Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 26

पवित्र निवास मंडप

26 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पवित्र निवास मंडप कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या दहा पडद्यांपासून व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावा. एखाद्या शिवणकाम करणाऱ्या कुशल कारागिराकडून त्या पडद्यांवर, पसरलेल्या पंखाच्या करुब देवदूतांची चित्रे शिवावीत. प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे तो चौदा वार किंवा चौदा गज लांब व दोन वार किंवा दोन गज रूंद असावा; त्यापैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसज्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा; त्या दोन्हीही भागांच्या शेवटाच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी करावीत. पहिल्या भागाच्या शेवटच्या कडेला पन्नास बिरडी असावीत व दुसऱ्या भागातही ती तशीच असावीत; पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या सहाय्याने ते दोन भाग एकत्र जोडावेत म्हणजे त्या दोन्ही भागांचे मिळून एकच सलग कापड होईल आणि मग त्यापासून पवित्र निवास मंडप तयार करता येईल.

“त्यानंतर ह्या पवित्र निवास मंडपाला झाकून टाकणारा असा दुसरा मंडप बकऱ्याच्या केसापासून तयार केलेल्या अकरा पडद्यांच्या सहाय्याने तयार करावा. हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रूंद अशा मापाचे बनवावेत. त्यातून पाच पडदे एकत्र जोडून दुसरा भाग करावा; मग दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग करावा; मंडपाच्या पुढच्या बाजूला सहाव्या पडद्याचा अर्धा भाग मागे दुमडावा. 10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तसेच करावे; 11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबूसाठी सलग एकच भाग होईल. 12 ह्या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धाभाग पवित्र निवास मंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील. 13 त्या तंबूच्या बाजूचे पडदे पवित्र निवास मंडपाच्या खालच्या कडेच्या खाली अठरा इंच लोंबत राहतील; त्यामुळे पवित्र निवास मंडपाला पूर्ण आच्छादान मिळेल. 14 बाहेरचा तंबू झाकण्याकरिता दोन आच्छादने करावीत; एक मेंढ्याच्या लाल रंगविलेल्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या एका प्रकारच्या जनावराच्या कातड्याचे करावे.

15 “पवित्र निवास मंडपाला बाभळीच्या लाकडापासून केलेल्या फव्व्यांचा आधार द्यावा. 16 ह्या फव्व्या पंधरा फूट उंच व सत्तावीस इंच रूंद असाव्यात. 17 प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे करावीत; दोन फव्व्या उभ्या आडव्या तुकड्यांनी जोडाव्यात. पवित्र निवासमंडपाच्या सर्व फव्व्या एक सारख्याच असाव्यात. 18 पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात. 19 फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका-खुर्या-कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात. 20 पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात; 21 आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका-खुर्च्या कराव्यात. 22 पवित्र निवास मंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात; 23 आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फव्व्या कराव्यात. 24 कोपऱ्याच्या फव्व्या खालच्या बाजूस जोडाव्यात; त्यांच्या वरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे. 25 पवित्र निवास मंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठफव्व्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे सोळा, चांदीच्या बैठका असतील.

26 “त्यांच्या फव्व्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व 27 दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत. 28 मध्यभागावरील अडसर लाकडांच्या फव्व्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.

29 “फव्व्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात. 30 मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवास मंडप बांधावा.

पवित्र निवास मंडपाची आतील बाजू

31 “तलम सणाच्या कापडाचा व निळया जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा मिळून पवित्र निवास मंडपाच्या आतील विशेष पडदा-अंतरपट बनवावा आणि त्यावर करूब दूतांची चित्रे कारागिराकडून काढून घ्यावीत. 32 बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि चांदीच्या चार खुर्च्या त्या खांबाखाली ठेवाव्यात; मग तो पडदा खांबाच्या आकड्यावर लटकत ठेवावा. 33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील; 34 परमपवित्र स्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.

35 “अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला विशेष मेज ठेवावा; तो पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.

पवित्र निवास मंडपाचे दार

36 “पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करावा व त्यावर भरतकाम करावे. 37 हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्या साठी पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”

योहान 5

तळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो

नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. [c] कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता. येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”

त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”

मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.” तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला.

हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. 10 म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

11 परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”

12 यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”

13 परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.

14 त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”

15 नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे.

16 येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. 17 परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो”.

18 यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्का निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो”.

येशूला देवाचा अधिकार आहे

19 परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. 20 पिता पुत्रावर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल. 21 पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो.

22 “याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. 23 देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.

24 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. 26 खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. 27 आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.

28 “तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. 29 मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.

30 “मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”

येशू यहूदी लोकांशी बोलणे चालू ठेवतो

31 “जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत. 32 परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”

33 “तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे. 34 माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो. 35 पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.

36 “परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे. 37 आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. 38 पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, 39 तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते! 40 तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”

41 “मला माणसांकडून स्तुति नको. 42 पण मी तुम्हांला ओळखतो- तुम्हांमध्ये देवाविषयी प्रीति नाही हे मला माहीत आहे. 43 मी माझ्या पित्यापासून आलो आहे- मी त्याच्यावतीने बोलतो. परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारीत नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. 44 तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? 45 मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे. 46 जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल. कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. 47 परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.”

नीतिसूत्रे 2

ज्ञानाचे ऐका

मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.

परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.

म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील. 10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.

11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल. 12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात. 13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत. 14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात. 15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.

16-17 ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला “नाही” म्हणायला मदत करील. 18 तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल. 19 ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.

20 ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील. 21 चांगले प्रामाणिक लोक स्वतःच्या जमीनीवर राहातील. साधे प्रामाणिक लोक स्वतःची जमीन राखतील. 22 परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.

गलतीकरांस 1

प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते. देव जो पिता त्याने व येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले. हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडूनही आहे.

आणि हे गलतीया [a] येथील मंडळ्यांना (विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.

यांची कृपा चांगुलपण व शांति तुम्हाबरोबर असो. येशूने स्वतःला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्ही राहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती. त्याला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

फक्त एकच सुवार्ता खरी आहे

मला आश्चर्य वाटते की ज्या देवाने तुम्हांला ख्रिस्ताद्वारे बोलाविले आहे त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर दुसऱ्या सुवार्तेकडे वळत आहात. ती खरी सुवार्ता नाही पण असे काही जण आहेत की ते तुम्हांला गोंधळात टाकीत आहेत व ख्रिस्ताविषयीची सुवार्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो. आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आता पुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हांस सांगत असेल तर देव त्याला शाप देवो.

10 आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करीत आहे काय? मी मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो.

पौलाचा अधिकार देवाकडून आहे

11 बंधूनो, तुम्हांला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तो मानवी संदेश नाही. 12 कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली.

13 यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळ केला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला. 14 माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.

15 त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला बोलावले. 16 आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की, विदेशी लोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही. 17 किंवा जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.

18 मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो. 19 परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल. 20 आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे, ते खोटे नाही. 21 नंतर मी सूरीया व किलीकिया प्रांतांत गेलो.

22 परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो. 23 त्यांनी फक्त ऐकले होते. लोक म्हणतातः “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला, ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचा प्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.” 24 आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center