M’Cheyne Bible Reading Plan
17 सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते. 2 तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”
मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”
3 परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”
4 तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”
5 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुजबरोबर घे. नाईल नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती तू तुझ्याबरोबर घे. 6 होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.”
मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले. 7 मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.
8 रफिदीम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली. 9 तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात धरून मी टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”
10 यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन व हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले. 11 जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा पिछेहाट होई.
12 काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. मोशे बरोबर असलेल्या लोकांना मोशेचे हात वर धरून ठेवण्यासाठी काही मार्ग शोधावयाचा होता. म्हणून त्यांनी मोशेला बसण्याकरिता मोठा दगड त्याच्या खाली ठेवला; नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर धरून ठेवले. 13 तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.
14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयींच्या ह्या सर्व गोष्टी पुस्तकात लिहून ठेव म्हणजे येथे काय झाले त्याविषयी लोकांना आठवण राहील; आणि यहोशवाला सांग कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
15 मग मोशेने एक वेदी बांधली व तिला “परमेश्वर माझे निशाण.” असे नांव दिले. 16 आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यान्पिढ्या युध्द होईल.”
यहूदी पुढारी येशूला एक प्रश्न विचारतात(A)
20 एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना व सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले. 2 ते त्याला म्हणाले, “आम्हांला सांग, कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस! तुला हा अधिकार कुणी दिला?”
3 तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारीन, तुम्ही मला सांगा: 4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून?”
5 त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? 6 पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणांस दगडमार करतील कारण त्यांची खात्री होती की, योहान संदेष्टा होता.” 7 म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की, तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही.
8 मग येशू त्यांस म्हणाला, “मग मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांला मी सुध्दा सांगणार नाही.”
देव आपला पुत्र पाठवितो(B)
9 मग तो लोकांना ही गोष्ट सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूर गेला. 10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठविले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठविले. 11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठविले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली. आणि रिकाम्या हाताने परत पाठविले. 12 तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठविले. पण त्यालाही त्यांनी जखमी करुन बाहेर फेकून दिले.
13 “द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करु? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.’ 14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्याला ठार मारु, म्हणजे वतन आपले होईल.’ 15 त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले.
“तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील? 16 तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.”
त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.” 17 येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,
“‘तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला
तोच कोनशिला झाला?’ (C)
असे जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय? 18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
19 नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्यांना त्याला अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
यहूदी पुढारी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(D)
20 तेव्हा त्यानी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले. त्यांची अशी योजना होती की, त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते. अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते. 21 म्हणून त्या हेरांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. 22 आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?”
23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. 24 “मला एक नाणे दाखवा. त्यावर कोणाचा मुखवटा व शिक्का आहे?”
ते म्हणाले, “कैसराचा.”
25 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”
26 तेव्हा लोकांसमोर तो जे बोलला त्यात त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले. आणि शांत झाले.
काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(E)
27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, 28 “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत. 29 सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला. 30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. 31 नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. 32 नंतर ती स्त्रीही मरण पावली. 33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”
34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात. 35 परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करुन घेणार नाहीत, आणि लग्न करुन देणार नाहीत 36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले. 38 देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
39 काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात!” 40 तेव्हा त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(F)
41 परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? 42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,
‘प्रभु माझ्या प्रभूला म्हणाला:
तू माझ्या उजवीकडे बैस,
43 जोपर्यंत मी तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत.’ (G)
44 अशा रीतिने दावीद त्याला ‘प्रभु’ म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?”
नियमशास्त्रातील शिक्षकांविरुद्ध इशारा(H)
45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, 46 त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. 47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
35 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले.तो म्हणाला,
2 “ईयोबा, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’
हे तुझे म्हणणे योग्य नाही.
3 आणि ईयोबा तू देवाला विचारतोस
‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल?
मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 “ईयोबा, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
5 ईयोबा, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या
आकाशाकडे, ढगांकडे बघ.
6 ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही.
तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
7 आणि ईयोबा, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही.
देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
8 ईयोबा, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर
आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो.
त्यामुळे देवाला मदत होते
किंवा त्याला दु:ख होते असे नाही.
9 “जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील.
ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत.
ते असे म्हणणार नाहीतः ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे?
लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो.
आता तो कुठे आहे?’
11 ‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे
तेव्हा तो कुठे आहे?’
12 “किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही.
का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत.
असे त्यांना अजूनही वाटते.
13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे.
सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही
तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही.
तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस
हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.
15 “ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते.
तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
16 म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो.
आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो.
परंतु आपण काय बोलत आहोत
हे ईयोबाला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”
5 आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. 2 दरम्यान आम्ही कण्हतो, आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. 3 कारण जेव्हा आम्ही पोशाख करु, तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. 4 कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओझ्याने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. 5 आता देवानेच आम्हांला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले, आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा.
6 म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत. 7 आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने 8 आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू. 9 म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभुपासून दूर असलो तरी. 10 कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.
देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
11 म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत. आणि माझी आशा आहे की, तुमची सद्विवेकबुध्दि आम्हांला जाणते. 12 आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंतःकरणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत. 13 जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मनःस्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी. 14 कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. 15 आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.
16 म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही. 17 म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे! 18 हे सर्व देवापासून आहे त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हांला समेटाची सेवा दिली. 19 देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वतःचा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे. 20 म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा. 21 ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.
2006 by World Bible Translation Center