Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 28

याजकांसाठी वस्त्रे

28 परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.

“तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी विशेष वस्त्रे तयार कर त्यामुळे त्याला मान व आदर मिळेल ही वस्त्रे बनविणारे कारागीर इस्राएल लोकात आहेत; ही विशेष कला मीच त्यांना दिलेली आहे; ह्या वस्त्रामुळे अहरोन माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल मग त्याने याजक या नात्याने माझी सेवा करावी. तुझा भाऊ अहरोन व त्याची मुले ह्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही वस्त्रे बनवावीतः न्यायाचा ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल किंवा फेटा व कमरबंद, त्या कारागिरांनी सोन्याची जर आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्त्रे तयार करावीत.

एफोद व कमरबंद

“सोन्याची जर व निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करुन घ्यावेत; एफोदाच्या दोन्ही खांद्यावर दोन खांदपटृ्या असाव्यात, या खांदपट्ट्या एफोदाच्या दोन्ही कोपऱ्यांना जोडाव्यात.

“एफोद बांधण्यासाठी कारागिरांनी फार काळजीपूर्वक एक पट्टी विणावी; ही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याची जर, व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने विणावी.

“मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत. 10 एकावर सहा नांवे व दुसऱ्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे कोरावीत. 11 कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत. 12 ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावीत; परमेश्वरासमोर उभे राहताना अहरोन हा खास रत्ने जडलेला एफोद घालून जाईल आणि त्या रत्नावर कोरलेल्या नांवामुळे देवाला इस्राएल लोकांची आठवण होईल. 13 एफोदावर ती रत्ने पक्की रहावीत म्हणून त्यांच्यासाठी शुद्ध सोन्याची कोंदणे बसवावीत; 14 पीळ घातलेल्या दोरी सारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्यात व त्या कोंदणात बसवाव्यात.

न्यायाचा उरपट

15 “न्यायाचा ऊरपटही तयार करून घ्यावा; कुशल कारागिरांनी जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा; 16 तो चौरस दुमडलेला दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी एक एक वीत म्हणजे नऊ नऊ इंच असावी. 17 त्यात सुंदर रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; 18 दुसऱ्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरा; 19 तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्यराग; 20 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत. 21 न्यायाच्या ऊरपटावर इस्राएलच्या प्रत्येक मुलामागे एक या प्रमाणे बारा रत्ने, प्रत्येक मुलाचे नांव कोरलेली अशी असावीत.

22 “न्यायाच्या ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात. 23 न्यायाच्या ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात; 24 ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात. 25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात. 26 सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करुन न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्यात. 27 सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या खांदपटृ्यांखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पटृवर लावाव्यात. 28 न्यायाच्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळया फितींनी बांधाव्यात; त्यामुळे ऊरपट एफोदाच्या घट्ट धरून राहील, घसरणार नाही.

29 “अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या न्यायाच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील. 30 न्यायाच्या ऊरपटात तू उरीम व थूम्मीम ठेव अहरोन परमेशवरासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.

याजकासाठी इतर वस्त्रे

31 “एफोदाबरोबर घालावयाचा झागा संपूर्ण निळया रंगाचा करावा; 32 त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोंवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही. 33 निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोंवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत; 34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत. 35 याजक या नात्याने माझी सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.

36 “शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात त्याप्रमाणे तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत. 37 ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला (फेट्याला) समोरील बाजूस निव्व्या फितीने बांधावी; 38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या भेटी इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील त्यात जर काही दोष असेल तर तो त्याने काढावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील व अर्पिण्यास ती पात्र होतील.

39 “कातलेल्या तलम सणाच्या पांढऱ्या कापडाचा एक अंगरखा विणावा एक मंदिल-फेटा-व एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा. 40 अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; त्यामुळे त्या मुलांचा मान व आदर राखला जाईल. 41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या मुलांना ही वस्त्रे घाल, त्यांच्या डोक्यावर विशेष प्रकारचे तेल ओतून त्यांना आभिषेक करून त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.

42 “त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील. 43 आणि अहरोन व त्याचे मुलगे ज्या ज्या वेळी दर्शनमंडपात पवित्रस्थानापुढे याजक म्हणून सेवा करण्यास जातील त्या त्या वेळी त्यांनी हे चोळणे घातलेच पाहिजेत; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्याच्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”

योहान 7

येशू आणि त्याचे भाऊ

यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांचा मंडपाचा सण [a] जवळ आला होता. म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील. लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.” येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

येशू आपल्या भावांना म्हणाला. “माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल. जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो. तेव्हा तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.” हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.

10 म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही. 11 सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”

12 लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यांतील अनेक लोक येशूविषयी आपसांत बोलत होते. काही म्हणाले, “तो चांगला मनुष्य आहे.” परंतु दुसरे काहीजण म्हणाले, “नाही, तो लोकांना ठकवितो.” 13 परंतु लोकांपैकी कोणीच येशूविषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांना यहूदी पुढाऱ्यांची भीति वाटत होती.

येशू यरुशलेमात शिक्षण देतो

14 अर्धाअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. 15 यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”

16 येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. 17 जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वतःची नाही. 18 जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो, तो स्वतःला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते. 19 मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”

20 लोकांनी उत्तर दिले, “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”

21 येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात. 22 मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता. 23 याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? 24 वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”

येशू हाच ख्रिस्त आहे काय? लोकांना पडलेला प्रश्न

25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल. 27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.”

28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”

30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. 31 परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”

यहुदी लोक येशूला अटक करण्याचा प्रयत्न करतात

32 लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. 33 मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन. 34 तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”

35 यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? 36 हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थ काय?”

येशू पवित्र आत्याविषयी सांगतो

37 सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते. 39 येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.

लोक येशूविषयी वाद करतात

40 येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.”

41 दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.”

तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.” 42 पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.” 43 आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. 44 काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.

यहूदी पुढारी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार देतात

45 मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”

46 मंदिराचे शिपाई म्हणाले, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”

47 मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले! 48 पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही! 49 परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”

50 परंतु त्या घोळक्यात निकदेम हजर होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता [b] निकदेम म्हणाला, 51 “एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”

52 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”

व्यभिचार करताना पकडलेली स्त्री

53 नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.

नीतिसूत्रे 4

शहाणपणाचे आणि समजुतदारपणाचे महत्व

मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल. का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका.

एकेकाळी मी सुध्दा लहान होतो. मी माझ्या वडिलांचा लहान मुलगा होतो. आणि माझ्या आईचा एकुलता एक. आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाले, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील. ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग. ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.

“तुम्ही ज्ञान मिळवण्याचा निश्चय करता तेव्हाच ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करुन ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल. ज्ञानावर प्रेम करा म्हणजे ते तुम्हाला मोठे करील. तुम्ही ज्ञानाला महान करा म्हणजे ते तुम्हाला मान मिळवून देईल. ज्ञान तुमच्यासाठी सौंदर्य आणि वैभव यांचा मुकुट आहे. ते तुम्हाला मुक्त करते.”

10 मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील. 11 मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे. 12 तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील. 13 या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे.

14 दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका. 15 वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा. 16 वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही. 17 ते दुष्टपणापासून बनवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. (दुष्टपणा केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत.)

18 चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो. 19 पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात.

20 मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. 21 तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. 22 जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. 23 तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात.

24 सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस. 25 तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. 26 तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. 27 सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.

गलतीकरांस 3

विश्वासाद्वारे देवाचा आशीर्वाद येतो

अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुन सांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे? मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दाने तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत? तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? तुम्ही व्यर्थच इतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती. देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.

ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत. पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.” म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहामासह आशीर्वाद मिळेल.

10 परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.” 11 नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की, “विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”

12 नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.” 13 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.” 14 ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.

नियमशास्त्र आणि अभिवचन

15 बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे. 16 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुझ्या संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे. 17 माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.

18 कारण वतन जर नियमशास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे अब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.

19 तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले. 20 आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.

मोशेच्या नियमशास्त्राचा हेतु

21 नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल. 22 पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.

23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.

26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center