Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 18

मोशेचा सासरा सल्ला देतो

18 मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले; तेव्हा तो देवाच्या पर्वताजवळ म्हणजे होरेब किंवा सीनाय पर्वताजवळ, जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेला भेटावयास गेला इथ्रोने मोशेची बायको सिप्पोरा हिलाही बरोबर आणले; (सिप्पोरा मोशे बरोबर नव्हती कारण त्याने तिला माहेरी पाठवले होते.) इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.” दुसऱ्या मुलाचे नांव एलीएजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या वडिलांचा देव याने मला मदत केली व मला मिसरच्या राजाच्या हातातून वाचविले.” तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा व त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.

इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको व तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”

तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले. परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी जे जे केले ते सर्व मोशेने इथ्रोस सांगितले. मिसर देशाचा राजा फारो व त्याचे लोक ह्यांचे परमेश्वराने काय केले तसेच मिसरहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला आणि परमेश्वराने त्या सर्वांतून दरवेळी इस्राएल लोकांना कसे वाचवले ती सर्व हकीकत मोशेने इथ्रोस सांगितली.

परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसरच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. 10 तो म्हणाला,

“परमेश्वराची स्तुती असो
    कारण त्याने फारोच्या तावडीतून
    व मिसरच्या लोकांपासून तुम्हाला स्वतंत्र केले आहे.
11 परमेश्वर सर्व देवांहून महान आहे
हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वतःला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”

12 मग इथ्रोने देवाला यज्ञ व अर्पणे केली. नंतर अहरोन व इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.

13 दुसऱ्या दिवशी मोशेला लोकांचा न्यायनिवाडा करण्याचे विशेष काम होते. लोक खूप असल्यामुळे त्यांना दिवसभर मोशेसमोर उभे रहावे लागले.

14 मोशेला इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करताना इथ्रोने पाहिले तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू असे का करीत आहेस? तू एकटाच न्यायनिवाडा का करीत आहेस? आणि लोक न्यायनिवाड्यासाठी दिवसभर तुझ्याकडे का येतात?”

15 मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी व आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. 16 लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”

17 परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. 19 तू लोकांची गाऱ्हाणी ऐकत असावेस व त्याचबरोबर त्यांसंबंधी देवाकडे बोलतही रहावेस असा मी तुला सल्ला देतो, त्यात देव तुझ्याबरोबर असो अशी मी प्रार्थना करतो. 20 तू लोकांना देवाचे नियम व विधी या संबंधी शिक्षण दे; आणि ते त्यांनी मोडू नयेत अशी ताकीद त्यांना दे; लोकांनी आपल्या जीवनात योग्य मार्गाने चालावे व त्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी त्यांना तू समजावून सांग.

21 “तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22 ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वतः निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. 23 तू असे करशील व परमेश्वराची तशी इच्छा असेल तर तुझे काम करीत राहणे तुला शक्य होईल, आणि त्याचवेळी लोकांचे प्रश्न सुटून ते घरी जाऊ शकतील.”

24 तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. 25 त्याने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहादहावर नायक म्हणून नेमले. 26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.

27 मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

लूक 21

खरे दान(A)

21 येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले. त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो) कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”

मंदिराचा नाश(B)

शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे.

येशू म्हणाला, “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”

त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”

आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो ‘मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका! जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”

10 मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. 11 मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

12 “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभास्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. 13 यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. 14 आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा, 15 कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही. 16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील. 17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील. 18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. 19 आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.

यरुशलेमेचा नाश(C)

20 “जेव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. 21 जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23 त्या दिवसांत ज्या गरोदरस्त्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल. 24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.

भिऊ नका(D)

25 “सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. 26 भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील. 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील. 28 मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”

माझी वचने सर्वकाळ टिकतील(E)

29 नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा. 30 त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. 31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.

32 “मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

सर्वदा तयार राहा

34 “सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल. 35 खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल. 36 सर्व समयी जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”

37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे. 38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.

ईयोब 36

36 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला:

“तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर.
    देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो.
    देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
ईयोब, मी खरे बोलत आहे
    आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे.

“देव अतिशय सामर्थ्यवान आहे,
    पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही.
    तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
देव दुष्टांना जगू देणार नाही
    आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.
जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.
    तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो.
    तो चांगल्यांना सदैव मान देतो.
म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले
    तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार.
आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल.
    देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे.
    देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
10 देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल.
    तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल.
    आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील.
12 परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल.
    त्यांना ज्ञान न होता मरण येईल.

13 “जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात.
    देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
14 ते लोक पुरुष वेश्यासारखे
    अगदी तरुणपणी मरतील.
15 परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील.
    देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो.

16 “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे.
    तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते.
तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे.
    तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.
17 परंतु ईयोबा, आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, म्हणून तुला दुष्टांप्रमाणे शिक्षा करण्यात आली.
18 ईयोबा, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस.
    पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस.
19 आता तुझा पैसा तुझ्या कामी येणार नाही.
    आणि सामर्थ्यवान माणसे तुला मदत करणार नाहीत.
20 आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस.
    लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात.
    आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते.
21 ईयोबा, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस.
    चूक न करण्याची दक्षता घे.

22 “देवाजवळ खूप शक्ती आहे.
    तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे.
23 काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही
    ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही.
24 देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव.
    लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
25 देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते.
    दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.
26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही.
    आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही.

27 “देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके
    आणि पाऊस यात रुपांतर करतो.
28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात
    आणि तो खूप लोकांवर पडतो.
29 देव ढगांची पखरण कशी करतो
    किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही.
30 बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो
    आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.
31 देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो
    आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
32 देव आपल्या हातांनी विजेला पकडतो
    आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते.
    जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.

2 करिंथकरांस 6

देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हांला विनंति करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. कारण तो म्हणतो,

“माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले
    आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” (A)

मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.

आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना, शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत, आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे, सत्य बोलण्यात, आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह, गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने, तरीही फसविणारे ठरले गेलेलो. जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, 10 दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.

11 आम्ही मोकळे पणाने तुमच्याशी बोललो, करिंथकरांनो, आणि आमची अंतःकरणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली. 12 आम्ही तुमच्याबद्दल प्रेमभावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेमभावना मात्र थबकली आहे. 13 आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माइया मुलांप्रमाणे बोलतो. तुम्हीही तुमची अंतःकरणे विशाल करा.

ख्रिस्ती नसलेल्यांबरोबर राहण्याविषयी सूचना

14 जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? 15 ख्रिस्त आणि बलियाल [a] यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? 16 देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे:

“मी त्यांच्याबरोबर राहीन,
    आणि त्यांच्याबरोबर चालेन,
मी त्यांचा देव होईन
    आणि ते माझे लोक होतील.” (B)

17 “म्हणून त्यांच्यामधून बाहेर या
    आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा.
प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका,
    आणि मी तुम्हांला स्वीकारीन.” (C)

18 “मी तुम्हांला पिता असा होईन,
    तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल,
    असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.” (D)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center