M’Cheyne Bible Reading Plan
देव आणि इस्राएल लोक यांचा करार
24 देवाने मोशेला सांगितले, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर येऊन दुरुनच माझी उपासना करा; 2 मग मोशे एकटाच परमेश्वरा जवळ येईल; इतरांनी परमेश्वराजवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
3 मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”
4 तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले. 5 मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.
6 मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त राखून काही भांड्यात ठेवले आणि दुसरे अर्धे रक्त त्याने वेदीवर ओतले.
7 मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”
8 मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”
9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले. 10 तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता! 11 इस्राएल मधील सगव्व्या वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. [a] मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
देवाचे नियम आणण्याकरता मोशे जातो
12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांसाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
13 तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा देवाच्या पर्वतावर चढून गेले. 14 मोशे इस्राएलच्या वडीलधाऱ्या माणसांना म्हणाला, “तुम्ही येथे आम्हासाठी थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुम्हावर अधिकारी म्हणून राहतील; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
मोशे देवाला भेटतो
15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला. 17 इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.
18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
येशू आणि निकदेम
3 निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. 2 एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”
4 निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
5 येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. 6 मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. 7 तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. 8 वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
9 निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. 19 ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते. 20 वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. 21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. [b]
येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान
22 त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहूदीया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यांसह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले. 23 योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत. 24 (योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)
25 योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहूदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते. 26 म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्याबरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे, व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत.
27 योहानाने उतर दिले, “देव जे देतो तेच माणसाला मिळते. 28 मी हे सांगताना तुम्ही स्वतःच ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’. 29 ज्याला वधू असते तो वर असतो, वराला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळया आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय, ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे. आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे. 30 तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे.”
स्वर्गातून येणारा
31 “जो (येशू) वरुन येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो, परंतु जो स्वर्गातून आला तो (येशू) इतर लोकांहून थोर आहे. 32 त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत. 33 तो (येशू) जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. 34 देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. 35 पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. 36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, पंरतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
ईयोब परमेश्वराला उत्तर देतो
42 नंतर ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले, तो म्हणाला:
2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे.
तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.
3 परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास: ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखे [a] बोलतो आहे?’
परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो.
ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
4 “परमेश्वरा, तू मला म्हणालास, ‘ईयोबा, तू ऐक, मी बोलेन.
मी तुला प्रश्न विचारेन आणि तू मला उत्तर दे.’
5 परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते.
परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
6 आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते.
मला पश्चात्ताप होत आहे.
मी आता धुळीत आणि राखेत [b] बसून माझे मन
आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
परमेश्वर ईयोबाचे ऐश्वर्य परत देतो
7 परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, “मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला. 8 म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वतःसाठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हाला योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मुर्ख होता म्हणून तुम्हाला शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.”
9 तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.
10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. 11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबबरोबर भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा [c] आणि सोन्याची अंगठी दिली.
12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14,000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत. 13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. 14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले. 15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.
16 अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला. 17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.
पौलाच्या जीवनातील खास आशीर्वाद
12 मी प्रौढी मिरविलीच पाहिजे. जरी त्यापासून कोणताही लाभ नाही. मी आता प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण याकडे वळतो 2 ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो. 3 आणि मला माहीत आहे, हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही पण देव जाणतो. 4 तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही. 5 मी अशा माणसाविषयी प्रौढी बाळगीन. परंतु माझ्या अशक्तपणाशिवाय मी स्वतःविषयी अभिमान बाळगणार नाही.
6 जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वतःला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माझ्यापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये.
7 आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला. 8 तीन वेळा मी प्रभूला विनंति केली की, तो माझ्यातून काढून टाक. 9 पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे. 10 या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो. अपमानात, कठीण परिस्थितित, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हा मी सशक्त असतो.
करिंथ येथील ख्रिस्ती लोकांविषयी पौलाचे प्रेम
11 मी स्वतःच मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो. 12 प्रेषितांची चिन्हे ही आहेतः चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली. 13 कारण मी तुम्हांला भार झालो नाही, ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळ्यापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशात उणे आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा.
14 पाहा, आता तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते. 15 म्हणून मी फार आनंदाने माझ्याकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वतःदेखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?
16 तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा. 17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हांपासून काही फायदा घेतला आहे का? 18 मी तीताला तुमच्याकडे जाण्यास विनंति केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले. तीताने तुम्हांपासून काही फायदा करुन घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय?
19 तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत. आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हांला बळकट करण्यासाठी. 20 कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील. 21 म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.
2006 by World Bible Translation Center