Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 23

23 “इतर लोकांविरुद्ध खोट्या अफवा पसरवू नका; जर तुम्हाला कोर्टात साक्ष द्यावयाची असेल तर खोटे बोलणाऱ्या दुष्ट माणसाच्या मदतीसाठी खोटी साक्ष देण्यात सहभागी होऊ नका.

“सर्वजण एखादी गोष्ट करतात म्हणून तुम्हीही ती खरी मानून करु नका. जर एखादा जनसमूह चुकीची गोष्ट करीत असेल तर तुम्ही त्याच्यांत सामील होउ नका; तुम्हीही चुकीची गोष्ट करावी म्हणून त्यांनी तुमचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे मुळीच ऐकू नका; तुम्ही तर जे योग्य व न्याय्य आहे तेच करावे.

“एखाद्या गरीब माणसाचा न्याय होताना, दया येऊन वाईट वाटल्यामुळे काही जण त्याची बाजू उचलून धरतील, परंतु त्याची बाजू खरी असल्याशिवाय तुम्ही तसे करु नये.

“जर तुम्हाला एखादा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव दिसले तर त्याचा मालक तुमचा शत्रू असला तरी तुम्ही ते त्याच्या मालकाकडे नेऊन सोडावे.

“जास्त ओझ्याच्या भारामुळे एखाद्या जनावराला चालता येत नसल्याचे तुम्ही पाहिले तर ते जनावर तुमच्या शत्रुचे असले तरी तुम्ही थांबून त्या जनावराला मदत करावी.

“तुम्ही एखाद्या गरीब माणसावर अन्याय होऊ देऊ नका; त्या गरीबाचा न्याय इतर कोणत्याही सामान्य माणसासारखाच होऊ द्यावा.

“कोणाला दोष देण्याअगोदर फार काळजीपूर्वक विचार करा; कोणावरही खोटे दोषारोप करु नका; एखाद्या निष्पाप वा निरपराधी माणसाला मरणाची शिक्षा होऊ देऊ नये; जो कोणी निरपराधी माणसाला ठार मारतो तो दुष्ट आहे; अशा दुष्टास मी कधीच क्षमा करणार नाही.

“एखादा अपराधी माणूस, खोटी साक्ष देण्याकरता तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेतल्यामुळे न्यायाधीश आंधळे बनतात; त्यांना सत्य दिसत नाही आणि अशा लाचलूचपतीमुळे चांगले सज्जन लोकही खोटे बोलू लागतात.

“तुम्ही परक्याला कधीही छळू नये; परक्याला कसे वाटते हे तुम्हाला चांगले माहीत आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसरदेशात परके होता.

विशेष सुट्ट्यां

10 “सहा वर्षे जमिनीची मशागत करा; पेरणी करा; धान्य पिकवा; चांगला हंगाम येऊ द्या. 11 परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.

12 “तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर कामकऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना मोकळे मोकळे वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.

13 “हे सर्व नियम तुम्ही अवश्य व कटाक्षाने पाळावेत; इतर दैवतांची उपासना करु नका; त्यांची नांवेही तुमच्या तोंडाने उच्चारू नका.

14 “दरवर्षी तुम्हाला तीन विशेष सुट्ट्या असतील; ह्या सुट्ट्यांच्या दिवसात तुम्ही माझी उपासना करण्याकरता विशेष ठिकाणी तुम्ही माझ्याकडे यावे. 15 पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.

16 “दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल; यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळावा.

“तिसरी सुट्टी ‘मंडपाचा सणाच्या’ वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा.

17 “अशा रीतीने वर्षातून तीन वेळा माझ्या उपासनेच्या विशेष ठिकाणी तुम्ही सर्वानी माझ्याकडे म्हणजे याव्हे कडे म्हणजेच आपल्या प्रभूकडे यावे.

18 “तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करु नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.

19 “हंगामाच्या वेळी जेव्हा तुम्ही धान्य गोळा करता तेव्हा त्या प्रत्येक प्रथम उपजातील उत्तम तुम्ही आधी परमेश्वराच्या मंदिरात आणावे

“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवून खाऊ नये.”

देव इस्राएलला त्यांचा देश घेण्यासाठी मदत करतो

20 देव म्हणाला, “मी एका दूताला तुमच्याकडे पाठवीत आहे तो तुमच्यापुढे चालून, मी तुमच्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे तुम्हांस घेऊन जाईल; तो तुमचे संरक्षण करील. 21 तुम्ही त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या मागे चाला; त्याच्याविरुद्ध बंड करु नका. तुम्ही त्याच्या विरुद्ध काही चुकीच्या गोष्टी कराल तर तो तुम्हांला क्षमा करणार नाही; माझे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे. 22 तो जे जे सांगले ते ते सर्व तुम्ही ऐकले पाहिजे; मी सांगतो ते सर्व तुम्ही केले पाहिजे असे तुम्ही कराल तर मी तुम्हांबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.”

23 देव म्हणाला, “माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी अशा निरनिराव्व्या लोकांच्या देखत त्या देशात तुम्हाला घेऊन जाईल.

24 “परंतु या सर्व लोकांच्या दैवतांची पूजा करु नका; त्यांना नमन करु नका; त्याच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही कधीही वागू नये; त्यांच्या मूर्तीचा तुम्ही नाश करावा, आणि त्यांच्या मूर्तीच्या स्मारकांचे दगड व स्तंभ तोडून फोडून टाकावे. 25 तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; तुम्ही असे कराल तर माझ्या कृपेने तुम्हाला भरपूर अन्नपाणी मिळेल मी तुमच्या मधून रोगराई काढून टाकीन. 26 तुमच्या सर्व स्त्रिया मुलेबाळे प्रसवतील कोणीही वांझ असणार नाही; जन्म देताना त्यांचे एकही बाळ मरणार नाही. आणि मी तुम्हाला दीर्घायुषी करीन.

27 “तुम्ही जेव्हा तुमच्या शत्रुविरुद्ध लढाल तेव्हा मी माझे महान सामर्थ्य तुमच्यापुढे पाठवीन-माझ्या महान सामर्थ्याची नुसती बातमी तुमच्या पुढे जाईल आणि तुमचे शत्रु घाबरून जातील; त्यांचा पराभव करण्यास मी तुम्हास मदत करीन; तुमच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्यात रणांगणावर गोंधळ उडेल व ते लोक पळून जातील. 28 मी तुमच्या पुढे गांधील माशा पाठवीन; त्यामुळे त्या गांधील माशा [a] हिव्वी, कनानी, व हित्ती लोकांना तुमच्या देशातून निघून जावयास भाग पाडतील. 29 परंतु त्या सगव्व्या लोकांना मी लगेच तुमच्या देशातून घालवून देणार नाही आणि एका वर्षभरात मी हे करणार नाही; कारण मी तसे फार लवकर केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग जंगली जनावरांची वाढ होऊन देशात ते वरचढ होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. 30 तेव्हा मी त्या लोकांना तुमच्या देशातून हळूहळू घालवून देईन; तेव्हा तुम्ही देश व्यापण्यास पुढे चालावे, आणि तुम्ही जसे पुढे जाल तसे मी तेथील इतर लोकांना तुमच्यापुढून घालवून देईन.

31 “मी तुम्हाला तांबडा समुद्र ते थेट युप्रेटीस नदी एवढा सारा प्रदेश देईन; तुमची पश्चिमेकडील सीमा पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत म्हणजे भूमध्यसमुद्रापर्यंत व पूर्वेकडील सीमा अरबी वाळवंटापर्यंत, अशा तुमच्या प्रदेशाच्या सीमा असतील. मी तुम्हाला तेथे राहाणाऱ्या लोकांचा पराभव करावयास लावीन व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.

32 “तुम्ही त्या लोकांच्या बरोबर किंवा त्यांच्या दैवतांबरोबर कोणताही करार करु नये. 33 तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापव्व्यासारखे अडकाविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या दैवतांची उपासना करण्यास सुरवात कराल.”

योहान 2

काना येथील लग्न

दोन दिवसांनी गलीलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”

येशूने उतर दिले, “आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही.”

येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”

त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी [a] पाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.

येशू नोकरांना म्हणाला, “हे रांजण पाण्याने भरा.” मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले.

मग येशू नोकरांना म्हणाला, “आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजनप्रमुखाकडे न्या.”

मग नोकर ते पाणी घेऊन भोजनप्रमुखाकडे गेले. मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले. 10 तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”

11 स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

12 नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.

येशू मंदिरात जातो(A)

13 यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. 14 येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. 15 येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वाना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. 16 येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”

17 हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली:

“तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल” (B)

18 यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”

19 येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”

20 यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”

21 (परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. 22 नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)

23 वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले. 24 परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते. 25 लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.

ईयोब 41

41 “ईयोबा, तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का?
    तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
ईयोबा, तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्याला वेसण घालता येईल का?
    किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
ईयोबा, लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का?
    तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
ईयोबा, लिव्याथान तुझ्याशी करार करुन
    जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
ईयोब, तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का?
    तू त्याला दोरीने बांधशील का?
    म्हणजे तुझ्या सेवक मुली त्याच्याशी खेळू शकतील?
ईयोबा मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का?
    ते त्याचे तुकडे करुन ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
ईयोबा, तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात भाला फेकशील का?

“ईयोबा, तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस.
    ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरुन जा.
    तशा आशेला जागाच नाही.
    त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
10 एकही माणूस त्याला जागे करुन
    त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही.

“माझ्याविरुध्द उभा राहाणाराही कुणी नाही. [a]
11 मी (देव) कुणाचाही देणेकरी नाही.
    या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे. [b]

12 “ईयोबा, मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी
    आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
13 कुणीही त्याची कातडी छेदू शकत नाही.
    त्याची कातडी चिलखतासारखी [c] आहे.
14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कुणीही भाग पाडू शकत नाही.
    त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांना भीती वाटते.
15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या
    रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत
    की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत.
    ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कुणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते.
    त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात.
    आगीच्या ठिणग्या निघतात.
20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून
    निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
21 लिव्याथानाच्या श्र्वासानी कोळसे पेटतात
    आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
22 लिव्याथानाची मान मजबूत आहे.
    लोक त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही.
    ती लोखंडासाखी कठीण आहे.
24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे.
    त्याला भीती वाटत नाही.
ते पाट्यासारखे आहे.
    जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात.
    लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्याला न लागता परत येतात.
    त्या शस्त्रांनी त्याला काहीही इजा होत नाही.
27 तो लोखांडाची कांब गवताच्या काडीसारखी मोडू शकतो.
    कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही.
    वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्याला ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते.
    लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे.
    तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो.
    तो त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो.
    तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही.
    तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो.
    तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे.
    आणि मी, परमेश्वराने त्याला निर्माण केले आहे.”

2 करिंथकरांस 11

पौल आणि खोटे प्रषित

11 माझी आशा आहे की, आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल. पण तो तुम्ही करीतच आहा. मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हांला एक पती देण्याचे (म्हणजे) ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते. यासाठी की मला तुम्हांला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल. पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल. कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता.

पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही. मी प्रशिक्षित वक्ता नसेन. परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हांला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे.

तूम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणांला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हांला फुकट सांगितले यात मी पाप केले काय? तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले. आणि मी तुम्हांजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हांस ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन. 10 ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कुणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही. 11 का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो!

12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात, त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन. 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धारण करणारे आहेत 14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो. 15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात, त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.

पौल त्याच्या दु:खसहनाविषयी सांगतो

16 मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. 17 या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही. तर मूर्खासारखे बोलतो. 18 जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन. 19 तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता! 20 वस्तुतः जे कोणी तुम्हाला गुलाम करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैर फायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता. 21 आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो.

पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो) 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे. 23 मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो. 24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले. 25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला. 26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.

27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो, 28 या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळ्याप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो. 29 कोण अशक्त आहे, आणि मला अशक्तपणा माहीत नाही? कोण पापात पडला आहे? आणि मी माझ्यामध्ये जळत नाही?

30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर, माझ्या अशक्तपणा दाखविणाऱ्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन. 31 देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32 दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता. 33 पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center