Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 20

दहा आज्ञा

20 मग देव म्हणाला,

“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.

“माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.

“तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस; त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; [a] मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो; परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

“परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.

“शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस; 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये; 11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.

12 “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.

13 “कोणाचाही खून करु नकोस.

14 “व्यभिचार करु नकोस.

15 “चोरी करु नकोस.

16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.

17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

लोकांना देवाची भीती वाटते

18 ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला व पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले व भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले. 19 नंतर लोक मोशेला म्हणाले, “तुला जर आमच्याशी बोलावयाचे असेल तर तू खुशाल बोल; आम्ही ऐकू; परंतु कृपा करून देवाला आमच्याशी बोलू देऊ नकोस; तो बोलेल तर आम्ही मरुन जाऊ.”

20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका! कारण परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो हे दाखविण्यासाठी आणि तुम्ही त्याचा मान राखून त्याचे भय धरावे व पाप करु नये हे दाखविण्यासाठी तो आला आहे.”

21 नंतर मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे त्याला भेटावयास गेला, तो पर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले. 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. 23 माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.

24 “माझ्यासाठी मातीची एक विशेष वेदी बांधा आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; माझी आठवण व्हावी म्हणून मी सांगतो त्या प्रत्येक जागी हे करा मग मी येईन व तुम्हाला आशीर्वाद देईन. 25 तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती चिऱ्याच्या दगडाची नसावी; जर वापरावयाचा दगड चिऱ्याचा बनविण्यासाठी तू त्याला कसले हत्यार लावशील तर ती वेदी मी मान्य करणार नाही. 26 आणि वेदीकडे जाण्यासाठी तुम्ही पायऱ्या करु नका कारण पायऱ्यांवरून वेदीकडे चढून जाताना लोकांना तुमची नन्गता दिसेल.”

लूक 23

राज्यापाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(A)

23 मग त्यांचा सर्व समुदाय उठला, व त्यांनी त्याला (येशूला) पिलाताकडे नेले. व ते त्याच्यावर आरोप करु लागले. ते म्हणाले, “आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”

मग पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

येशू म्हणाला, “मी आहे हे तू म्हणतोस ते बरोबर आहे.”

मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”

पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीयातील सर्व लोकांना तो आपल्या शिकवणीने भडकावीत आहे, त्याने गालीलापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”

पिलात येशूला हेरोदाकडे पाठवितो

पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालीलाचा आहे काय?” जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो. तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.

हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते, व त्याला असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे होते. ते त्याच्याविरुद्ध जोरदारपणे आरोप करीत होते. 11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले. 12 त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्यापूर्वी ते एकमेकांचे वैरी होते.

येशू मेलाच पाहिजे(B)

13 पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले. 14 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही. 15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही. कारण त्याने त्याला परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. 16 म्हणून मी याला फटके मारुन सोडून देतो.” 17 [a]

18 पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या माणसाला ठार करा! आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा!” 19 (बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते.)

20 पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती. 21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा!”

22 तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला, “परंतु या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”

23 परंतु ते मोठ्याने ओरडतच राहिले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याची मागणी करु लागले. आणि त्यांच्या ओरडण्याचा विजय झाला. 24 पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. 25 जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता, व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्याला त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छे प्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.

येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले(C)

26 ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मागे वाहावयास लावला.

27 लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला होता. त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता. 28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29 कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, ‘धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’ 30 तेव्हा ते पर्वतास म्हणतील, ‘आम्हांवर पडा!’ आणि ते टेकड्यांस म्हणतील. ‘आम्हांला झाका!’ [b] 31 जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”

32 दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते. 33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.

34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”

त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!”

36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” 38 त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”

39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव!”

40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”

43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

येशूचा मृत्यू(D)

44 त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45 आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे म्हटल्यानंतर तो मेला.

47 जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”

48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालीलाहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.

योसेफ अरिमथाईकर(E)

50-51 तेथे एक योसेफ नावाचा मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद होता. तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता.तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52 हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते. 54 तो शुक्रवार (तयारीचा दिवस) होता, आणि शब्बाथ सुरु होणार होता.

55 गालीलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56 नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले.

शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

ईयोब 38

देव ईयोबशी बोलतो

38 नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबाशी बोलला. तो म्हणाला:

“जो मूर्खासारखा बोलत आहे
    तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे? [a]
ईयोब, स्वतःला सावर [b] आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.

“ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?
    तू स्वतःला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग.
    मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे?
    तिची कोनशिला कुणी ठेवली?
जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले
    आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.

“ईयोब, जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला
    तेव्हा दरवाजे बंद करुन त्याला कुणी अडवला?
त्यावेळी मी त्याला मेघांनी झाकले
    आणि काळोखात गुंडाळले.
10 मी समुद्राला मर्यादा घातल्या
    आणि त्याला कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
11 मी समुद्राला म्हणालो, ‘तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही.
    तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.’

12 “ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला
    आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
13 ईयोब, तू कधी तरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून
    दुष्ट लोकांना त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात.
    दिवसाच्या प्रकाशात ह्या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात.
    ओल्या मातीवर उमटलेल्या ठशाप्रमाणे त्या जागा दिसतात.
15 दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही.
    प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.

16 “ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का?
    समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
17 ईयोब, मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का?
    काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
18 ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का?
    तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.

19 “ईयोब, प्रकाश कुठून येतो?
    काळोख कुठून येतो?
20 ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का?
    तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
21 ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील.
    तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? [c]

22 “ईयोब, मी ज्या भांडारात हिम
    आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी,
    युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करुन ठेवतो.
24 ईयोब, सूर्य उगवतो त्या ठिकाणी तू कधी गेला आहेस का?
    पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का? [d]
25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले?
    गरजणाऱ्या वादळासाठी कुणी मार्ग मोकळा केला?
26 वैराण वाळवंटात देखील
    कोण पाऊस पाडतो?
27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते
    आणि गवत उगवायला सुरुवात होते.
28 ईयोब, पावसाला वडील आहेत का?
    दवबिंदू कुठून येतात?
29 हिमाची आई कोण आहे?
    आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
30 पाणी दगडासारखे गोठते.
    सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.

31 “ईयोबा, तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का?
    तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
32 ईयोबा, तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का?
    किंवा तुला सप्तर्षींना त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
33 ईयोबा, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का?
    तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?

34 “ईयोबा, तुला मेघावर ओरडून
    त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?
    ती तुझ्याकडे येऊन, ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’
असे म्हणेल का?
    तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?

36 “ईयोबा, लोकांना शहाणे कोण बनवतो?
    त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
37 ईयोबा, ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे?
    त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो
    आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.

39 “ईयोबा, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का?
    त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात.
    ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
41 ईयोबा, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो?
    जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात
    आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?

2 करिंथकरांस 8

ख्रिस्ती देणे

आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले. कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वतःला दिले. संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली. आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वतःला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.

मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी. म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.

मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.

10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. 11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. 12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल. 15 पवित्र शास्त्र म्हणते,

“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही.
    ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” (A)

तीत आणि त्याचे सोबती

16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंतःकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो, 17 कारण तीताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकनेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. 18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवीत आहोत. 19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी आम्हासांगती दानार्पण घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. जे आम्ही प्रभुच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो.

20 ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. 21 कारण जे प्रभुच्या दृष्टीने चांगले तेच आम्ही योजितो, एवढेच नाही तर माणसांच्या दृष्टीने जे चांगले ते योजितो.

22 त्याला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बंधूलाही पाठवित आहोत. ज्याने आम्हाला स्वतःला पुष्कळ बाबतीत आवेशी असल्याचे सिद्ध करुन दाखविले आहे आणि आता त्याला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासामुळे तो अधिक आवेशी झाला आहे.

23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रतिनिधी आहेत. 24 म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या. आणि आम्हांला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center