M’Cheyne Bible Reading Plan
होमर्पणाकरता वेदी
27 परमेश्वर मोशेला म्हणाला, “होमर्पणाकरता बाभळीच्या लाकडाची साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडे चार फूट उंच [a] अशी चौरस वेदी तयार कर. 2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.
3 “वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी. 4 तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी. 5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
6 “वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत. 7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. 8 वेदीच्या बाजूंना फव्व्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
पवित्र निवास मंडपाच्याभोवतीचे अंगण
9 “पवित्र निवास मंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची पन्नास यार्ड [b] (वार) लांबीची कनात बनवावी. 10 तिच्याकरिता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत. 11 वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
12 “अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पंचवीस यार्ड [c] (वार) लांबीची एक कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात. 13 अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पंचवीस यार्ड (वार) असावी. 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात यार्ड [d] (वार) लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात; 15 फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही तेवढ्याच लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
16 “अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात. 17 अंगणाभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात. 18 अंगण पन्नास गज लांब व पंचवीस गज रुंद असावे; अंगणाभोवतीची पडद्याची कनात अडीच गज उंच असावी व ती कातलेल्या तनलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात. 19 पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणाभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
दिव्यासाठी तेल
20 “इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे उत्तम तेल रोज संध्याकाळी आणावे अशी तू त्यांना आज्ञा कर; 21 अहरोन व त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.”
येशू पाच हजारांहून अधिक लोकांना खावयास देतो(A)
6 नंतर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला. 2 तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले. 3 मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला. 4 त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
5 येशूने नजर वर करुन पाहिले तो लोकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?” 6 (फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)
7 फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
8 आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता. 9 आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
10 येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते. 11 मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
12 सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” 13 म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फक्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.
14 येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
15 आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.
येशू पाण्यावरुन चालतो(B)
16 त्या संध्याकाळी येशूचे शिष्य (गालील) सरोवराकडे गेले. 17 शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्णहूम नगराकडे निघाले. आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता. 18 वारा फारच जोराने वाहत होता आणि सरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या. 19 त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्हवीत नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला. तो सरोवराच्या पाण्यावरुन चालत होता, तो नावेकडेच येत होता. तेव्हा शिष्य घाबरले. 20 परंतु येशू त्यांना म्हणाला. “मी आहे, भिऊ नका.” 21 येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदाने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.
लोक येशूला शोधतात
22 दुसरा दिवस उजाडला. काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते. त्या लोकांना
माहीत होते की, येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता, त्यांना समजले की, येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते. 23 पण मग तिबिर्याहून आणखी काही नावा आल्या. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठाला लागल्या. प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या तीच ही जागा होती. 24 आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.
येशू जीवनाची भाकर
25 लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”
26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली. 27 ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.”
28 लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”
29 येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30 मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल? 31 अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
32 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो. 33 देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”
34 ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”
35 मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36 मी तुम्हांला पूर्वीच सांगितले की, तुम्ही मला पाहिले, तरीही विश्वास ठेवीत नाही. 37 पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन. 38 मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही. 39 देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये. परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छ आहे. 40 पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याल हवे.”
41 मग यहुदी लोक येशूविरुद्द कुरकुर करु लागले. कारण “स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे” असे तो म्हणाला. 42 यहूदी लोक म्हणाले, “हा येशू आहे. आपण त्याच्या आईवडिलांना ओळखतो. येशू तर योसेफाचाच पुत्र आहे. ‘मी स्वर्गातून खाली आलो आहे’ असे तो कसे काय म्हणू शकतो?”
43 पण येशूने उत्तर दिले, “आपापसात कुरकूर करु नका. 44 पित्यानेच मला पाठविले आहे. पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन. पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही, तर ती व्यक्ति माझ्याकडे येऊ शकत नाही. 45 संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’ [a] लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात. 46 देवाने ज्याला पाठविले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही. फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे.
47 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे. 48 मी जीवन देणारी भाकर आहे. 49 तुमच्या वाडवडिलांनी अरण्यांत असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला. परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले. 50 जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे. जर ही भाकर कोणी खाईल तर तो कधीच मरणार नाही. 51 स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंतकाळासाठी जिवंत राहील. आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे. जगातील लोकांना जीवन मिळावे यासाठी मी माझे शरीर देईन.”
52 नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपले स्वतःचे शरीर आम्हांला कसे काय खायला देऊ शकेल?”
53 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे. जर तुम्ही हे करणार नाही, तर तुमच्यात खरे जीवन नाही. 54 जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो, त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन. 55 माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. 56 जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
57 “पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील. 58 आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”
59 कफर्णहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या.
अनंतकाळच्या जीवनाचे शब्द
60 येशूच्या शिष्यांनी हे ऐकले, त्यांपैकी अनेकजण म्हणाले, “हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?”
61 आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत, हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला. “ही शिकवण तुम्हांला त्रासदायक वाटेल काय? 62 तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हांला तसेच त्रासदायक वाटेल काय? 63 शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते. 64 परंतु तुमच्यातील काहीजण विश्वास ठेवीत नाहीत.” जे लोक विश्वास ठेवीत नव्हते, ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता, तोही त्याला माहित होता. 65 येशू म्हणाला, “म्हणूनच मी तुम्हांला म्हटले की, ‘जर पिता एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यक्ती येणारच नाही.’”
66 येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याल सोडून गेले; येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले.
67 नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?”
68 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत. 69 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पवित्र व्यक्ति आहात हे आम्हांला माहीत आहे.”
70 मग येशूने उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडले. पण तुमच्यातील एक सैतान आहे.” 71 शिमोन इस्कर्योत याचा मुलगा यहूदा याच्याविषयी येशू बोलत होता. यहूदा बारा शिष्यांपैकी एक होता. परंतु पुढे हाच यहूदा येशूच्या विरुद्ध उठणार होता.
योग्य जगणे तुझ्या आयुष्यात भर घालेल
3 मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव. 2 मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.
3 प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर. 4 म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
5 परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. 6 तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील. 7 तुझ्या स्वतःच्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. 8 तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील.
9 तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे. 10 नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
11 मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर. 12 का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
13 ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात. 14 ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
16 ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते. 17 ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात. 18 ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
19 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले. 20 परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
21 मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस. 22 ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील. 23 नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस. 24 तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल. 25-26 अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईल. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील.
27 जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा. 28 जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
29 तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता.
30 योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
31 काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका. 32 का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.
33 परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.
34 जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.
35 शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.
इतर प्रेषितांनी पौलाचा स्वीकार केला
2 मग चौदा वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा यरुशलेमास गेलो. मी बर्णबाबरोबर गेलो. तीतालासुद्धा माझ्याबरोबर घेतले. 2 मी जावे असे देवाने मला प्रगट केले, म्हणून मी गेलो. ज्याप्रमाणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली. यासाठी की, भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये.
3 त्याचा परिणाम असा झाला की, तीत, जो माझ्याबरोबर होता, तो ग्रीक असतानाही त्याला सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. 4 कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणून ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणणयात आले त्यामुळे हे झाले. 5 सुवार्तेमधील सत्य तुमच्याजवळच राहावे म्हणून आम्ही क्षणभरदेखील त्यांना वश झालो नाही.
6 जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही. 7 उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे. 8 कारण ज्याने पेत्राला यहूदी लोकाकरिता प्रेषित बनविले त्यानेच मला विदेशी लोकांकरिता प्रेषित बनविले. 9 म्हणून याकोब, पेत्र व योहान ज्यांची मंडळीचे आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी होती, त्यांनी देवाने मला दिलेला अधिकार ओळखला आणि बर्णबा व माझ्याशी सहभागितेचे चिन्ह म्हणून हात मिळविला व सहमती दर्शविली की आम्ही विदेशी लोकांमध्ये जाऊन संदेश द्यावा. आणि त्यांनी जाऊन यहूदी लोकांना उपदेश करावा. 10 त्यांनी फक्त हेच सांगितले की, त्यांच्या गरिबांना मदत करण्याची आम्ही आठवण ठेवावी, आणि मी ते सर्व करण्यास राजी होतो एवढेच नव्हे तर ते करण्यास अधीर झालो होतो.
पेत्राची चूक झाली असे पौल दाखवून देतो
11 पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती. 12 कारण याकोबाने पाठविलेली काही माणसे येण्यापूर्वी पेत्र विदेशी लोकांबरोबर जेवत असे. पण जेव्हा ते (याकोबाने पाठविलेले यहूदी) आले तेव्हा त्याने अंग काढून घेतले आणि तो विदेशी लोकांपासून वेगळा झाला, कारण या यहूदी लोकांचा विश्वास होता की, विदेशी माणसांची सुंता झालीच पाहिजे, म्हणून त्यांची त्याला भीती वाटत होती. 13 व बाकीचे यहूदी लोकसुद्धा त्याच्या ढोंगामध्ये सामील झाले, येथपर्यंत की, बर्णबासुद्धा त्यांच्या ढोंगाला वश झाला. 14 जेव्हा मी पाहिले की, सुवार्तेच्या सत्याच्या सरळ मार्गात ते योग्य प्रकारे वागत नाहीत, तेव्हा मी सर्वासमोर पेत्राला म्हणालो, “जर तू जो यहूदी आहेस व यहूदीतरांप्रमणे वागत आहेस व यहूदी माणसाप्रमाणे वागत नाहीस तर तू विदेशी लोकांना यहूदी लोकांच्या चालीरीतींचे अनुकरण करण्यास त्यांना कसे भाग पाडू शकतोस?”
15 आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि “पापी यहूदीतर लोकांपैकी” नाही. 16 तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.
17 पण जर, आम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान होण्याचे पाहतो, तर आम्ही यहूदीसुद्धा विदेश्यांप्रमाणे पापी असे आढळतो. याचा अर्थ असा आहे की, ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? 18 अर्थातच नाही! कारण जर मी या सोडून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुन्हा शिकविण्यास सुरुवात केली, तर मी नियमशास्त्र मोडणारा होतो. 19 कारण नियमशास्त्रामुळे मी नियमशास्त्राला “मेलो” यासाठी की मी देवासाठी जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो. 20 यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवाजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. 21 मी देवाची कृपा नाकारीत नाही. कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला.
2006 by World Bible Translation Center