M’Cheyne Bible Reading Plan
पवित्र वस्तूची अर्पणे
25 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. प्रत्येक माणसाने माझ्यासाठी काय अर्पण आणावयाचे ते मनापासून ठरवून आणावे; ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी. 3 लोकांकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी; सोने, चांदी, पितळ; 4 निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस; 5 लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड; 6 दिव्यासाठी जैतूनाचे मसाले; 7 एफोद ह्यांच्यामध्ये खोचण्यासाठी गोमेद नांवाचे रत्न व इतर रत्ने.”
पवित्र निवास मंडप
8 परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांनी माझ्यासाठी एक पवित्र निवास मंडप बांधावा म्हणजे मग मी इस्राएल लोकांबरोबर राहीन. 9 तो पवित्र निवास मंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. मग तुम्ही, अगदी मी दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच तो बांधावा.
आज्ञापटाचा कोश
10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी. 11 तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा. 12 पवित्रकोश उचलून नेण्यासाठी त्याला सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या प्रत्येक बाजूला दोन अशा चारही कोपऱ्यांच्या पायावर घट्ट बसवाव्यात 13 मग पवित्रकोश वाहून नेण्याकरता बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत 14 पवित्रकोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा. 15 पवित्रकोशाचे हे दांडे कड्यात कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊनयेत.”
16 देव म्हणाला, “मी तुला पवित्रकराराचा साक्षपट देईन तो तू पवित्रकोशात ठेवावास. 17 मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे; 18 मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. 19 एक देवदूत एका बाजूला व दुसरा, दुसज्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखण्ड सोन्याचे घडवावेत. 20 त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
21 “मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे. 22 मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
पवित्र मेज
23 “बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते छत्तीस इंच लांब आठरा इंच रूंद व सत्तावीस इंच उंचीचे असावे. 24 ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठकरावा. 25 मग तीन इंच रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा। 26 मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांवर घटृ बसवाव्यात. 27 ह्या कड्या मेजाच्या वरच्या भाग भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घट्ट बसतील. 28 मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत. 29 मेजावरची तबके, चमचे, धूपपात्र, सुरया व कटोरे शुद्ध सोन्याचे बनवावेत; सुरयांचा व कटोऱ्यांचा पेयार्पणे ओतण्यासाठी उपयोग होईल. 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर ठेवावी व ती नेहमी माझ्यापुढे असावी.
सोन्याचा दीपवृक्ष
31 “मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
32 “त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात. 33 प्रत्येक शाखेला तीन फुले असावीत; ही फुले, ह्या कव्व्या व पाकव्व्या बदामाच्या झाडावर असताता तशा असाव्यात. 34 ह्या दीपवृक्षावर आणखी चार फुले बनवावीत; ती बदामाच्या झाडावरील, कव्व्या पाकव्व्यासहित असलेल्या फुलाप्रमाणे असावीत. 35 ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली आहे त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्या सहित एक फूल बनवावे. 36 हे दीपवृक्ष, फुले व फांद्या यांच्या सहीत शुद्ध सोन्याचे घडविले पाहिजे हे सर्व ठोकून व एकत्र जोडून एकसंध केले पाहिजे. 37 मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल. 38 दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. 39 हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे पन्नास शेर शुद्ध सोन्याची करावी; 40 आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.”
येशू शोमरोनी स्त्रीशी बोलतो
4 परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे. 2 (परंतु खरे पहता, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले. 3 म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला. 4 गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जावे लागले.
5 शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. 6 याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. 7 तेंव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी [a] स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.” 8 हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.
9 ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. [b] )
10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”
11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. 12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वतः या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”
13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”
15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”
16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”
येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगितलेस की, तुला नवरा नाही. 18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”
19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात. 20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”
21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. 22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते. 23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. 24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”
25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”
26 येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”
27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले, 29 “एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.” 30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.
31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”
33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”
34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. 35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. 36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे. 37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे. 38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”
39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.” 40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला. 41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.
42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”
येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरे करतो(A)
43 दोन दिवसांनी येशू तेथून निघाला आणि गालील प्रांतात गेला. 44 (पुर्वीच येशू म्हणाला होता की, संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही.) 45 येशू जेव्हा गालीलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वल्हांडण सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती. कारण ते लोकही सणानिमित तेथे गेले होते.
46 येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता. 47 येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता. 48 येशू त्याला म्हणाला, “चमत्कार आणि अदभुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल.”
49 राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.”
50 येशूने उत्तर दिले, “जा, तुझा मुलगा वाचेल.”
येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. 51 तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नोकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “तुमचा मुलगा बरा आहे.”
52 त्या मनुष्याने विचारले, “माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?”
नोकर म्हणाले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.”
53 “तुझा मुलगा वाचेल” असे एक वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते, हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला.
54 यहुदीयातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.
प्रस्तावना
1 हे शब्द म्हणजे दावीदाचा मुलगा शलमोन याची शहाणपणाची शिकवण आहे. तो इस्राएलचा राजा होता. 2 लोक शहाणे व्हावेत आणि त्यांना योग्य गोष्ट कोणती ते कळावे म्हणून हे शब्द लिहिले गेले. या शब्दांमुळे लोकांना खरे शिक्षण समजण्यास मदत होईल. 3 हे शब्द लोकांना जगण्याची सर्वोत्कृष्ट पध्दत शिकवतील. लोक न्यायी, इमानी आणि चांगले राहाण्याचा योग्य मार्ग शिकतील. 4 ज्या लोकांना शहाणपण शिकण्याची गरज आहे, त्यांना हे शब्द शहाणपण शिकवतील. तरुण माणसे या शब्दांपासून शिकू शकतील. 5 या शब्दांतली शिकवण शहाण्या माणसांनी सुध्दा अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, तरच ते अधिक शिकू शकतील आणि अधिक शहाणे होतील. आणि जे लोक चांगले वाईट ओळखण्यात तरबेज आहेत त्यांना अधिक चांगले समजू शकेल. त्या 6 नंतरच लोकांना शहाणपणाच्या गोष्टींचा आणि म्हणींचा अर्थ समजू शकेल. शहाणे लोक ज्या गोष्टी सांगतात त्या लोकांना समजू शकतील.
7 पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.
शलमोनाचा त्याच्या मुलांस उपदेश
8 मुला, [a] तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस. 9 तुझ्या आईचे आणि वडिलांचे शब्द म्हणजे तुझे मस्तक सुशोभित करणारा फुलांचा मुकुट आहे. ते शब्द म्हणजे तुझ्या गळ्याभोवती असलेली सुंदर माळ आहे.
10 मुला, ज्या लोकांना पाप आवडते ते लोक तुला प्रलोभने दाखवतील. तू त्यांचे ऐकू नकोस. 11 ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू. 12 आपण कोणत्या तरी निरपराध माणसावर हल्ला करु आपण त्या माणसाला मारु आणि त्याला मृत्युलोकात पाठवू 13 आपण किमती वस्तूंची चोरी करु. आपण त्या माणसाचा सर्वनाश करु व त्याला कबरेत पाठवू. आपण अशा वस्तूंनी आपले घर भरु. 14 तेव्हा आमच्याबरोबर ये आणि या गोष्टी करायला आम्हाला मदत कर. आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या आपण वाटून घेऊ.”
15 मुला, ज्या लोकांना पाप आवडते त्यांच्या मागे जाऊ नकोस. ते ज्या रस्त्यावर राहातात त्या रस्त्यावर एक पाऊलही टाकू नकोस. 16 ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
17 लोक पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे पसरतात. पण पक्षी जेव्हा तुम्हाला बघत असतो तेव्हा त्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात अर्थ नसतो. 18 ते वाईट लोक लपतात व कोणाला तरी मारण्यासाठी वाट बघतात पण खरोखर तेच त्या सापळ्यात अडकतील. त्यांच्या सापळ्यामुळे त्यांचाच नाश होईल. 19 अधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.
चांगली स्त्री-ज्ञान
20 ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे. 21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहराच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान [b] (रुपी स्त्री) म्हणते.
22 “तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात? 23 तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
24 “परंतु तुम्ही माझे ऐकायला नकार दिला. मी मदत करायचा प्रयत्न केला. मी माझा हात दिला. पण तुम्ही माझी मदत झिडकारली. 25 तुम्ही दूर गेलात आणि माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही माझे शब्द स्वीकारायला नकार दिलात. 26 म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल. 27 मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओझ्यासारखे वाटेल.
28 “या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही. 29 मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. 30 तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही. 31 म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
32 “मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो. 33 परंतु जो माझी आज्ञा पाळतो तो सुरक्षित राहातो. तो समाधानी असतो. त्याला वाईट गोष्टींची भीती बाळगायचे कारण उरत नाही.”
शेवटची सूचना आणि सलाम
13 ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.” [a] 2 मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसऱ्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माझ्या परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसऱ्यांनाही नाही. 3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे. 4 कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू.
5 तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वतःची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. 6 आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. 7 आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे. 8 कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरेपणासाठी करता येते. 9 जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, ती अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे. 10 यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये.
11 शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
12 पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.
13 सर्व संत आपणांस सलाम सांगतात. 14 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center