, नियमशास्त्र काय म्हणते, ते तुम्हांला माहीत आहे का? 22 असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला 23 देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
24 या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबी गुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो. 25 हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचे दर्शक हल्लीच्या यरुशलेमचे बाह्यरुप आहे. कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे. 26 परंतु स्वर्गीय यरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे. 27 कारण असे लिहिले आहे.
“जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा!
ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदाने
घोष कर, आरोळी मार,
कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा
सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत” (A)
28-29 बंधूनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळी जसा देहस्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे. 30 पण पवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही.” 31 यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
2006 by World Bible Translation Center